वृत्तसंस्था /हंबनटोटा (श्रीलंका)
श्रीलंकेने गेल्या काही वर्षांत मोठ्या स्पर्धांपूर्वी गोलंदाजीतील खास प्रतिभा दाखवलेली आहे. लसिथ मलिंगाच्या बाबतीत 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यादम्यान त्याला पुढे आणले गेले. अजंथा मेंडिसच्या बाबतीत त्याची ओळख आशिया चषकाच्या किंचित पूर्वी करून देण्यात आली आणि त्याने 2008 मधील सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताविऊद्ध सहा बळी घेऊन श्रीलंकेला चषक मिळवून दिला. याच धर्तीवर 20 वर्षीय मथीशा पाथिराना आज शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविऊद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. पाथिराना फक्त एक ‘टी20’ आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला असला तरी, चेन्नई सुपर किंग्सच्या विक्रमी पाचव्या इंडियन प्रीमियर लीग विजेतेपदात त्याने महत्त्वाची भूमिका बजावलेली असून त्यामुळे तो आधीच ‘स्टार’ खेळाडू बनलेला आहे. पाथिराना राऊंड-आर्म शैलीने गोलंदाजी करतो आणि झिम्बाब्वे येथे या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या विश्वचषक पात्रता फेरीदरम्यान तो प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना भारी ठरेल अशी आशा श्रीलंका बाळगून आहे. 1996 च्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या आणि दोनदा उपविजेते ठरलेल्या श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या एकदिवसीय क्रमवारीत घसरण झाल्यामुळे पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरल्याने अफगाणिस्तानसमोर मात्र अशी कोणतीही समस्या नाही. गोलंदाजी ही अफगाणिस्तानची ताकद असून त्यांचे तीन खेळाडू आयसीसीच्या अव्वल 10 गोलंदाजांच्या यादीत आहेत. लेगस्पिनर रशिद खानला पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे.









