सांगली / संजय गायकवाड :
सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांची मिळून महापालिका होवून आता जवळपास २६ वर्षांचा कालावधी लोटला आहे. पण या कालावधीत जिल्हयाचे मुख्यालय असणाऱ्या सांगलीसारख्या शहरातील चौकांच्या समस्या मात्र जैसे थे आहेत, केवळ सांगली शहरात लहान मोठे मिळून ३० पेक्षा अधिक चौक आहेत, पार्कीग, अरूंद रस्ते, रिक्षा आणि हातगाडयांचा गराडा या समस्यांनी चौकांना ग्रासले आहे. चौकांच्या समस्यांकडे महापालिकेबरोबरच पोलीस वाहतूक शाखेचेही दुर्लक्ष झाले आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची गर्दी यामुळे चौकांची रयाच गेली आहे. पालिकेतील प्रशासक म्हणून आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी लक्ष घातले तर सांगलीच नव्हे तर महापालिका क्षेत्रातील चौक अगदी कमी वेळेत समस्यांच्या विळख्यातून मुक्त होवू शकतात अशी आशा आहे. त्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखविण्याची आवश्यकता आहे. पालिका व वाहतूक पोलीसांच्या अक्ष्यम दुर्लक्षामुळे शहरातील सर्वच रस्ते आणि चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होऊ लागली आहेत. शहरात रोज एक अपघात होत असून त्यात शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
राज्यातील अन्य महापालिका व शहरांच्या तुलनेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा विचार केला तर सांगली मिरजेत गेल्या २६ वर्षात अपवाद वगळता अनेक प्रमुख चौक व रस्त्यांचे रूंदीकरण झालेले नाही. यापुर्वीच्या काही आयुक्तांनी याबाबत धाडस दाखविले. पण रस्ते व चौकांचे रूंदीकरण पुर्ण क्षमतेने झालेले नाही. काळाच्या ओघात पुर्वी जी काही कामे झाली ती आता एकतर अपुरी व मागे पडल्याचे दिसून येत आहे. सांगलीत अपवाद वगळता चारपदरी रस्ते नाहीत. अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे यावर कारवाई करायला गेले की लोकप्रतिनिधी आडवे पडतात. यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण मोहिमेला खो बसतो. पुढे बरेच दिवस ही मोहिम सुरू होत नाही. राजकीय दबावामुळे शहरात आयुक्तांना काही चांगली कामे करता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मनपा क्षेत्रामध्ये सांगली ते इस्लामपूर पेठ, सांगली ते कोल्हापूर, सांगली ते माधवनगर, सांगली ते मिरज, सांगली ते कुपवाड यासह धामणी रोड, हरिपूर रोड, म्हैसाळ रोड, कुपवाड ते बुधगाव रोड, जुना बुधगाव रोड, कर्नाळ रोड असे काही प्रमुख रोड सांगली शहराला जोडलेले आहेत. या रस्त्यांच्या प्रवेशद्वारावरच चौकही आहेत. हे चौक अरूंद असल्याने एसटी बस, आराम गाडया व ट्रॅक्टर अशी वाहने अजिबात वळू शकत नाहीत. ही वाहने वाहतुकीचे नियम तोडून कोणत्याही मार्गाने पुढे नेतात. त्यातून अपघात व लोकांचे प्राण जातात. अशा घटना यापुर्वी सांगलीमध्ये शिवाजी मंडई आणि काँग्रेस कमिटी येथील समोरील चौकामध्ये घडलेल्या आहेत.
- चौकांचे रूंदीकरण नाही
अत्यंत गर्दीच्या व दाटीवाटीच्या ठिकाणी असणाऱ्या राजवाडा चौक, झुलेलाल चौक यासह काही प्रमुख चौकांना रिक्षा व हातगाड्यांनी विळखा घातलेला आहे. त्याकडे मनपा व वाहतुक पोलीसांचे दुर्लक्ष झाले आहे. शहर पोलीस स्टेशन आणि महापालिका मुख्यालय व राजवाडा चौकातही मोठी समस्या आहे. दुसरीकडे अनेक चौकांना मोकाट जनावरांनी गराडा घातलेला असतो. त्यामुळे वाहनचालकांना या जनावरांच्या मधून कशीबशी वाट काढत पुढे पुढे जावे लागते. यामध्ये जर एखादे जरी जनावरे भुजले तरी दुचाकी वाहनचालकांवर डोळे पांढरे करण्याची वेळ येते. सांगली ते माधवनगर रोडवर जकात नाका व लक्ष्मीनगरच्या कोपऱ्यावर ही समस्या आहे. अनेक चौकातील वाहतुकीचे दिवे कधी सुरू तर कधी बंद असतात. कॉलेज कॉर्नरसारख्या अत्यंत वर्दळीच्या चौकात लाईटच नाही. मनपाच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही त्यात सुधारणा होत नाही.
मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच सांगली
- सांगलीतील या ३० चौकांमध्ये समस्यांचा डोंगर
कॉलेज कॉर्नर, आमराई चौक, राजवाडा चौक, काँग्रेस कमिटी चौक, राममंदिर चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक, झुलेलाल चौक, शास्त्री चौक, टिळक चौक, शिवाजी मंडई चौक, गारपीर चौक, मार्केट यार्ड चौक, विश्रामबाग चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, सांगलीवाडी चौक, बायपास रोड चौक, स्फुर्ती चौक, जुना बुधगाव रोड चौक, विजयनगर चौक, शंभर फुटी कॉर्नर चौक, शिवशंभो चौक, पटेल चौक, तानाजी चौक, गारमेंट चौक, अंकली फाटा चौक, साखर कारखाना चौक, माधवनगर जकात नाका चौक, कदमवाडी चौक, बापट बाल चौक, अमरधाम स्मशानभुमीसमोरील चौक, सुतगिरणी चौक
- मनपा व पोलिसांचे दुर्लक्ष
चौकांचे रूंदीकरण प्रलंबित त्यामुळे वाहने वळताना अडचण होते. रिक्षा व हातगाड्यांचा चौकांना विळखा आहे. अनेक चौकात लाईट नाही. छोटया मोठ्या अपघातांची मालिका, मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री यामुळे चौकांची रया गेली. चौक अरुंद असल्याने अपघात होवून लोकांना प्राण गमवावे लागत आहेत. याबाबत उपाययोजनांची आवश्यकता आहे. चौकांचे सुशोभिकरण करताना त्यांच्या समस्याकडे मात्र मनपा व पोलीसांचे दुर्लक्ष झाले आहे. सतिश साखळकर, नागरिक जागृती मंच सांगली








