तिसरी परीक्षा रद्द करण्याची प्राध्यापकांची मागणी
बेळगाव : एसएसएलसी व पीयुसी परीक्षांसाठी राज्यात तीन परीक्षा घेतल्या जात असल्याने या परीक्षांचे गांभीर्य हरवल्याची परिस्थिती दिसत आहे. त्यातच प्राध्यापकांच्या एका संघाने तिसरी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात पदवीपूर्व शिक्षण विभागाला पत्र पाठवले होते. त्यामुळे सरकारही तिसरी परीक्षा रद्द करण्याचा विचार करीत आहे. मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखी एक पुरवणी परीक्षेची संधी दिली जात होती. परंतु, काही वर्षांपूर्वी मुख्य परीक्षेनंतर दोन पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्य परीक्षेत गुण कमी मिळाले तरी दोन संधी उपलब्ध असल्याने याचा परिणाम अभ्यासावर होऊ लागला.
त्यामुळे टक्केवारीत घट झाल्याचे दिसून येत आहे. तीन टप्प्यात लागू करण्यात आलेल्या परीक्षेमुळे या परीक्षांचे गांभीर्य हरवल्याची तक्रार प्राध्यापकांनी केली आहे. कर्नाटक राज्य पदवीपूर्व शिक्षक संघटनेने शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून एसएसएलसी आणि पीयुसी परीक्षा तीन टप्प्यात आयोजन करणे हे अवैज्ञानिक ठरत असल्याने तिसरी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी केली आहे. 2024 च्या तुलनेत 2025 चा निकाल घटला आहे. तीन परीक्षांमुळे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांवरचा दबाव वाढला होता. याचा विचार करून तिसरी परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
राज्य सरकारवर दबाव
प्रथम परीक्षेत यश न मिळालेले विद्यार्थी मेहनत करून दुसऱ्या परीक्षेला बसत होते. परंतु, सध्या मात्र चित्र वेगळे दिसत आहे. केवळ पंधरा-वीस दिवसांच्या फरकाने परीक्षा घेतल्या जात असल्याने परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गांभीर्यच नसून विद्यार्थी इतक्या कमी वेळात परीक्षेची तयारी कशी करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे तिसरी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राज्य सरकारवर दबाव टाकला जात आहे.









