चरिथ असलेंका सामनावीर, लंकेची मालिकेत विजयी सलामी
वृत्तसंस्था/ ऑकलंड
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत रविवारी येथे झालेल्या चुरशीच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकाने यजमान न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात न्यूझीलंडच्या चरिथ असलेंकाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकन संघाने 20 षटकात 5 बाद 196 धावा जमवल्या. यानंतर न्यूझीलंडने 20 षटकात 8 बाद 196 धावा जमविल्याने पंचांनी सुपर ओव्हरवर सामन्याचा निकाल दिला. या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 2 बाद 8 धावा जमवल्या. महेश तीक्ष्णाच्या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या मिचेलने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर त्याचा दुसरा चेंडू वाईड ठरला. तिसऱ्या चेंडूवर निशम बाद झाला. चॅपमनने चौथ्या चेंडूवर दोन धावा तर पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला. पण त्यानंतर शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. लंकेने सुपर ओव्हरमध्ये कुशल मेंडिस आणि चरिथ असालेंका यांना फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या निश्चामकडे ही सुपर ओव्हर टाकण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या सुपर ओव्हरमधील पहिल्याच चेंडूवर कुशल मेंडिसने एकेरी धाव घेतली. त्यानंतर असलेंकाने पुढच्या चेंडूवर षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर असालेंकाने चौकार ठोकून आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला. लंकेने सुपर ओव्हरमध्ये बिनबाद 11 धावा जमवल्या.

लंकेच्या डावामध्ये कुशल परेरा आणि चरिथ असलेंका यांनी शानदार अर्धशतके झळकवली. असलेंकाने 41 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारासह 67 तर कुशल परेराने 45 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 53, कुशल मेंडिसने 9 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 25, धनंजय डिसिल्वाने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15, कर्णधार शनाकाने केवळ एक धाव तर हसरंगाने 11 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 21 धावा झळकवल्या. लंकेच्या डावामध्ये पहिल्याच चेंडूवर मिलेनीने निशांकाला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. त्यानंतर मेंडिस आणि परेरा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 19 चेंडूत 47 धावा धावांची भर घातली. कुशल परेरा आणि असलेंका यांनी चौथ्या गड्यासाठी 103 धावांची भागीदारी नोंदवली. लंकेच्या डावात 12 षटकार आणि 10 चौकार नोंदवले गेले. न्यूझीलंडतर्फे निशमने 2 तर मिलेनी, लिस्टर आणि सिप्ले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये डॅरील मिचेलने 44 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह 66, चॅपमनने 23 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 33, कर्णधार लॅथमने 16 चेंडूत 5 चौकारासह 27, निशमने 10 चेंडुत 1 षटकार आणि 2 चौकारासह 19, रचिन रविंद्रने 13 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 26, सोधीने 4 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 10 धावा जमवल्या. न्यूझीलंडचे पहिले दोन गडी केवळ तीन धावात बाद झाल्यानंतर लॅथम आणि मिचेल यांनी तिसऱ्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी केली. लॅथम बाद झाल्यानंतर मिचेल आणि चॅपमन यांनी चौथ्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी केली. या डावातील शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 13 धावांची जरुरी होती. दरम्यान शनाकाच्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकात सोधीने मिडविकेटच्या दिशेने षटकार खेचून न्यूझीलंडला लंकेच्या धावसंख्येशी बरोबरी साधून दिल्याने अखेर हा सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला. न्यूझीलंडच्या डावामध्ये 9 षटकार आणि 16 चौकार नोंदवले गेले. लंकेतर्फे प्रमोद मधुसेन, हसरंगा आणि शनाका यांनी प्रत्येकी दोन तर तीक्ष्णा मधुशंका यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमचा 31 वा वाढदिवस साजरा करण्यात आला पण त्याला आपल्या वाढदिवशी संघाला विजय मिळवून देता आला नाही.
संक्षिप्त धावफलक : लंका 20 षटकात 5 बाद 196 (कुशल मेंडिस 25, कुशल परेरा नाबाद 53, धनंजय डिसिल्वा 15, असालेंका 67, हसरंगा नाबाद 21, शनाका 1, अवांतर 14, निशम 2-30, मिलेनी, लिस्टर, सिप्ले प्रत्येकी एक बळी), न्यूझीलंड 20 षटकात 8 बाद 196 (लॅथम 27, मिचेल 66, चॅपमन 33, निशम 19, रचिन रविंद्र 26, सोधी नाबाद 10, अवांतर 9, मधुसेन 2-37, हसरंगा 2-30, शनाका 2-20, तीक्ष्णा 1-22, मधुशंका 1-45).
सुपर ओव्हर : न्यूझीलंड 2 बाद 8, लंका बिनबाद 11.









