कर्नाटकातील विविध प्रांतांत फिरून कुळावी, भक्तांना दर्शन देणार

प्रतिनिधी /काणकोण
श्रीस्थळ-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन अडवट सिंहासनाधिश्वर देवाच्या अवतार पुरुषाचा संचार 7 पासून सुरू होत आहे. पौष शुद्ध पौर्णिमा ते फाल्गुन षष्टीपर्यंतच्या दोन महिन्यांच्या कालावधीत देवाची तरंगे, गडे, मेळ आणि संबंधित सेवेकऱयांचा लवाजमा कर्नाटक राज्यातील विविध भागांत संचार करत असतो.
7 पासून सुरू होणाऱया या संचाराच्या आदल्या दिवशी देवाची तरंगे, भगत, गडे आणि संबंधित सेवेकरी रात्री आसाळी, खालवडे, मैथळ या तीन घरवईंवर जमतील. या ठिकाणी परंपरेनुसार शुद्धी, अलंकार, पूजाअर्चा करून उपाहार अर्पण केला जाणार आहे. पहाटे प्रत्येक मेळाचा आपापल्या घरवईवर अवतार आणि कौल-प्रसाद होऊन श्रीस्थळ येथे प्रयाण केले जाणार आहे. शनिवार 7 रोजी सकाळी 11.30 च्या दरम्यान श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवाच्या प्राकारात तिन्ही मेळांचे एकत्रित आगमन झाल्यानंतर खळ्ळेवरील अवतार होईल. यावेळी मानेली, महाजन आणि भाविकांना कौल-प्रसाद दिला जाणार आहे.
वर्षपद्धतीप्रमाणे काही दिवसांनी म्हाल वेळीप, म्हाल देसाई, खालवडेची घरवई, मैथळची परंपरा येथे तळया स्वीकारून श्री देव अवतार पुरुषाचा लवाजमा उत्तर कर्नाटकातील शिवेश्वर प्रांतात कुळावी आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी प्रयाण करेल. या संचारात हा लवाजमा कर्नाटकातील पंटलबाग, मुडगेरी, नागफोंड, सदाशिवगड, बाड, मक्केरी, चेंडिये, किन्नर, बोळये, हळगा, हुळगा, हणकोण, गोपशिट्टा या भागांतील भाविकांच्या तळया स्वीकारल्यानंतर पुढे होन्नावर, मंकी, कैगा, कुंभारवाडा, जोयडा, उळवी येथून रामनगरमार्गे सांगेहून गावडोंगरी, कुडेवाडा या ठिकाणी आगमन होणार आहे.
त्यापूर्वी काळी नदीच्या पलीकडील सकली मक्केरी, वयली मक्केरी, चेंडिये, किन्नर आणि खारगा या पाच ठिकाणी अवतार पुरुषाचा अवतार होऊन कुळावी आणि भाविकांना कौल दिला जाईल. वेळेच्या उपलब्धतेनुसार हा लवाजमा बैलूर, बैंदूर, बारखूर, ह्ळदीपूर या भागांतील भाविकांनाही दर्शन देऊन आशीर्वाद देत असतो. कर्नाटकातील संचार संपवून अवतार पुरुषाचे आगमन फाल्गुन महिन्यात परत श्रीस्थळ येथे होत असते आणि त्यानंतरच्या पुढच्या सत्रात काणकोण महालातील महाजन, कुळावी, ग्रामस्थ आणि अन्य भाविकांना दर्शन, अवसर कौल, तळय आणि आशीर्वाद द्यायला खालवडे येथून प्रारंभ होत असतो, अशी माहिती श्री मल्लिकार्जुन देवस्थानचे अध्यक्ष विठोबा देसाई यांनी दिली.









