बांगलादेशचा 7 गड्यांनी पराभव, कुशल मेंडीस ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / कँडी
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लंकन संघाने विजयी सलामी देताना बांगलादेशचा 6 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. 51 चेंडूत 73 धावा झळकविणाऱ्या कुशल मेंडीसला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 20 षटकात 5 बाद 154 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 19 षटकात 3 बाद 159 धावा जमवित विजय नोंदविला.
बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या परवेज हुसेन इमॉनने 22 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 38, मोहम्मद नईमने 29 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 32, मेहदी हसन मिराजने 23 चेंडूत 4 चौकारांसह 29, टी. हसनने 17 चेंडूत 2 चौकारांसह 16, रिदॉयने 13 चेंडूत 10 धावा जमविल्या. शमीम हुसेन 5 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 14 धावा केल्या. बांगलादेशच्या डावामध्ये 4 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 54 धावा जमविताना 1 गडी गमविला. बांगलादेशचे अर्धशतक 31 चेंडूत, शतक 88 चेंडूत तर दीड शतक 118 चेंडूत फलकावर लागले. सलामीच्या इमॉन आणि हसन यांनी 30 चेंडूत 46 धावांची भागिदारी केली. लंकेतर्फे तिक्ष्णाने 37 धावांत 2 तर चमिका करुणारत्ने व शनाका तसेच वँडेरसे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना निशांका आणि कुशल मेंडीस या सलामीच्या जोडीने लंकेच्या डावाला दमदार सुरूवात करुन देताना 28 चेंडूत 78 धावांची भागिदारी केली. निशांकाने 16 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 42 धावा जमविल्या. निशांका बाद झाल्यानंतर मेंडीसला कुशल परेराकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 42 धावांची भागिदारी केली. कुशल परेराने 25 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 24 धावा जमविल्या. कुशल मेंडीसने 31 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. त्याने 51 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 73 धावा जमविल्या. लंकेला विजयासाठी केवळ सात धावांची जरुरी असताना कुशल मेंडीस झेलबाद झाला. त्यानंतर अविष्का फर्नांडो आणि कर्णधार असालेंका यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. फर्नांडोने 17 चेंडूत नाबाद 11 तर असालेंकाने 1 षटकारासह नाबाद 8 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 8 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. लंकेने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 83 धावा झोडपाताना 1 गडी गमविला. लंकेची अर्धशतक 19 चेंडूत, शतक 49 चेंडूत तर दीड शतक 108 चेंडूत फलकावर लागले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 20 षटकात 5 बाद 154 (पी. हुसेन इमॉन 38, टी. हसन 16, दास 6, मोहम्मद नईम नाबाद 32, रिदॉय 10, मेहदी हसन मिराज 29, शमिम हुसेन नाबाद 14, अवांतर 9, तिक्ष्णा 2-37, तुषारा, शनाका, वँडेरेसे प्रत्येकी 1 बळी), लंका 19 षटकात 3 बाद 159 (कुशल मेंडीस 73, पी. निशांका 42, कुशल परेरा 24, अविष्का फर्नांडो नाबाद 11, असालेंका नाबाद 8, सैफुद्दीन, मेहदी हसन मिराज आणि रिशाद हुसेन प्रत्येकी 1 बळी.









