कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
परीक्षेचे काम गोपनीय ठेवण्यासाठी आणि परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण रोखण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने स्वत:ची सिक्युअर रिमोट पेपर डिलिव्हरी सिस्टम (एसआरपीडी) विकसित केली आहे. या एसआरपीडीच्या माध्यमातून विद्यापीठ अंतर्गत 850 परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन पध्दतीने पाठवल्या जातात. सुरू असलेल्या परीक्षेत किरकोळ अपवाद वगळता सर्व पेपरच्या प्रश्नपत्रिका वेळेत पोहचल्या असून, कोठेही पेपर फुटीसारखे प्रकार घडलेले नाहीत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने विकसित केलेली एसआरपीडी सिस्टम यशस्वी होत आहे.
शिवाजी विद्यापीठ यापुर्वी परीक्षा घेवून निकालही एमकेसीएल व खासगी कंपनीच्या एसआरपीडीच्या माध्यमातून जाहीर करीत होते. परंतू या परीक्षांमध्ये वारंवार अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. येवढेच काय पण परीक्षेच्या कालावधीमध्ये पेपर फुटीसारखे गंभीर प्रकार उघडकीस आल्याने नाहक विद्यापीठाची बदनामी होत होती. पेपर फुटीच्या प्रकारातील दोशींवर कडक कारवाई केलीच पण हे प्रकार मुळापासूनच बंद करण्यासाठी विद्यापीठाने स्वत:ची एसआरपीडी विकसित केली. या एसआरपीडीच्या माध्यमातून पाठवलेले पेपर परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचत आहेत. त्यामुळे परीक्षकांसह विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. विद्यापीठाने केलेला नवीन प्रयत्न यशस्वी होत आहे. पुर्वी प्रश्नपत्रिका पाटवण्यासाठी स्वतंत्र गाडी आणि विश्वासू व्यक्तीची निवड करून प्रत्येक परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका पोहचवल्या जात होत्या. यामध्ये वेळ, मनुष्यबळ आणि पैसा खर्च होत होता. आता विद्यापीठात बसून एका क्लिकवर एकाचवेळी सर्वच परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहचतात. परिणामी परीक्षा विभागाचे कामही सोपे होत असून, आर्थिक फायदाही होत आहे.
शिवाजी विद्यापीठाची परीक्षा म्हंटले की काहीसे गोंधळाचे वातावरण असायचे. यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून कोट्यावधी रूपये खर्च करून एसआरपीडीची निर्मिती केली आहे. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात परीक्षा यशस्वीपणे घेतल्या जात आहेत. पंधरा वर्षापुर्वीच्या जुन्या अभ्यासक्रमांनाही समांतर कोड देण्यासारखे मोठे आव्हानही परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी समर्थपणे पेलत संबंधीत विषयांच्या परीक्षा घेतल्या. यातच परीक्षा विभागाचे कसब दिसून येते. तसेच परीक्षा विभागाने भरारी पथकांसह बैठ्या पथकांची नियुक्ती केल्याने गतवर्षीपेक्षा यावर्षी कॉपीच्या प्रकारात घट झाली आहे. एसआरपीडी समन्वयकांना प्रशिक्षण दिल्याने लॉगईनमधून प्रश्नपत्रिका घेणे सोपे झाले आहे.
विषयतज्ञांनाही सुविधा
परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या विषयतज्ञांना एसआरपीडीमध्ये प्रश्नसंच तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे तज्ञांनी तयार केलेली प्रश्नपत्रिका त्यांना दिलेल्या लॉगइन आयडीमधून विद्यापीठाला पाठवायची आहे. परिणामी विषयतज्ञांच्या वेळीची आणि पैशाची बचत होत आहे.
प्रश्नपत्रिका पाठवण्याची प्रक्रिया
850 परीक्षा : नियमित विद्यार्थी 1 लाख 85 हजार 193, रिपीटर विद्यार्थी 50 हजार.
महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा एसआरपीडी समन्वयकाच्या लॉगईनवर पाठवली जातेय प्रश्नपत्रिका.
एसआरपीडीतून पाठवलेल्या प्रश्नपत्रिकेची विद्यार्थी संख्येनुसार प्रिंट काढून वितरण.
ट्रॅव्हलिंगसह वेळेची आणि पैशाची बचत.
पेपर फुटीला बसतोय आळा
तांत्रिक सुविधांमुळे परीक्षेतील गोंधळ कमी
विद्यापीठातील परीक्षा विभाग स्वत:च्या एसआरपीडीतून यशस्वीपणे प्रश्नपत्रिका पाठवत आहे. परीक्षा केंद्रावरील एसआरपीडी समन्वयकांच्या रूमसह सर्वच परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसवले आहेत. विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार सर्व महाविद्यालयांनी सीसीटीव्ही बसवल्याने पेपरफुटी झालेली नाही. किरकोळ अपवाद वगळता एसआरपीडीतून होत असलेल्या परीक्षा यशस्वी होत आहेत.
डॉ. अजितसिंह जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ)








