महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव भरून काढण्याचे आव्हान
वृत्तसंस्था/ पल्लेकेले
आशिया चषक स्पर्धेत श्रीलंका आणि बांगलादेश हे आज गुरूवारी येथे आमनेसामने येणार असून त्यावेळी मोहिमेची विजयी सुरूवात करण्याची त्यांची इच्छा राहील. त्याचबरोबर हल्लीच्या काळातील एकदिवसीय सामन्यांतील माफक फॉर्म आणि प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींवरही मात करण्यास ते उत्सुक असतील. 2022 मध्ये ‘टी20’ची आशिया चषक स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीलंकेला मंगळवारपर्यंत या स्पर्धेसाठी त्यांचा संघ जाहीर करता आला नव्हता. दुखापती आणि काही खेळाडूंना झालेला ‘कोविड-19’ संसर्ग.यास कारणीभूत ठरला आहे.

श्रीलंकेने वानिंदू हसरंगा, दुष्मंथा चमिरा, लाहिरू कुमारा आणि दिलशान मधुशनका यांना विविध दुखापतींमुळे गमावले आहे, तर 2021 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळलेला कुसल पेरेरा अद्याप कोविड-19 संसर्गातून पूर्णपणे ठीक झालेला नाही. पण हे धक्के बसण्याच्या आधी सुद्धा श्रीलंकेची यंदाची एकदिवसीय सामन्यांतील कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. त्यांनी वर्षाची सुरूवात भारताकडून 0-3 अशा फरकाने स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाने केली आणि नंतर न्यूझीलंडकडून 0-2 असा पराभव पत्करला. हरारे येथील आयसीसी पात्रता फेरीत चांगली धावसंख्या उभारण्यापूर्वी श्रीलंकेने अफगाणिस्तानला घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळविले होते. परंतु मजबूत प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध खेळ उंचावण्याच्या बाबतीत दिसून आलेली असमर्थता त्यांना चिंतीत करेल.
बांगलादेशला आव्हान देण्यासाठी त्यांच्या पथुम निसांका (2023 मध्ये 687 धावा), दिमुथ करूणारत्ने (481 धावा) व चरिथ असालंका (341 धावा) यांनी धावा जमविण्याची आवश्यकता आहे. ते या वर्षातील त्यांचे सर्वोत्तम फलंदाज राहिलेले आहेत. भारताविरूद्ध झळकावलेले शतक वगळता वर्षभर चमक न दाखवू शकलेल्या कर्णधार दसुन शनाकाला बांगलादेशविऊद्ध फॉर्म गवसेल, अशी आशाही त्यांना असेल. गोलंदाजीच्या आघाडीवर फिरकीपटू महेश थीक्षना (यंदा 10 सामन्यांत 23 बळी) आणि वेगवान गोलंदाज कसून रजिथा (14 बळी) यांना आघाडीच्या गोलंदाजांची अनुपस्थिती भरून काढावी लागेल.
श्रीलंकेसाठी एकमात्र दिलासा म्हणजे बांगलादेशची स्थिती देखील त्यांच्यासारखीच आहे. बांगलादेशला दुखापतग्रस्त तमिम इक्बाल, वेगवान गोलंदाज इबादत हुसेन आणि यष्टिरक्षक-फलंदाज लिटन दास यांना मुकावे लागले आहे. सहसा घरच्या मैदानावर पारडे जड राहिलेल्या बांगलादेशने यावर्षी इंग्लंड व अफगाणिस्तानविऊद्धच्या एकदिवसीय मालिका गमावल्या आहेत. त्यांच्या चिंता कमी करण्यास आयर्लंडवरचा विजय पुरेसा ठरणार नाही. तथापि, कर्णधार शकिब अल हसन, मुशफिकुर रहीम आणि नजमुल शांतो यांनी यावर्षी 400 हून अधिक, तर युवा खेळाडू तौहिद ह्रदोयने 300 हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच अनुभवी मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम आणि तस्किन अहमद यांनी यावर्षी गोलंदाजीच्या आघाडीवर चांगली कामगिरी केली आहे,
संघ : श्रीलंका-दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसान्का, दिमुथ कऊणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, कुसल मेंडिस, चरिथ असालंका, धनंजया डिसिल्वा, सदिरा समरविक्रमा, महेश थीक्षना, दुनिथ वेललागे, मथिशा पथिराना, कसून रजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो, प्रमोद मदुशन.
बांगलादेश-शकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम, अफिफ होसेन ध्रुबो, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरिफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक मेहदी हसन, नईम शेख, शमिम होसेन, तनजीद हसन तमीम, तनझिम हसन साकिब, अनामुल हक बिजॉय.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क









