मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत सारेच : शेतकऱ्यांचे काम मात्र सुरूच
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली तरी दमदार पाऊस झालाच नाही. सोमवारी पावसाने दिवसभर उघडीपच दिली. दिवसभरात एक-दोन लहान सरी वगळता पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली असून सूर्यदर्शनदेखील झाले. त्यामुळे पाऊस कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचबरोबर नदी, नाले व जलाशयांना पाणी नसल्याने पाणी समस्याही जैसे थे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी वळिवाने पूर्णपणे दडी मारली. त्यानतंर मान्सूनचे आगमनही उशिराने झाले. मान्सूनचे आगमन झाले तरी म्हणावा तसा पाऊस झालाच नाही. केवळ दोन ते तीन दिवस पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाने पुन्हा उसंत घेतली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. तरीदेखील शेतातील कामे पूर्ण करण्याकडे भर देत आहे. काहीजण भात लावणीचे काम कूपनलिका व विहिरींचे पाणी सोडून करू लागले आहेत. शिवारात भांगलण, कोळपण करून शिवार स्वच्छ करण्यासाठी सर्वच शेतकरी धडपडू लागले आहेत. तालुक्यामध्ये बहुसंख्य गावांमध्ये धूळवाफ पेरणीवर भर दिला जातो. मात्र यावर्षी वळीव आला नसल्याने धूळवाफ पेरणीही काही ठिकाणी रेंगाळली होती. त्यानंतर मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून इतर कामे करण्यास सुरुवात केली आहे. पाऊस आला नाही तर पिके वाळून जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
पाऊस नसल्याने शिवारात तणाचे प्रमाण वाढले आहे. कोळपण करूनदेखील तण पुन्हा पुन्हा येत आहे. सध्या मजुरांचा तुटवडा असल्याने समस्येला तोंड द्यावे लागत आहे. भात, सोयाबिन पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी भाताची वाढदेखील झाली आहे. त्यामुळे खताची फवारणी शेतकरी करत आहेत. तालुक्यातील बऱ्याच गावांमधील शेतकरी रोपलागवडीवर भर देतात. रोप लागवडीसाठी भातपेरणी केली होती. पण पाऊस नसल्याने रोप वाळून जात आहे. यामुळे बरेचजण विहिरी व कूपनलिकांचे पाणी सोडून रोप लागवड करू लागला आहे. त्यातच विद्युत समस्या निर्माण होत असल्याने त्यालाही शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. भुईमूग, बटाटा पिकांनाही पावसाची नितांत गरज आहे. बटाटा लागवड उशिरा झाली आहे. आता काही दिवसांत त्यांना भरती देण्याचे काम करावे लागणार आहे. यासाठी पाऊस हवाच. अन्यथा बटाटा पीकही खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुईमूग पीक सध्या तग धरून असले तरी उन्हामुळे पीक वाळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. आता या सर्व शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. मोठा पाऊस पडेल, अशाच अपेक्षेवर हे सर्वजण शेतात काम करू लागले आहेत. जुलै महिना मध्यावर आला आहे. मात्र म्हणावा तसा पाऊस झाला नाही. यावर्षी अधिक महिना असल्याने पाऊस उशिराने लागण्याची शक्यता जाणकारांतून व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांचा पावसाचा अंदाज घेता 25 टक्केही आतापर्यंत पाऊस झाला नसल्याचे दिसून येत आहे. एकूणच पावसाकडे साऱ्यांचेच डोळे लागले आहेत.