वृत्तसंस्था/ नवी मुंबई
महिला विश्वचषक स्पर्धेत अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला आज सोमवारी बांगलादेश या दुसऱ्या संघर्ष करणाऱ्या संघाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या श्रीलंकेला या लढतीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा असेल.
बांगलादेशप्रमाणेच श्रीलंकेच्या खात्यात दोन गुण आहेत, परंतु दोन्हीही गुण पाऊस पडलेल्या सामन्यांतून त्यांना प्राप्त झालेले आहेत. पाच सामन्यांमधील तीन पराभवांमुळे विश्वचषक सह-यजमान संघ आठ संघांच्या स्पर्धेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशने त्यांच्या तुलनेत चांगली कामगिरी केलेली असून तळाच्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानविऊद्धच्या विजयामुळे त्यांना गुणतालिकेत त्यांचे खाते उघडण्यास मदत झाली होती. परंतु दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसारख्या इतर बलाढ्या संघांना जोरदार टक्कर देऊनही ते विजयाची रेषा पार करू शकलेले नाहीत. श्रीलंका आणि बांगलादेश दोघेही उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्याच्या बाबतीत हताश स्थितीत आहेत. उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये ते जिंकले, तरी त्यांना इतर निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.
आठ संघांपैकी कोणताही संघ अद्याप उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने दोन जागा निश्चित केल्या आहेत आणि भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या हे असे तीन संघ आहेत ज्यांना अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याची चांगली शक्यता आहे. श्रीलंकेला पावसामुळे कोलंबोमधून बाहेर पडल्याचा विशेष आनंद होईल, जिथे त्यांचे दोन सामने वाया गेले होते. सततच्या पावसाने चामारी अटापट्टूच्या संघाची घरच्या मैदानाचा फायदा घेण्याची संधी हिरावून घेतली. कारण त्यांचे सातपैकी सहा सामने आर. प्रेमदासा स्टेडियमवर ठेवण्यात आले.
नवी मुंबईत पावसाचा धोका नसला, तरी दिवस-रात्र सामन्यात हवामान उष्ण आणि दमट राहील. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविण्यात येणार असलेल्या स्पर्धेतील चार सामन्यांपैकी हा पहिला सामना असेल. या चार लढतींमध्ये एका उपांत्य सामन्याचा समावेश आहे. तथापि, श्रीलंकी संघाला पाकिस्तानविऊद्धच्या शेवटच्या सामन्यासाठी कोलंबोला परतावे लागेल. हवामान तो सामना पूर्ण खेळण्याची परवानगी देईल, अशी आशा त्यांना असेल. परंतु ते देखील पुरेसे ठरणार नाही आणि श्रीलंकेला आता इतरांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. श्रीलंकेला त्यांचे शेवटचे दोन सामने जिंकावे लागतीलच. इतकेच नव्हे, तर भारत त्यांचे उर्वरित तीन सामने गमावेल आणि इंग्लंड न्यूझीलंडवर विजय मिळवेल अशी आशाही धरावी लागेल.
त्याचप्रमाणे बांगलादेशला श्रीलंका आणि भारताविऊद्धचे उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील आणि न्यूझीलंड आणि भारताविऊद्धचे उर्वरित दोन सामने जिंकून इंग्लंड आपल्यावर उपकार करेल अशी आशा बाळगावी लागेल. बांगलादेशला वाटेल की, त्यांनी विविध विभागांमध्ये केलेल्या कामगिरीचा विचार करता ते श्रीलंकेपेक्षा चांगल्या स्थानावर आहेत. परंतु तरीही निगार सुलतानाच्या नेतृत्वाखालील संघाला क्षेत्ररक्षणात लक्षणीय सुधारणा करावी लागेल.
सामन्याची वेळ : दुपारी 3 पासून









