वृत्तसंस्था/ कोलंबो
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 99 धावांनी पराभव केला. यासह, यजमान संघाने 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. श्रीलंकेने कसोटी मालिकाही 1-0 अशी जिंकताना बांगलादेशला धुव्वा उडवला आहे. लंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 285 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 186 धावांत आटोपला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यष्टीरक्षक कुसल मेंडिसने शतक झळकावले, ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
मंगळवारी पल्लेकेले येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने चौथ्या षटकातच सलामीवीर निशान मदुष्काची विकेट गमावली, तो फक्त 1 धाव करू शकला. त्यानंतर दुसरा सलामीवीर पथुम निसांकाने कुसल मेंडिससोबत अर्धशतकीय भागीदारी केली. तथापि, तो देखील 35 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कामिंदू मेंडिस फक्त 16 धावा काढून बाद झाला. त्याच्या पाठोपाठ कर्णधार चारिथ असलंकाने अर्धशतक झळकावले आणि कुसलसोबत शतकी भागीदारी केली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 124 धावा जोडल्या. असलंका 58 धावा करून बाद झाला. मेंडिसने शतक झळकावले, पण त्याच्यासमोर जानिथ लियानागेने 12, दुनिथ वेल्लालागेने 6, वानिंदू हसरंगा 18 आणि दुष्मंथा चामीराने फक्त 10 धावा केल्या. कुसल मेंडिस 124 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 7 विकेट गमावल्यानंतर 285 धावा केल्या.
286 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने फक्त 20 धावांत 2 विकेट गमावल्या. तन्जीद हसन तमीम 17 धावांवर बाद झाला आणि नझमुल हुसेन शांतो खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर परवेझ हसन इमॉनने तौहिद हृदॉयसोबत 42 धावा जोडल्या. इमॉनही 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 62 धावांत 3 विकेट गमावल्यानंतर तौहिद हृदॉयने अर्धशतक ठोकले, पण त्याच्यासमोर कर्णधार मेहदी हसन मिराज 28 धावा करून बाद झाला. शमीम हुसेनलाही फक्त 12 धावा करता आल्या. संघाचा स्कोअर 153 धावांवर असताना हृदॉयही पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर इतर फलंदाजानीही निराशा केल्याने बांगलादेशचा डाव 39.4 षटकांत 186 धावांत संपला. लंकन संघाने हा सामना 99 धावांनी जिंकता मालिकाही जिंकण्याचा पराक्रम केला.









