बेळगाव : बृहन्मुबई विज्ञान शिक्षक मंडळाच्यावतीने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2024-25 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या सृजन पाटील याने सुवर्णपदक पटकाविले आहे. ही एक आगळीवेगळी स्पर्धा असून वर्षभर मुलांना वेगवेगळी प्रात्यक्षिके करून आपला अहवाल मुलाखतीच्या माध्यमातून मांडावा लागतो. या स्पर्धेसाठी मराठी विद्यानिकेतन, बेळगाव शाळेने सहावी व नववीमधून 64 विद्यार्थी परीक्षेला बसविले. यातून अनेक विद्यार्थी पास झाले. पण पुढील प्रात्यक्षिक फेरीसाठी सहावीतील 5 विद्यार्थी निवडले गेले. ही शाळेसाठी अभिमानाची गोष्ट होती. आणि अंतिम फेरीसाठी सृजन अनिल पाटील पात्र ठरला. दृष्टीहिनांसाठी वनदृष्टी’ या कृती संशोधनाचा विषय निवडून सृजनने मुलाखत फेरी पार करून यशस्वीरीत्या सुवर्णपदकापर्यंत आपली झेप घेतली. या देदीप्यमान कामगिरीमुळे शाळेच्या गौरवात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
दि. 12 एप्रिल रोजी अखिल भारतीय नाट्यापरिषद, मुंबई या ठिकाणी झालेल्या बक्षीस वितरण समारंभामध्ये मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात आला. मे 3, 4, 5 या कालावधीत बारामतीमध्ये समर कॅम्प होणार आहे. त्यामध्ये वैज्ञानिक मंडळींसोबत राहायची संधी त्याला मिळणार आहे. त्याला मुख्याध्यापक जी. व्ही. सावंत, एन. सी. उडकेकर, शिक्षण संयोजिका नीला आपटे यांची प्रेरणा मिळाली. ज्येष्ठ शिक्षक व मार्गदर्शक प्रतापसिंह चव्हाण, मत्स्यालय महाविद्यालय, रत्नागिरीच्या प्रा. स्वप्नजा मोहिते, शाळेचे विज्ञान शिक्षक, श्वेताताई, मंजुषाताई, अरुण बाळेकुंद्री तसेच त्याचे आईबाबा शैला पाटील व ए. के. पाटील यांचेही विशेष मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.









