सनरायझर्स हैदराबाद 5 गड्यांनी पराभूत, सामनावीर कृणाल पंड्याची अष्टपैलू कामगिरी
वृत्तसंस्था/ लखनौ
2023 च्या टाटा आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील येथे शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या दहाव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने आपला दुसरा विजय नोंदविताना सनरायजर्स हैदराबादचा 5 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात कृणाल पंड्याने अष्टपैलू कामगिरीचे दर्शन घडविताना गोलंदाजीत 18 धावात 3 तर फलंदाजीत 23 चेंडूत 34 धावा फटकावल्या.

सनरायझर्स हैद्राबादने यजमान लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 122 धावांचे आव्हान दिले. लखनौ संघाने आपल्या अचूक आणि भेदक गोलंदाजी तसेच चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर हैद्राबादला 20 षटकात 8 बाद 121 धावांवर रोखले. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने 16 षटकात 5 बाद 127 धावा जमवित हा सामना 4 षटके बाकी ठेऊन 5 गड्यांनी जिंकला.

या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अनमोलप्रीत सिंग आणि मयांक अगरवाल यांनी सलामीच्या गड्यासाठी 17 चेंडूत 21 धावांची भागीदारी केली. कृणाल पंड्याने अगरवालला 8 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर अनमोलप्रीत सिंग व राहूल त्रिपाठी यांनी दुसऱ्या गड्यासाठी 29 धावांची भर घातली. डावातील आठव्या षटकात अनमोलप्रीत सिंग आणि मार्करम पाठोपाठच्या चेंडूवर बाद झाले. पंड्याने अनमोलप्रीत सिंगला पायचीत केले. त्याने 26 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31 धावा जमविल्या. त्यानंतर पंड्याने कर्णधार मार्करमचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडविला. राहुल त्रिपाठी आणि अब्दुल समद यांच्या समयोचीत फलंदाजीमुळे हैदराबाद संघाला 121 धावांपर्यंत मजल मारता आली. त्रिपाठीने 41 चेंडूत 4 चौकारांसह 34, वॉशिंग्टन सुंदरने 28 चेंडूत 16, अब्दुल समदने 10 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 21, आदिल रशिदने 1 चौकारासह 4 धावा जमविल्या. लखनौच्या गोलंदाजांनी केवळ 2 वाईड चेंडू टाकले. हैदराबादच्या डावात 3 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. लखनौ संघातर्फे कृणाल पंड्याने 18 धावात 3, अमित मिश्राने 23 धावात 2, यश ठाकूरने 23 धावात 1 तर बिश्नोईने 16 धावात 1 गडी बाद केला.
लखनौची दमदार सुरुवात

प्रत्युत्तरादाखल खेळताना लखनौ संघाच्या डावाला मेयर्स आणि कर्णधार के. एल. राहुल यांनी दमदार सुरुवात करुन देताना 27 चेंडूत 35 धावांची भागीदारी केली. फारुकीने मेयर्सला झेलबाद केले. त्याने 14 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. भुवनेश्वर कुमारने स्वत:च्या गोलंदाजीवर हुडाला टिपले. त्याने 8 चेंडूत 1 षटकारासह 7 धावा केल्या. कर्णधार के. एल. राहुल आणि कृणाल पंड्या यांनी तिसऱ्या गड्यासाठी 6.2 षटकात 55 धावांची भागीदारी केली. संघाचे शतक फलकावर लागल्यानंतर कृणाल पंड्या उमरान मलिकच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 23 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 34 धावा जमविल्या. आदिल रशिदने राहुलला पायचीत केले. त्याने 31 चेंडूत 4 चौकारांसह 35 धावा जमविल्या. आदिल रशिदने नंतर पुढील चेंडूवर शेफर्डलाही खाते उघडण्यापूर्वी पायचीत केले. 14.2 षटकात लखनौने 5 बाद 114 धावा जमविल्या होत्या. स्टोईनिस आणि पूरन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. स्टोईनिसने 13 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 10 धावा केल्या. पूरनने 15 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार खेचला. त्याने 6 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 11 धावा जमविल्या. हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी लखनौला वाईड चेंडूच्या रुपात 15 धावा दिल्या. लखनौच्या डावामध्ये 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. हैदराबाद संघातर्फे आदील रशिदने 2 तर भुवनेश्वर कुमार, फारुकी आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – सनरायजर्स हैदराबाद : 20 षटकात 8 बाद 121 (अनमोलप्रीत सिंग 31, अगरवाल 8, मार्करम 0, ब्रुक 3, वॉशिंग्टन सुंदर 16, अब्दुल समद नाबाद 21, आदिल रशिद 4, उमरान मलिक 0, अवांतर 4, कृणाल पंड्या 3-18, अमित मिश्रा 2-23, यश ठाकुर 1-23, बिश्नोई 1-16).
लखनौ सुपर जायंट्स : 16 षटकात 5 बाद 127 (मेयर्स 13, के. एल. राहुल 35, हुडा 7, कृणाल पंड्या 34, स्टोईनिस नाबाद 10, शेफर्ड 0, पूरन नाबाद 11, अवांतर 17, आदिल रशिद 2-23, भुवनेश्वर कुमार 1-19, फारुकी 1-13, उमरान मलिक 1-22).








