केएससीए 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक 16 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून श्री दुर्गा स्पोर्ट्स अकादमी संघाने युनियन जिमखाना ब संघाचा, तेजल शिरगुप्पी अकादमीने लक्ष क्रिकेट अकादमीचा पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळवले. आरआयएस हूबळी मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनियन जिमखाना ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 24 षटकात 8 गडी बाद 105 धावा केल्या. त्यात मोहम्मद हमजा सराफने 5 चौकारासह 32, आदित्यने 3 चौकारासह 17 तर साईराज पोरवालने 2 चौकारासह 11 धावा केल्या. दुर्गा स्पोर्ट्स तर्फे अभिलाष एस व जॉय सोल्लद यांनी 6 धावात प्रत्येकी 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना श्री दुर्गा स्पोर्ट्स अकादमीने 21.3 षटकात 2 गडी बाद 106 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला, त्यात जॉय सोल्लदने 4 चौकारासह नाबाद 46, अभिनव शर्माने 5 चौकारासह 41, अमोदने 15 धावा केल्या. जिमखाना तर्फे सुहास व अद्वैत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तेजल शिरगुप्पी क्रिकेट अपॅडमीने प्रथम फलंदाजी करताना 36 षटकात 7 गडी बाद 199 धावा केल्या. त्यात अर्जुन गोटेने 9 चौकारासह 61, प्रतीत जमगीने 6 चौकारासह 51, हरीशगौडाने 16, रेनक पवारने 13 धावा केल्या. लक्ष क्रिकेट अकादमी ब तर्फे प्रितम कामते व गौरव परिट यांनी 39 धावात प्रत्येकी 2 तर राजवीर, स्वयम् यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना लक्ष क्रिकेट अकादमीने 34 षटकात 9 गडी बाद 118 धावा केल्या. त्यात प्रतीकेने 5 चौकारासह 34, आदर्श पाटीलने 3 चौकारासह 24 धावा केला. तेजल शिरगुप्पीतर्फे अक्षम एमने 17 धावात 3, हर्षितगौडा व अनुप हनी गिरी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.









