वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आशियाई खेळांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी भारताचा लांब उडीतील अॅथलीट मुरली श्रीशंकरने पुढील आठवड्यात युजिन येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीला सहनभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई खेळांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून ही माहिती चाहत्यांना देण्यात आली आहे. डायमंड लीगच्या अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीशंकर हा पहिला भारतीय लांब उडीपटू आहे, हेही त्यात नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबरच्या सुऊवातीला झुरिच डायमंड लीगमध्ये केलेल्या कामगिरीनंतर श्रीशंकरने 16 व 17 सप्टेंबरदरम्यान युजिन येथे होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. श्रीशंकरने तेथील पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत 7.99 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह पाचवे स्थान मिळविले होते. स्पर्धेत अर्ध्याहून अधिक काळ पदकांसाठीच्या शर्यतीत राहिलेल्या श्रीशंकरला स्पर्धेच्या उत्तरार्धात इतरांच्या कामगिरीशी बरोबरी करता आली नव्हती आणि तो क्रमवारीत घसरला होता.
या स्पर्धेत ग्रीसच्या मिल्टिडियास टेंटोग्लूने 8.20 मीटर लांब उडी मारून सुवर्णपदक पटकावले, तर तमाय गेलने 8.07 मीटर उडी मारून दुसरे स्थान पटकावले. तिसरा क्रमांक अमेरिकेच्या लॉसन जॅरियनने 8.05 मीटर उडीसह मिळवला. आशियाई खेळ 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान चीनमधील हांगझाऊ येथे होणार आहेत. त्याकरिता अॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांत पात्र ठरलेल्या 65 खेळाडूंपैकी श्रीशंकर हा एक आहे. या खेळाडूंच्या यादीत पुरुषांच्या भालाफेकमध्ये जागतिक विजेता नीरज चोप्रा, किशोरकुमार जेना, पुऊषांच्या गोळाफेकमध्ये तजिंदरपाल सिंग तूर, पुऊषांच्या लांब उडीमध्ये जेस्विन ऑल्ड्रिन, महिलांच्या भालाफेकमध्ये अन्नू राणी, महिलांच्या 100 मीटर हर्डल्स व 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत ज्योती याराजी यांचा समावेश आहे.









