प्रियांशु राजावतही दुसऱ्या फेरीत, पुरुष दुहेरीत चिराग-सात्विकसाईराजही पुढील फेरीत
वृत्तसंस्था/ जकार्ता
येथे सुरु असलेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन, प्रियांशू राजावत यांनी विजयी सलामी दिली. पहिल्या दिवशी पीव्ही सिंधू, प्रणॉय यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली आहे. याशिवाय, पुरुष दुहेरीत भारताची अव्वल जोडी चिराग-सात्विकसाईराज यांनी देखील पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
बुधवारी झालेल्या पुरुष एकेरीतील सलामीच्या सामन्यात भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनने मलेशियाच्या ली झीचा 21-17, 21-13 असा पराभव केला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात लक्ष्यने वर्चस्व गाजवले. सुरुवातीपासून त्याने आक्रमक खेळताना प्रतिस्पर्धी मलेशियन लीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. ही लढत 32 मिनिटे चालली. आता पुढील फेरीत लक्ष्यसमोर मायदेशी सहकारी किदाम्बी श्रीकांतचे आव्हान असेल.

श्रीकांतची विजयी सलामी
पुरुष एकेरीतील दुसऱ्या सामन्यात श्रीकांतने चीनच्या ल्यू गुआंगचा 21-13, 21-19 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 22 व्या स्थानी असलेल्या श्रीकांतचा हा चीनच्या गुआंगविरुद्ध पाचवा विजय ठरला. या सामन्यात श्रीकांतने गुआंगविरुद्ध नेटजवळ सरस खेळ साकारत विजयाला गवसणी घातली. आज, श्रीकांत व लक्ष्य सेन यांच्यात होणारा सामना देखील चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे. अन्य एका सामन्यात भारताचा युवा खेळाडू प्रियांशू राजावतला पुढे चाल मिळाली. थायलंडच्या कुनलावतला दुखापत झाल्याने त्याने या सामन्यात सहभाग घेतला नाही. यामुळे राजावतला दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला. पुढील फेरीत त्याच्यासमोर मलेशियाच्या गिनटिंगचे आव्हान असेल.
पुरुष दुहेरीत मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात सात्विकसाईराज-चिराग शेट्टी यांनी इंडोनेशियन ओपनची दुसरी फेरी गाठली आहे. या भारतीय जोडीचा सामना फ्रान्सच्या ख्रिस्तो व टॉमा पोपोव्ह यांच्याविरुद्ध होता. पहिला गेम भारतीय जोडीने सहज जिंकला पण दुसऱ्या गेममध्ये दुखापतीमुळे फ्रान्सच्या जोडीने माघार घेतल्याने भारतीय जोडीला दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला. आता त्यांची पुढील लढत चीनच्या जी टिंग-हाओ झुओ यांच्याविरुद्ध होईल.
आकर्षी कश्यपचे आव्हान संपुष्टात
महिला एकेरीत मंगळवारी सिंधूने विजयी सलामी देताना दुसरी फेरी गाठली आहे. आज तिची लढत तैपेईची अव्वल खेळाडू तेई तेजु यिंगशी होणार आहे. दरम्यान, बुधवारी झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात युवा खेळाडू आकर्षी कश्यपला सलामीच्या सामन्यात कोरियाच्या आन यंगने 10-21, 4-21 असे नमवले.









