वृत्तसंस्था/ केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेत शुक्रवारपासून सुरू झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात लंकन महिला क्रेकेट संघाने विजयी सलामी देताना दक्षिण आफ्रिकेचा केवळ 3 धावांनी निसटता पराभव केला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेने 20 षटकात 4 बाद 129 धावा जमवल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 126 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना केवळ 3 धावांनी गमवावा लागला.
लंकेच्या डावामध्ये चमारी अट्टापट्टूने समयोचित फलंदाजी करताना 50 चेंडूत 12 चौकारांसह 68 धावा झळकवल्या. विश्मी गुणरत्नेने 34 चेंडूत 4 चौकारासह 35 धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेतर्फे कॅपने 15 धावात एक गडी बाद केला. लंकेच्या डावातील सहाव्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या डी. क्लर्कने मादवीला 8 धावावर बाद केले. दक्षिण आफ्रिकेतर्फे शबनीम इस्माईल, कॅप आणि डी. क्लर्क यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या डावात ब्रिटस्ने 12 धावा जमवल्या. पॉवर प्ले अखेर दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 38 धावापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर लंकेच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या कॅपला 11 धावावर तर उलव्हर्टला 18 धावा बाद केले. 10 षटकाअखेर दक्षिण आफ्रिकेने 3 बाद 56 धावा जमवल्या होत्या. लंकेच्या सुगंदीका कुमारीने दक्षिण आफ्रिकेच्या ट्रायॉनला 10 धावांवर तर त्यानंतर बॉशला शून्यावर बाद केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या लुसने 28 धावा जमवल्या पण ती एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाली. सिनालोव्ह जेप्टाने 15 धावा जमवल्या. सुगंदीका कुमारीने दक्षिण आफ्रिकेच्या डावातील शेवटचे षटक टाकले आणि तिने लंकेला तीन धावांनी विजय मिळवून दिला. लंकेतर्फे इनोका रणवीराने 18 धावात 3 तसेच सुगंदीका कुमारी आणि रणशिंगे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या स्पर्धेतील सलामीच्या पराभवामुळे आता यजमान दक्षिण आफ्रिकेला आपल्या गटातील होणाऱया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजयासाठी झगडावे लागेल. या सामन्यात लंकेच्या अट्टापट्टूला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक ः लंका 20 षटकात 4 बाद 129 (चमारी अट्टापट्टू 68, गुणरत्ने 35, शबनीम इस्माईल, कॅप, डी. क्लर्क प्रत्येकी एक बळी), दक्षिण आफ्रिका 20 षटकात 9 बाद 126 (लुस 28, वुलव्हर्ट 18, रणवीराने 3-18, सुगंदीका कुमारी 2 बाद 28, रणशिंगे 2-20).









