वृत्तसंस्था / अबुधाबी
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या पाचव्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 32 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. लंकेच्या कमिल मिश्राला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 20 षटकात 5 बाद 139 धावा जमविल्यानंतर लंकेने 14.4 षटकात 4 बाद 140 धावा जमवित विजय हस्तगत केला.
बागंलादेशच्या डावात जाकरअलीने 34 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 41 तर शमीम हुसेनने 34 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 42 धावा झळकविल्या. या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 86 धावांची भागिदारी केली. कर्णधार लिटॉन दासने 4 चौकारांसह 28 धावा जमविल्या. बांगलादेशच्या सलामीच्या जोडीला खातेही उघडता आले नाही. मेहदीहसनने 1 चौकारासह 9 तर रिदॉयने 8 धावा जमविल्या. लंकेतर्फे हसरंगाने 2 तर तुषारा आणि चमिरा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बांगलादेशच्या डावात 1 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावामध्ये सलामीच्या पी. निशांकाने 34 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 50 धावा झळकविताना कमिल मिश्रा समवेत दुसऱ्या गड्यासाठी 95 धावांची भागिदारी केली. कमिल मिश्राने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 32 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 46 धावा जमविल्या. कुशल मेंडीस 3 तर कुशल परेरा 9 आणि शनाका 1 धावेवर बाद झाले. कर्णधार असालेंकाने 1 षटकारासह नाबाद 10 धावा केल्या. लंकेच्या डावात 21 अवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 16 व्हाईड चेंडूंचा समावेश आहे. लंकेच्या डावामध्ये 4 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे मेहदीहसनने 2 तर रेहमान आणि टी. हसन शकीब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश 20 षटकात 5 बाद 139 (दास 28, जाकरअली नाबाद 41, शमीम हुसेन नाबाद 42, अवांतर 11, हसरंगा 2-25, तुषारा आणि चमिरा प्रत्येकी 1 बळी), लंका 14.4 षटकात 4 बाद 140 (पी. निशांका 50, कमिन मिश्रा नाबाद 46, असालेंका नाबाद 10, अवांतर 21, मेहदीहसन 2-29, रेहमान आणि टी. हसन शकिब प्रत्येकी 1 बळी)









