दिलशान मधुशंकाची हॅट्ट्रिक : निसांका, लियानागे आणि कामिंदूची अर्धशतके
वृत्तसंस्था/ हरारे
डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा 7 धावांनी पराभव केला. यासह, श्रीलंकन संघाने 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 6 विकेट्स गमावून 298 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान झिम्बाब्वे संघाला 291 धावापर्यंतच मजल मारता आली.
प्रारंभी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 9 धावांवर आपला पहिला बळी गमावला. निशान मदुष्काला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनी मिळून शतकी भागीदारी साकारत संघाला सावरले. निसांकाने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 92 चेंडूत 12 चौकारासह 76 धावांची खेळी केली. तर कुसल मेंडिसने 38 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा आणि शॉन विल्यम्स यांनी मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजीवर दबाव आणला. 37 वे षटक सुरू झाले, तेव्हा श्रीलंकेचा रनरेट 4.5 पेक्षा कमी होता. पण, जानिथ लियानागे आणि कामिंदू मेंडिस यांच्या समजूतदार फलंदाजीने श्रीलंकेचा डाव उलटला. त्यांनी वेगवान सुरुवात केली. दोघांनी मिळून 83 चेंडूत 137 धावा जोडल्या आणि संघाला 6 बाद 298 धावापर्यंत मजल मारुन दिली. लियानागेने 47 चेंडूत नाबाद 70 धावा आणि कामिंदूने 36 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून नगारावा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 34 धावा देऊन 2 बळी घेतले.
झिम्बाब्वेची झुंज अपयशी
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली. सुरुवातीला दोन धक्के बसल्यानंतर बेन करनने 8 चौकारासह 70 धावांची खेळी साकारली. याशिवाय, कर्णधार सीन विल्यम्सने 57 तर सिकंदर रझाने 8 चौकारासह 92 धावांचे योगदान दिले. दरम्यान, सिकंदर रझा 92 धावावंर खेळत होता. तर रझासोबत टोनी मुनियोंगा 43 धावांसह मैदानात होता. रझा-टोनी सेट जोडी मैदानात होती. त्यामुळे झिम्बाब्वे जिंकेल, असे वाटत होते. श्रीलंकेने मधुशंकाला शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी दिली. मधुशंकाने कर्णधार चरिथ असलंकाचा विश्वास खरा ठरवला. मधुशंकाने पहिल्या बॉलवर सिंकदर रझाला बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर त्याने दुसऱ्या बॉलवर इव्हान्सला माघारी धाडले. रिचर्ड नगारावाला बोल्ड करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यामुळे झिम्बाब्वेला पुढील 3 बॉलमध्ये 10 धावा हव्या होत्या. मात्र मधुशकांने 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा दिल्या. मधुशंकाने एकूण 4 विकेट्स घेतल्या. मधुशंकाला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका 50 षटकांत 6 बाद 298 (पथुम निसांका 76, कुसल मेंडिस 38, लियानागे नाबाद 70, कामिंदू मेंडिस 57, नगारावा 2 बळी)
झिम्बाब्वे 50 षटकांत 8 बाद 291 (बेन करन 70, सीन विल्यम्स 57, सिकंदर रझा 92, मुनियोंगा नाबाद 43, असिथा फर्नांडो 3 बळी, दिलशान मधुशंका 4 बळी)









