अमृतसरमध्ये कारवाई : आयएसआय एजंटला पुरविली लष्कराची माहिती
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबमधील अमृतसरमध्ये लष्कराची गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवणाऱ्या दीप सिंग उर्फ दीपूला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून मोबाईल जप्त केला आहे. तपासाअंती पोलिसांनी आरोपीला अटक करत अधिकृत गुप्त कायदा 1923 च्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी छेहरटा येथील भल्ला कॉलनी येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दीप सिंग उर्फ दीप हा आर्मी पॅन्टसमोर सनी टेलर नावाचे दुकान चालवत होता. तो आपल्या शिवणकाम दुकानात बहुतेक भारतीय सैन्य आणि बीएसएफ जवानांचे गणवेश तयार करत होता. लष्कर आणि बीएसएफचे जवान त्याच्याकडे गणवेश शिवण्यासाठी येत असत. त्यांच्या ओळखीतून प्राप्त झालेली माहिती पाकिस्तानी आयएसआय एजंटला पुरविल्याचे तपासात दिसून आले आहे. टेलरचे दुकान चालवत आरोपी पाकिस्तानचा गुप्तहेर बनला होता. त्याच्याकडे येणाऱ्या शिपाई आणि अधिकाऱ्यांच्या ठिकाणाची माहिती त्याला मिळत असे. याशिवाय तो सीमेवरील संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेलाही पाठवत होता.
प्राथमिक चौकशीत भारतीय सुरक्षा दलासंबंधीच्या माहितीच्या बदल्यात पाकिस्तानातून त्याच्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली आणि त्याची बँक खाती जप्त करण्याची तयारीही केली. तो किती दिवसांपासून हे काम करत होता आणि त्याला आतापर्यंत पाकिस्तानमधून किती पैसे मिळाले आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांचे पथक त्याच्या बँक खात्यांची तपासणी करणार आहे.
मोबाईलमध्ये पाकिस्तानी तस्करांचे नंबर
आरोपी दीपू पाकिस्तानमधील काही लोकांशी देशाची गुप्तचर माहिती शेअर करत असल्याची माहिती मिळाली होती. तो पाकिस्तानी तस्कर आणि आयएसआयच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे पाकिस्तानातील तस्कर आणि इतर काही लोकांशी थेट संबंध होते. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून फोन जप्त केला आहे. त्यात पाकिस्तानी तस्कर आणि इतर काही लोकांचे कनेक्शन सापडले आहेत. मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला जात असल्याचे मकबूलपुरा पोलीस स्टेशनचे एसआय परमजीत सिंह यांनी सांगितले.









