आशिया चषक : पराभवासह अफगाण स्पर्धेतून बाहेर
वृत्तसंस्था/अबुधाबी
आशिया चषक स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 6 विकेट्सनी पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना अफगाण संघाने 20 षटकांत 169 धावा केल्या. यानंतर लंकेने विजयासाठीचे लक्ष्य 18.4 षटकांत 4 गडी गमावत पूर्ण केले. या पराभवासह अफगाण संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे तर लंकेने बांगलादेशसह सुपर फोरमध्ये स्थान मिळविले. नाबाद 74 धावांची खेळी करणाऱ्या कुसल मेंडिसला सामनावीराचा बहुमान मिळाला.
प्रारंभी, अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र अफगाणिस्तानच्या प्रमुख फलंदाजांनी कॅप्टन रशीद खानचा निर्णय चुकीचा ठरवला. काही फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. यामुळे अफगाणिस्तानची 12.1 ओव्हरमध्ये 6 बाद 79 अशी स्थिती झाली. त्यानंतर रशीद खान आणि मोहम्मद नबी या दोघांनी सातव्या विकेटसाठी 35 धावा जोडल्या. रशीद 24 धावा करुन आऊट झाला. रशीद मैदानात असेपर्यंत नबी संयमाने खेळत होता, मात्र शेवटचे काही चेंडू बाकी असताना नबीने आपला गिअर बदलला.
नबीने 20 व्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने कमाल केली. त्याने पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिक्स लगावले. त्यानंतर दुनिथने नो बॉल टाकला. नबीने चौथ्या बॉलवर (फ्री हीट) पुन्हा सिक्स लगावला. यानंतर पाचव्या बॉलवर खणखणीत षटकार खेचला. नबीने अशाप्रकारे 5 चेंडूत 5 सिक्स लगावले. त्यानंतर दुनिथने शेवटचा बॉल हुशारीने टाकला. त्यामुळे नबी मोठा फटका मारु शकला नाही. मात्र त्यानंतरही नबीने 1 धाव घेतली आणि दुसरी धाव घेताना रनआऊट झाला. यामुळे अफगाण संघाला 20 षटकांत 8 बाद 169 धावापर्यंत मजल मारता आली.
लंकेचा शानदार विजय
अफगाण संघाने विजयासाठी दिलेले 170 धावांचे टार्गेट लंकन संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. कुशल मेंडिसने सर्वाधिक 52 चेंडूत 10 चौकारासह नाबाद 74 धावांची खेळी करत विजयात मोलाचे योगदान दिले. याशिवाय, कुशल परेराने 28, कर्णधार असलंकाने 17 तर कमिंदू मेंडिसने नाबाद 26 धावांचे योगदान दिले. दरम्यान, लंकन संघ याआधीच सुपर फोरमध्ये दाखल झाला असून त्यांची पुढील लढत दि. 20 रोजी बांगलादेशविरुद्ध होईल.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान 20 षटकांत 8 बाद 169 (इब्राहिम झद्रन 24, मोहम्मद नबी 22 चेंडूत 3 चौकार आणि 6 षटकारासह 60, रशीद खान 24, नुवान तुषारा 18 धावांत 4 बळी),श्रीलंका 18.4 षटकांत 4 बाद 171 (कुशल मेंडिस नाबाद 74, कुशल परेरा 28, चरिथ असलंका 17, कमिंदू मेंडिस नाबाद 26, मुजीब रेहमान, ओमरझाई, मोहम्मद नबी आणि नूर अहमद प्रत्येकी 1 बळी).









