दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण, अटापटू, निलाक्षिका यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / कोलंबो
आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे यजमान लंका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला. या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लंकेने 50 षटकांत 6 बाद 258 धावा जमविल्या. लंकेचा डाव संपल्यानंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली आणि पंचांनी थोडावेळ वाट पाहून सामना रद्द झाल्याचे घोषित केले. त्यामुळे न्यूझीलंडच्या डावाला प्रारंभ होऊ शकला नाही. हा सामना पावसामुळे वाया गेल्याने आता लंकेचा संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात चार सामन्यातून केवळ दोन गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड संघाने गुणतक्त्यात तीन गुणांसह पाचवे स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत पावसामुळे वाया गेलेला हा दुसरा सामना आहे. लंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामनाही गेल्या आठवड्यात पावसामुळे वाया गेला होता.
लंकेच्या डावामध्ये कर्णधार अटापटूने 72 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 53 धावा झळकविल्या तर निलाक्षिका सिल्वाने 28 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 55 धावा झोडपल्या. गुणरत्नेने 42 धावांचे योगदान दिले. अटापटूने सलामीच्या गड्यासाठी 104 धावांची भागिदारी केली. हसिनी परेराने उपयुक्त 44 धावा केल्या. लंकेने पहिल्या पॉवरप्लेच्या 10 षटकात बिनबाद 52 धावा झोडपल्या होत्या. अटापटूचे वनडे क्रिकेटमधील हे 20 वे अर्धशतक आहे. गुणरत्नेने 83 चेंडूत 3 चौकारांसह 42 धावा केल्या. परेरा आणि समरविक्रमा यांनी 58 धावांची भागिदारी केली. दिलहारी 4 धावांवर बाद झाली. न्यूझीलंडतर्फे सोफी डिव्हाईनने 54 धावांत 3 तर इलिंगने 39 धावांत 2 तसेच मेयरने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : 50 षटकांत 6 बाद 258 (चमारी अटापटू 53, विशमी गुणरत्ने 42, हसिनी परेरा 44, समरविक्रमा 26, निलाक्षिका सिल्वा नाबाद 55, दिलहारी 4, अवांतर 21, डिव्हाईन 3-54, इलिंग 2-39, मेयर 1-29)









