वृत्तसंस्था/ कोलंबो
सध्या भारतात सुरू असलेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत लंकन संघाची कामगिरी अत्यंत निराशजनक झाल्याने लंकन क्रिकेट मंडळाचे सचिव मोहन डिसिल्वा यांनी आपल्या सचिवपदाचा राजीनामा स्वखुषीने दिला आहे.
या स्पर्धेतील गुरुवारी झालेल्या मुंबईतील सामन्यात यजमान भारताने लंकेचा 302 धावांनी दणदणीत पराभव केला. भारताचा या स्पर्धेतील हा विक्रमी विजय आहे. या सामन्यापूर्वी लंकेचे या स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठीचे आव्हान संपुष्टात आले होते. लंकन क्रिकेट मंडळाचे सचिव मोहन डिसिल्वा यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंडळाच्या अध्यक्षाकडे सुपुर्द केला आहे. दरम्यान लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रशासकीय समितीने संघाच्या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारून संयुक्त राजीनामा देण्याचे आवाहन क्रीडा मंत्री रोशन रणशिंगे यांनी केले होते. रणशिंगे यांनी निवड समितीवर ठपका ठेवत त्यांना दोषी ठरवले आहे. शमी सिल्वाच्या नेतृत्वाखालील लंकन क्रिकेट प्रशासकीय समितीने संघ व्यवस्थापनाकडून अहवालाची मागणी केली असून त्याची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील लंकन संघाचा पुढील सामना 6 नोव्हेंबर रोजी दिल्लीत बांगलादेशबरोबर होणार आहे. आतापर्यंत लंकेने केवळ 7 पैकी 2 सामने जिंकले असल्याने आता उर्वरित सामने केवळ औपचारिकता म्हणून राहिल.









