बिहारचा तरुण हनीट्रॅपच्या विळख्यात; कोलकाता पोलिसांची कारवाई
वृत्तसंस्था/ कोलकाता
पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करणाऱ्या एका तरुणाला कोलकातामधून अटक करण्यात आली आहे. गुप्तहेराबद्दल सुगावा लागल्यानंतर पश्चिम बंगालच्या पोलिसांनी राहत्या घरामधून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान त्याच्याकडून काही संवेदनशील कागदपत्रे देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भक्ती बंशी झा असे संबंधिताचे नाव असून तो मूळचा बिहारचा असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्याने हनीट्रॅपमध्ये अडकून काही संवेदनशील माहिती पाकिस्तानातील लोकांना पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. देशविरोधी कारवायांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कोलकाता येथे पोलिसांच्या विशेष दलाने सापळा रचून काही तास गस्त घातल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये काही फोटो, व्हिडिओ आणि ऑनलाईन चॅट्सच्या स्वरुपात काही गुप्त माहिती पोलिसांना आढळून आली. त्याने ही माहिती पाकिस्तानात पुरवली असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. ही व्यक्ती एका कुरिअर सेवा कंपनीमध्ये काम करत होती. तसेच यापूर्वी तो दिल्लीत देखील वास्तव्यास होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो कोलकातामध्ये सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या संशयिताची सोशल मिडियाच्या माध्यमातून एका मुलीशी ओळख झाली. ही मुलगी एक पाकिस्तानी एजंट असल्याचे सांगण्यात येत आहे. तिचे नाव आरुषी शर्मा असे असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. फेसबुकवर झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाल्यानंतर या दोघांमध्ये काही अश्लील संवाददेखील झाल्याचे सोशल मीडिया चॅटिंगमध्ये दिसून आले. या प्रकरणात आता कोलकाता पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे. सखोल तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.









