वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय पुरुष हॉकी संघाचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेश या क्षणी त्याच्या भावी वाटचालीवर भाष्य करू पाहत नसला आणि पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्तीसंदर्भात निर्णय घेणार असला, तरी हा अनुभवी गोलरक्षक 2036 पर्यंत राष्ट्रीय हॉकी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची इच्छा बाळगून आहे.
या वर्षी चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असलेल्या श्रीजेशने पॅरिसमधील आगामी ऑलिम्पिक ही त्याची शेवटची स्पर्धा असेल हे मानण्यास नकार दिला आहे. तो आशावादी असला, तरी एकदा या खेळाचा खेळाडू या नात्याने निरोप घेतल्यानंतर निश्चितपणे हॉकीसाठी वेगळ्या पद्धतीने योगदान देण्याची त्याची इच्छा आहे.
माझ्यासाठी हे ऑलिम्पिक खरोखर महत्त्वाचे आहे. कारण या वयात पुढील चार वर्षांनंतर काय घडेल याविषयी बोलणे माझ्यासाठी खरोखर कठीण आहे. गेल्या ऑलिम्पिकपासून मी एका वेळी फक्त एकेका वर्षाचा विचार करत आलेलो आहे. बाकीचा निर्णय मी ऑलिम्पिकनंतर घेईन, असे श्रीजेशने एका मुलाखतीत सांगितले आहे. आपल्याला हे आपले शेवटचे ऑलिंपिक असेल असे वाटत नाही, असेही त्याने म्हटले आहे.
पण माझ्या कारकिर्दीनंतर मी निश्चितपणे ब्रेक घेईन. मला खेळाडूपासून प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक किंवा गोलरक्षण प्रशिक्षक अशा कोणत्याही भूमिकेत शिरण्यासाठी वेळ लागेल. माझी योजना दीर्घकालीन म्हणजे 2036 किंवा 2040 साठीची आहे, असे श्रीजेशने म्हटले आहे. मला स्वत:ला सुधारायचे आहे. मला त्या काळात भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा प्रशिक्षक किंवा मुख्य प्रशिक्षक म्हणून स्वत:ला पाहायचे आहे. कारण तोपर्यंत मी अधिक अनुभवी होईल. मला राष्ट्रीय हॉकी संघाच्या स्वतंत्र प्रशिक्षण पथकाचे भाग बनायचे आहे, असे त्याने त्याच्या योजनांबद्दल बोलताना सांगितले आहे.
2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केलेल्या श्रीजेशने टोकियो गेम्समधील भारताच्या ऐतिहासिक कांस्यपदक विजेत्या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्याच्या संघात पॅरिसमध्ये चांगले निकाल देण्याची क्षमता आहे, असे मत श्रीजेशने व्यक्त केले आहे.









