वृत्तसंस्था /व्हॅनेटा (फिनलँड)
येथे सुरू असलेल्या आर्किटिक खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांत आणि किरण जॉर्ज यांनी पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे. मात्र भारताच्या मिथून मंजुनाथचे आव्हान समाप्त झाले. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या या स्पर्धेत माजी टॉप सिडेड के. श्रीकांतने जर्मनीच्या मॅक्स वेसकिरचेनचा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या सामन्यात वेसकिरचेनने पहिल्या गेममध्ये 6-11 असे पिछाडीवर असताना दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने श्रीकांतला विजयी म्हणून घोषित करण्यात आले. अन्य एका सामन्यात भारताच्या किरण जॉर्जने फ्रान्सच्या टोमा पोपोव्हवर 24-22, 15-21, 21-15 अशा गेम्समध्ये 73 मिनिटांच्या कालावधीत विजय मिळवत पुढील फेरीत स्थान मिळवले. किरण जॉर्जने इंडोनेशिया मास्टर्स 100 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत गेल्या महिन्यात पुरुष एकेरीचे जेतेपद मिळवले होते. त्याने आतापर्यंत विश्व बॅडमिंटन टूरवरील दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. चीनच्या वेंग यांगने भारताच्या मिथून मंजुनाथवर 21-19, 21-14 अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. मात्र या स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताच्या साई प्रतिक आणि तनिषा क्रेस्टो त्याचप्रमाणे महिला दुहेरीत ऋतूपर्णा पांडा आणि स्वेतपर्णा पांडा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.









