शिवाजी उद्यान-शहापूर परिसरात फवारणी
बेळगाव : शहरासह उपनगरांमध्ये डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. याबाबत महापालिकेला औषध फवारणी करावी, यासाठी निवेदने देण्यात आली. त्यानंतर आता पंपच्या आधारे महात्मा फुले रोड तसेच शहापूर परिसरात औषध फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाल्याने आता साथीचे आजार डोकेवर काढण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या फ्ल्यूसह इतर आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी करावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. फॉगिंग मशीन आणण्यात आल्या. मात्र त्या कुचकामी ठरल्यामुळे आता पंपच्या आधारे औषध फवारणी करण्यात येत आहे. मंगळवारी महात्मा फुले रोड, शिवाजी उद्यान, खडेबाजार-शहापूर या परिसरात औषध फवारणी करण्यात आली. पावसामध्ये महापालिकेचे कर्मचारी विविध ठिकाणी फवारणी करत होते.









