वृत्तसंस्था/कौलालंपूर
येथे सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले तर एचएस प्रणॉय व सतीश करुणाकरन यांचे आव्हान संपुष्टात आले. मिश्र दुहेरीत भारताच्या ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो यांनीही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. के. श्रीकांतने जागतिक 13 व्या मानांकित आयर्लंडच्या एन्हात एन्ग्युएवर 23-21, 21-17 अशी 59 मिनिटांच्या खेळात मात केली. दीर्घ काळ बॅडपॅचमधून गेल्यामुळे श्रीकांतची जागतिक क्रमवारीत 65 व्या स्थानापर्यंत घसरण झाली असून त्याची पुढील लढत फ्रान्सच्या टोमा पोपोव्हशी होईल.
सतीश करुणाकरनलाही टोमाचा भाऊ व त्याचा दुहेरीचा जोडीदार ख्रिस्तो पोपोव्हने 21-14, 21-16 असे हरवित स्पर्धेबाहेर घालविले. भारताच्या एचएस प्रणॉयलाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्याला जपानच्या युशी तनाकाने 21-9, 21-18 असे पराभूत केले. याशिवाय आयुष शेट्टीच आव्हानही उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. फ्रान्सच्या टोमा पोपोव्हने त्याला 21-13, 21-17 असे हरविले. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला व तनिशा क्रॅस्टो यांनी फ्रान्सच्या ज्युलियन मायो लीया पालेर्मो यांच्यावर 21-17, 18-21, 21-15 अशी मात करीत आगेकूच केली. महिला दुहेरीत प्रेरणा अलवेकर, मृण्मयी देशपांडे यांना मात्र सु यिन हुइ व लिन झिह युन यांच्याकडून 21-9, 21-14 असा पराभव स्वीकारावा लागला.









