► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हे 21 जुलैपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. हा त्यांचा प्रथमच भारत दौरा असेल. द्विपक्षीय संबंध बळकट करणे हा या दौऱ्याचा हेतू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताच्या विदेश व्यवहार विभागाचे सचिव विनय मोहन क्वाट्रा पुढच्या आठवड्याच्या प्रारंभी श्रीलंकेला जात आहेत. त्यांच्या या दौऱ्यात विक्रमसिंघे यांच्या दौऱ्याची रुपरेषा आखण्यात येणार आहे. त्यानंतर या दौऱ्याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
श्रीलंकेची अर्थव्यवस्था सध्या नाजूक अवस्थेत असून गेल्या वर्षी तो देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. तत्कालीन अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन केल्यानंतर ऊर्वरित काळासाठी विक्रमसिंघे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 23 सप्टेंबरला त्यांचा कालावधी संपत आहे.
प्रकल्पांवर चर्चा होणार
भारताने श्रीलंकेत अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. ते पूर्ण करण्यासंबंधी विक्रमसिंघे यांची भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे. त्यांच्यासह त्या देशाचे अधिकारी सागला रतनायकेही भारतात येणार आहेत. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत किंचित सुधारणा दिसत आहे. भारताने अधिक साहाय्य केल्यास अर्थव्यवस्था वेगाने सुधारेल अशी श्रीलंकेची अपेक्षा आहे. भारताने त्या देशाला त्याच्या पडत्या काळात बरेच आर्थिक आणि सामग्री साहाय्य केलेले आहे. पूर्वापारपासून दोन्ही देशांचे संबंध राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जवळचे आहेत.









