संवेदनशील छायाचित्रे पाकिस्तानला पाठविल्याचे उघड
वृत्तसंस्था/अहमदाबाद
गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कच्छ सीमेजवळ एका गुप्तहेराला अटक केली आहे. सहदेव गोहील असे त्याचे नाव आहे. तो कच्छमधील दयापर येथे आरोग्य कर्मचारी म्हणून काम करत होता. तो पाकिस्तानने प्रायोजित केलेल्या हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. तो पाकिस्तानी गुप्तहेर असलेल्या आदिती भारद्वाज नावाच्या महिलेच्या संपर्कात आला होता, असे तपासात दिसून आले आहे. मात्र, आदिती नावाची कोणतीही महिला तिथे नसावी, परंतु हे नाव पाकिस्तानी हँडलर वापरत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. सहदेव गोहील आणि पाकिस्तानी एजंट आदिती भारद्वाज यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 61 आणि 148 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सहदेव गोहीलने भारतीय नौदल आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) बद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे. त्या बदल्यात गोहीलला 40 हजार रुपये मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे. जून-जुलै 2023 दरम्यान सहदेव सिंग गोहील व्हॉट्सअॅपद्वारे अदिती भारद्वाज नामक मुलीच्या संपर्कात आल्याचे उघड झाले. यादरम्याने त्याने काही छायाचित्रे शेअर केली. त्यात बांधकामाधीन किंवा नव्याने बांधलेल्या बीएसएफ आणि नौदलाच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ समाविष्ट आहेत. आता त्याचा फोन एफएसएलला पाठवण्यात आला आहे. आदिती भारद्वाजच्या नावाचा व्हॉट्सअॅप नंबर पाकिस्तानमधून चालवला जात होता.









