वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे सुरु असलेल्या 2023 च्या राष्ट्रीय आंतरराज्य अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 24 वर्षीय पुरुष अॅथलेटिक्स मुरली श्रीशंकरने लांब उडी या प्रकारात 8.41 मी. चे अंतर नोंदवत आगामी होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली.
या स्पर्धेत रविवारी पुरुषांच्या लांब उडी प्रकारात श्रीशंकरने पहिल्याच प्रयत्नात 8.41 मी. चे अंतर नोंदवले मात्र त्याला चालू वर्षाच्या प्रारंभी जस्वीन अल्ड्रीनने या क्रीडा प्रकारात नोंदवलेला 8.42 मी. चा राष्ट्रीय विक्रम मागे टाकता आला नाही. या स्पर्धेत श्रीशंकर केरळ राज्याचे प्रतिनिधीत्व करत आहे. या क्रीडा प्रकारात श्रीशंकरने प्रथम स्थानासह सुवर्ण तर जस्वीन अल्ड्रीनने 7.83 मी. चे अंतर नोंदवत दुसरे स्थान तसेच मोहमद याहीयाने 7.71 मी. चे अंतर नोंदवत तिसरे स्थान मिळवले. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची पात्रता मर्यादा 7.95 मी. ठेवण्यात आली आहे. हंगेरीतील बुडापेस्ट येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र फेरीची मर्यादा 8.25 मी. ठेवण्यात आली आहे. आता या आगामी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी पात्र ठरणारा श्रीशंकर हा तिसरा भारतीय अॅथलिट आहे. यापूर्वी भालाफेक धारक नीरज चोप्रा तसेच थाळीफेक धारक विकासगौडा यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे.