140 धावांनी उडवला धुव्वा : मालिकेत मात्र किवीज संघाचे 2-1 ने यश
वृत्तसंस्था/ ऑकलंड
श्रीलंकन संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा 140 धावांनी पराभव केला. ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये श्रीलंकेने झेनिथ लियानगे (53 धावा), पथुम निसांका (66 धावा), कुसल मेंडिस (54 धावा) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 8 बाद 290 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवी संघ 29.4 षटकांत 150 धावांवर गारद झाला. मार्क चॉपमनने 81 धावा केल्या. मात्र, न्यूझीलंडने याआधीच सलग पहिले दोन वनडे सामने जिंकून मालिका जिंकली होती. पण तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने यजमानांचा धुव्वा उडवत मालिकेचा शेवट गोड केला. लंकेच्या असिथा फर्नांडोला सामनावीर तर न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
तिसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडची फलंदाजी अत्यंत खराब झाली. हा सामना जिंकण्यासाठी लंकेने यजमान किवीज संघासमोर 291 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याचा पाठलाग करताना किवी संघ 29.4 षटकांत 150 धावांवर गारद झाला. या सामन्यात न्यूझीलंडच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ज्यामध्ये विल यंग (0), रचिन रवींद्र (1), डॅरिल मिशेल (2), टॉम लॅथम (0), ग्लेन फिलिप्स (0) आणि मिचेल सँटनर (2) यांचा समावेश होता. न्यूझीलंडकडून मार्क चॉपमनने सर्वाधिक 81 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारला, तरीही तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. या सामन्यात मार्क चॉपमनला संघातील इतर कोणाचीही साथ मिळाली नाही. ज्यामुळे किवीज संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेसाठी असिता फर्नांडो, महेश थिक्षना आणि इशान मलिंगा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
पथुम निसंकाची अर्धशतकी खेळी
प्रारंभी, श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकन फलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवला. लंकेकडून फलंदाजी करताना पथुम निसांकाने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय कुसल मेंडिसने 54 आणि जेनिथने 53 धावांची खेळी साकारली. याशिवाय कामिंदू मेंडिसने 46 धावांची खेळी साकारली. या जोरावर लंकेने 50 षटकांत 8 गडी गमावून 290 धावा केल्या. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मॅट हेन्रीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका 50 षटकांत 8 बाद 290 (निसंका 66, कुसल मेंडिस 54, कामिंदू मेंडिस 46, जेनिथ लियानगे 53, मॅट हेन्री 4 बळी, मिचेल सँटेनर 2 बळी).
न्यूझीलंड 29.4 षटकांत सर्वबाद 150 (मार्क चॉपमन 81, ब्रेसवेल 13, नॅथन स्मिथ 17, फर्नांडो, थिक्षणा व इशान मलिंगा प्रत्येकी तीन बळी).









