गॅले / वृत्तसंस्था
लंकेविरुद्ध 6 वर्षांपूर्वी 0-3 फरकाने धक्कादायक पराभव पत्करावा लागलेला ऑस्ट्रेलियन संघ आजपासून खेळवल्या जाणाऱया 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी प्रयत्नशील असेल. उभय संघातील पहिली कसोटी आजपासून गॅले येथे सुरु होत आहे. पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल.
ऑस्ट्रेलियाने अलीकडेच मार्चमध्ये पाकिस्तानला त्यांच्या भूमीत 1-0 अशा फरकाने नमवले आहे. लंकेतील खेळपट्टय़ा फिरकी गोलंदाजीला पोषक असतील. मात्र, रंगना हेराथ व दिलरुवन परेरा यांच्यासारख्या अव्वल खेळाडूंची त्यांना प्रकर्षाने उणीव जाणवू शकते. हेराथ व परेरा यांनी 2016 मधील मालिकेत एकत्रित 43 बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडले होते. लंकन संघ या मालिकेत डावखुरे फिरकीपटू लसिथ एम्बुल्डेनिया व प्रवीण जयविक्रमा तसेच ऑफस्पिनर रमेश मेंडिस यांना खेळवण्याची शक्यता आहे. लेगस्पिनर जेफ्री व्हॅन्डरसे हा नवोदित लेगस्पिनर संधीच्या प्रतीक्षेत आहे.
श्रीलंकन मध्यमगती गोलंदाजीची आघाडी असिथ फर्नांडो व कसून रजिथा यांच्यामुळे फिरकी आघाडीपेक्षा सरस आहे. याच दोघांनी अलीकडेच बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका जिंकून दिली होती.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडे 108 सामन्यात 427 बळी घेणारा नॅथन लियॉन हा अव्वल फिरकीपटू ताफ्यात असून त्याला लेगस्पिनर मिशेल स्वेप्सनची साथ मिळू शकेल. स्वेप्सनने पाकिस्तानविरुद्ध 2 कसोटीत 2 बळी घेतले होते.
श्रीलंकेत सध्या महागाईने हाहाकार माजवला असून गॅले स्टेडियमच्या बाहेरच गॅस सिलिंडरसाठी मोठय़ा रांगा लागल्याचे मंगळवारी चित्र होते. सध्या लंकन प्रशासनाने केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत असलेल्या वाहनांनाच इंधन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या क्रिकेट मालिकेच्या माध्यमातून लंकन प्रेक्षक काही काळ हा प्रतिकूल परिस्थितीचा वणवा बाजूला सारुन क्रिकेटचा आनंद घेऊ शकतील, अशी लंकन मंडळाला अपेक्षा आहे.
संभाव्य संघ
श्रीलंका ः पथूम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कुशल मेंडिस, अँजिलो मॅथ्यूज, धनंजया डीसिल्व्हा, दिनेश चंडिमल, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, लसिथ एम्बुल्डेनिया, असिथ फर्नांडो, कसून रजिथा/ जेफ्री व्हॅन्डरसे.
ऑस्ट्रेलिया ः उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशाने, स्टीव्हन स्मिथ, ट्रव्हिस हेड/ ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरुन ग्रीन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लियॉन, मिशेल स्वेप्सन.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ ः सकाळी 10 वा., थेट प्रक्षेपण ः सोनी स्पोर्ट्स नेटवर्क.









