अध्याय सहावा सारांश
ह्या अध्यायाचे नाव बुद्धियोग असे असून त्यामध्ये गणेशतत्व जाणून घेण्याबद्दल बाप्पांनी उपदेश केलेला आहे. स्वत:चा उद्धार करून घेणे हे माणसाचे ध्येय असायला हवे. नुसते चांगले वागून उद्धार होत नाही तर त्यासाठी ईश्वरीतत्व किंवा ईश्वराचे सगुण रूप असलेल्या श्रीगणेशाचे तत्व जाणून घ्यायला हवे. ते जाणले की, कर्मबंधनातून सुटका होते. मुक्ती मिळवण्याचे हेच एक साधन आहे. ते जाणण्यासाठी प्रथम प्रकृती म्हणजे मायेचे ज्ञान होणे आवश्यक आहे. पंचमहाभूते, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, सूर्य, चंद्र आणि यजमान ह्यांनी ही प्रकृती तयार होते. ही जड माया होय. श्री गणेश हिच्या सहाय्याने सृष्टीरचना करतात आणि चेतन मायेच्या सहाय्याने तिला सजीव करतात. हे मायेचे दोन्ही प्रकार ईश्वराच्या नजरेखाली काम करतात. त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि लय ह्या तिन्ही क्रिया ईश्वराच्या मर्जीनुसार होत असतात.
वर्ण आणि आश्रमांची निर्मिती ईश्वराने केलेली असून त्यानुसार मिळालेले काम जे निरपेक्षतेने करतात त्यांना पूर्वी केलेल्या पुण्यकर्मामुळे ईश्वरी तत्व जाणून घेण्याची इच्छा होते. अशा अनेक साधकांपैकी एखाद्यालाच ईश्वरीतत्वाचा साक्षात्कार होतो. त्याला सर्व विश्व ईश्वरव्याप्त आहे असे दिसल्याने तो ईश्वरातच सर्व विश्व पाहतो. ईश्वर सर्वत्र वास करून असतात. पृथ्वीमध्ये ईश्वर सुगंध रूपाने, अग्नीत तेज रूपाने, सूर्यचंद्रात प्रभेच्या रूपाने आणि पाण्यात रस रूपाने वास करत असतात. बुद्धिमान, तपस्वी आणि बलवान ह्यांच्यामध्ये बुद्धी, बल, तप ह्यांच्या रूपाने ईश्वर वास करून असतात.
जागृती, स्वप्न आणि सुषुम्ना ह्या तिन्ही अवस्था माणसाचे जीवन सुसह्य होण्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याने त्यातही ईश्वर असतो. थोडक्यात माणसाला मिळालेले जीवन त्याने आनंदाने व्यतीत करण्याच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे त्यात ईश्वराचा वास असतो. मायेच्या मोहाने ग्रस्त झालेले पापी लोक मात्र वर सांगितलेले ईश्वरी अस्तित्व नाकारतात. त्यांना ईश्वराने निर्माण केलेल्या इच्छा, दु:ख, सुख ह्या विकारांच्या मार्फत माया मोहात पाडते. आत्मस्वरूपाचा विसर पडल्याने मनुष्य मोहाच्या जाळ्यात सापडतो. जो मोहाचा त्याग करेल त्याला ईश्वरीतत्वाचे ज्ञान होईल. मोहाचा त्याग करणे सहजसोपी गोष्ट नसल्याने त्यासाठी अनेक जन्म साधना करावी लागते.
माणसे आपापल्या आवडीप्रमाणे निरनिराळ्या देवांना भजतात पण ती सर्व ईश्वराचीच रूपे असल्याने तो त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. ईश्वर सर्वांना जाणून असले तरी त्यांना मात्र कुणी जाणत नाही. ईश्वराचे निर्गुण, निराकार असलेले मूळ स्वरूप मोहमायेच्या आवरणाने झाकले गेलेले लोक जाणू शकत नाहीत. अशा लोकांच्या हातून पापकर्मे घडत असल्याने ईश्वर त्यांना दिसत नाही. ज्याच्या हे लक्षात आलेले आहे ते सदैव आवडीच्या दैवताच्या स्मरणात राहून अंतकाळी त्याचे स्मरण करतात आणि त्या दैवताच्या लोकाला जातात. जो ईश्वराचे म्हणजे श्रीगणेशाचे स्मरण करतो तो मात्र ईश्वराला जाऊन मिळतो. त्यादृष्टीने जे प्रयत्न करतात, त्यांच्या योगक्षेमाची जबाबदारी ईश्वर घेतो. जे ईश्वराच्या सदैव स्मरणात राहतात ते अंतकाळी ईश्वराच्या स्मरणात देह ठेवतात. असे लोक सूर्यमार्गाने जाऊन ईश्वराला मिळतात. जे ईश्वराचे स्मरण करत नाहीत पण आयुष्य सत्कर्मे करण्यात घालवतात ते त्यांच्या पुण्यसाठ्याच्या जोरावर चंद्रमार्गाने स्वर्गात जातात. तेथे पुण्यासाठा संपल्यावर त्यांचा मनुष्ययोनीत पुनर्जन्म होऊन, स्वत:चा उद्धार करून घेण्याची आणखी एक संधी त्यांना मिळते. जे दुष्कृत्ये करून आयुष्य वाया घालवतात त्यांचा पुढील जन्म मात्र नीच योनीत होतो.
सारांश समाप्त








