वृत्तसंस्था / टोकियो
येथे सुरू असलेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा पुरूष अॅथलेटिक मुरली श्रीशंकर तसेच महिला धावटपटू पारुल यांना अंतिम फेरीपासून वंचित व्हावे लागले.
पुरूषांच्या लांबउडी प्रकारात पात्र फेरीमध्ये मुरली श्रीशंकरला 14 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुरली श्रीशंकरची ही तिसरी विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा आहे. त्याने अ गटातील पात्र फेरीमध्ये 7.78 मी.चे अंतर नोंद केले. पात्र फेरीमध्ये एकूण 37 स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता आणि श्रीशंकरला 25 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. 26 वर्षीय मुरली श्रीशंकरला सलग दुसऱ्यांदा विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आली नाही. अमेरिकेत 2022 साली झालेल्या विश्व अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत श्रीशंकरने अंतिम फेरी गाठली होती आणि तो सातव्या स्थानावर होता. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. पुरूषांच्या लांबउडी या प्रकारात 2023 साली त्याने 8.41 मी. ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदविली होती.
महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेस क्रीडा प्रकारात भारताच्या पारुल चौधरी आणि अंकिता ध्यानी यांनी साफ निराशा केली. पारुल नवव्या स्थानावर तर अंकिता अकराव्या स्थानावर राहिल्या. पारुलने 9 मिनिटे 22.24 सेकंदांचा अवधी घेतला तर बेंगळूरमध्ये सराव करीत असलेल्या अंकिता ध्यानीने 10 मिनिटे 03.22 सेकंदांचा अवधी नोंदविला. पुरूषांच्या 110 मी. अडथळा शर्यतीमध्ये भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर तेजस शिरसेला उपांत्य फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. त्याने या क्रीडा प्रकारात 13.57 सेकंदांचा अवधी घेत 29 वे स्थान मिळविले.









