विदेश मंत्री साबे यांचे विधान ः भारतच श्रीलंकेचा खरा मित्र
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अवघड समयी भारताने श्रीलंकेची सर्वाधिक मदत केली आहे. याचमुळे श्रीलंका नेहमीच भारताचा ऋणी अन् आभारी राहणार असल्याचे उद्गार त्याच्या विदेशमंत्र्यांनी काढले आहेत. नवी दिल्लीत आयोजित रायसीना हिल्स डायलॉगमध्ये भाग घेतल्यावर एका पॉडकास्टमध्ये श्रीलंकेचे विदेशमंत्री अली साब्रे यांनी संकटकाळात भारतानेच श्रीलंकेला मदत केल्याचे म्हटले आहे.
काही महिन्यांपूर्वी श्रीलंका दिवाळखोर ठरला होता. आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण झाली होती. या संकटकाळात भारत सरकारने अन्नधान्य, इंधन आणि औषधांसोबत सुमारे 3 अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन श्रीलंकेला पुरविले होते.
श्रीलंका आणि भारताचे संबंध ऐतिहासिक आहेत. आर्थिक संकटातून जात असलेल्या आमच्या देशाला केवळ भारत सरकारने मदत केली नाही तर भारतीय लोक देखील आमच्यासोबत उभे राहिले. भारतीय नागरिक हेच आमचे खरे मित्र आहेत. भारताने आमच्यासाठी जे केले, त्याबद्दल श्रीलंका नेहमीच त्याचा ऋणी राहणार असल्याचे उद्गार साब्रे यांनी काढले आहेत.
आमचा देश जेव्हा कर्जाच्या सापळय़ात सापडून दिवाळखोर झाला होता, तेव्हा भारतानेच सर्वप्रथम मदत पाठविली होती. दुसऱया कुठल्याच देशाला हे सुचले नव्हते. भारताने आम्हाला आयएमएफकडून कर्ज मिळवून दिले आणि याचमुळे आमची अर्थव्यवस्था रुळावर परतली असल्याचे श्रीलंकेच्या विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे.
चिनी कर्जामुळे श्रीलंकेवर संकट
एक दशकादरम्यान श्रीलंकेच्या सरकारांनी मोठय़ा प्रमाणात कर्जांची उचल केली, परंतु या रकमेचा वापर योग्य कारणासाठी करण्याऐवजी त्याचा दुरुपयोग करण्यात आला. 2010 पासूनच सातत्याने श्रीलंकेतील कर्जाचा भार वाढत गेला. श्रीलंकेवरील या कर्जात सर्वाधिक वाटा चीनचा होता. चीनने दिलेल्या कर्जावरील व्याज अधिक असल्याने श्रीलंकेवर हे संकट ओढवल्याचे मानले जाते.









