ऑनलाईन टीम / पुणे :
शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समानतेने भरली. त्यामुळे शिवराज्याभिषेक तथा शिवस्वराज्य दिनानिमित्त रविवार, दिनांक ६ जून रोजी सकाळी १० वाजता शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस येथील जगातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारुढ स्मारक व शिवराज्याभिषेक शिल्पासमोर भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात येणार आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक दिन तथा शिवस्वराज्य दिन सोहळ्याचे संकल्पक व शिवजयंती महोत्सव समितीचे आद्यप्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.
पुण्यामध्ये दरवर्षी लालमहाल, एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन, शनिवारवाडा यांसह अनेक ठिकाणी स्वराज्यगुढी उभारली जाते. यावर्षी देखील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वराज्यगुढी उभारुन पूजन होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे, श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती आणि सर्व स्वराज्यघराणी, स्वराज्यबांधव उपस्थित राहणार आहेत.
अमित गायकवाड म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच ६ जून १६७४ हा दिवस भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे. त्यामुळेच ६ जून शिवस्वराज्यदिन विश्वव्यापी होण्यासाठी आम्ही ६ जून २०१३ साला पासून भगव्या स्वराज्यध्वजा सह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारुन साजरा करत आहोत. शिवरायांचा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, वाघनखे, शिवमुद्रा या पंचशुभ चिन्हांनी अलंकृत भगवा स्वराज्यध्वज निर्माण करण्यात आला आहे. यावर्षी देखील विविध ठिकाणी स्वराज्यध्वज व स्वराज्यगुढी उभारुन शिवराज्याभिषेक दिन तथा शिवस्वराज्य दिन साजरा होणार आहे.








