वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई ओपन महिला टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सहजा यमलापल्लीने अग्रमानांकित कायला डेला पराभवाचा धक्का दिल्यानंतर हैदराबादच्या श्रीवल्ली भामिदीपतीने आणखी एका मानांकित खेळाडू जपानच्या हिबिनोला धक्का दिला.
पात्रता फेरीतून आलेल्या व पहिलीच डब्ल्यूटीए स्पर्धा खेळणाऱ्या श्रीवल्लीने झुंजार खेळ करीत जपानच्या द्वितीय मानांकित नाओ हिबिनोचा 2-6, 6-1, 7-6 (7-5) असशा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीचे सुवर्ण मिळविलेल्या रुतुजा भोसलेनेही आगेकूच केली असून तिने थायलंडच्या पियांगटर्न प्लिपुएचवर 6-4, 7-5 अशी मात करून दुसरी फेरी गाठली. भारताची नंबर वन खेळाडू अंकिता रैनाला मात्र अमेरिकेच्या आठव्या मानांकित केटी व्हॉलीनेट्सकडून 6-4, 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. स्लोवेनियाची तिसरी मानांकित तमारा झिडान्सेकने आजारपणामुळे स्पर्धेतून माघार घेतली असल्याने टॉप तीन खेळाडू स्पर्धेबाहेर पडल्या आहेत. झिडान्सेकच्या जागी कॅमिला रोजाटेलोला संधी मिळाली. तिने पहिल्या सामन्यात रशियाच्या अॅनास्तेशिया तिखोनोव्हावर 7-5, 3-6, 6-2 अशी मात केली.









