वृत्तसंस्था/ लखनौ
सध्या येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया महिलांच्या हॉकी लिग 21 वर्षाखालील वयोगटाच्या अंतिम टप्प्यासाठी सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेतील चौथ्या दिवशी साई शक्ती (एसएस), साई बाल (एसबी), एचएचए आणि स्पोर्ट्स हॉस्टेल ओडिशा (एसएचओ) यांनी विजय नोंदवले.
या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या सामन्यात साई शक्तीने भाई भेलो हॉकी अकादमीचा 7-0 असा एकतर्फी पराभव केला. विजयी संघातर्फे सुबिला तिर्की, खुशी, अनिषा डुंगडुंग, पूजा यादव यांनी प्रत्येकी एक तर लेनलेबी चानूने तीन गोल नोंदवले. दुसऱ्या सामन्यात साई बाल संघाने सॅल्यूट हॉकी अकादमीचा 4-1 असा पराभव केला. विजयी संघातर्फे एच. गवंडेने दोन गोल तर गायत्री गेडला आणि सुश्मिता पन्ना यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. सॅल्यूट हॉकीतर्फे एकमेव गोल काजलने केला. तिसऱ्या सामन्यात एचएआर हॉकी अकादमीने एचआयएम हॉकी अकादमीचा 4-2 असा पराभव केला. या सामन्यात विजयी संघातर्फे सावी, कर्णधार उषा, शुभम आणि राज बाला यांनी प्रत्येकी एक गोल केला. पराभूत संघातर्फे मोनू आणि पूजा यांनी गोल नोंदवले. चौथ्या सामन्यात स्पोर्ट्स हॉस्टेल ओदिशाने खालसा हॉकी अकादमी अमृतसरवर 6-1 अशी मात केली. विजयी संघातर्फे दीपी मोनिका टोप्पोने 2 तर ममिता ओरम, पी. किडो, मुनमुनी दास, सुनिता झेका यांनी प्रत्येकी एक गोल तर पराभूत संघातर्फे कर्णधार सुखप्रित कौरने एक गोल केला.









