प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषादिनानिमित्त राणी चˆम्मा विद्यापीठात साहित्य-सृजन संमेलनाचे आयोजन 28 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, उद्घाटक म्हणून विद्यापीठातील प्रा. डॉ. विजय नागन्नावर तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे, प्रा. डॉ. मनीषा नेसरकर, डॉ. मैजोद्दिन मुतवल्ली व डॉ. संजय कांबळे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाध्यक्षांचा परिचय प्रा. डॉ. सुभाष वाघमारे
डॉ. सुभाष वाघमारे हे सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे मराठी विभाग प्रमुख व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ‘संविधानाच्या स्वप्नातील गाव’ व ‘मी भारतीय’ हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासमवेत विविध महाविद्यालयात विवेक वाहिनी कार्यात ते सहभागी होते. स्वखर्चाने वाचन चळवळ, हुंडाविरोधी संघटनेत कार्य, व्यसनमुक्ती प्रचार, सामाजिक विषयावर विविध व्याख्याने, अनुसूचित जाती-जमाती, अत्याचार प्रतिबंध कायद्याचे विविध गावात प्रसारण अशी अनेक समाजोपयोगी कार्ये त्यांच्याकडून झालेली आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. समाज शिक्षक गौरव पुरस्कार, इंदिरा गांधी नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड, शिक्षक भूषण पुरस्कार, राज्यस्तरीय समाजप्रबोधन काव्य पुरस्कार, सर्जनशील साहित्य लेखन पुरस्कार, आदर्श साहित्य लेखन पुरस्कार मिळाले आहेत.









