दोडामार्ग / प्रतिनिधी-
मणेरी येथे समोरून येणाऱ्या टिपरला बाजू देण्याच्या प्रयत्नात उस्मानाबाद-पणजी एसटी बसला अपघात झाला. सुदैवाने एसटी मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हा अपघात रविवारी सकाळी ७:१५ वा.च्या सुमारास घडला.
उस्मानाबादहून पणजीला जाणारी बस बांदा-दोडामार्ग राज्यमार्गावरील मणेरी येथे आली असता समोरून एक टिपर आला. त्याला बाजू देण्यासाठी एसटी चालकाने एसटी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला व ती थेट रस्ता सोडून गटारात गेली.
यावेळी गाडीतील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. रस्त्यालगत असलेल्या झाडीला जाऊन एसटी धडकल्याने ती पलटी होण्यापासून बचावली. अपघाताची वार्ता परिसरात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाय त्या मार्गावरून मार्गस्थ होणारी वाहने घटनास्थळी थांबल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली. प्रवाशांना दरवाजातून उतरण्यास अडचण येऊ लागल्याने एसटीचे दोन्ही आपत्कालीन दरवाजे उघडले व त्यातून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.









