फॉगिंगवर महापौरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित : दुभाजकांच्या देखभालीकडे लक्ष देण्याची सूचना
बेळगाव : महापालिकेकडून शहरातील सर्व गणेशोत्सव मंडपांमध्ये फॉगिंग करण्यात यावे, अशी मागणी सदस्य नितीन जाधव यांनी बुधवारच्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत केली पण महापौर मंगेश पवार यांनी फॉगिंगवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फाँगिग खरोखरच फायद्याचे आहे की, केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, असा सवाल अधिकाऱ्यांना विचारला. याव्यतिरिक्त मलेरिया औषधांची फवारणी करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. बुधवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष करून स्वच्छतेच्या प्रश्नावर अधिक चर्चा झाली. कपिलेश्वर जुना व नव्या तलावावर तसेच जक्कीन होंडमध्ये यापूर्वी पाचव्या आणि सातव्या दिवशी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मात्र तलावाच्या ठिकाणी महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. अशी तक्रार सदस्य नितीन जाधव यांनी बैठकीत केली.
अकराव्या दिवशी तीन टप्प्यात 30 कर्मचाऱ्यांची 24 तास नियुक्ती केली जाणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमध्ये महापालिकेकडून तातडीने फॉगिंग करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पण पाऊस सुरू असल्याने फॉगिंग करता येत नाही, असे दक्षिण विभागाचे साहाय्यक पर्यावरण अभियंता प्रवीणकुमार यांनी सांगितले. महापौर मंगेश पवार यांनी फॉगिंग मशिनवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फॉगिंग केल्याने खरोखरच परिणाम होतो का? अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली. फॉगिंगच्या नावावर लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येऊ नये, या व्यतिरिक्त मलेरियाच्या औषधाची फवारणी करण्यात यावी, अशी त्यांनी सूचना केली. गणेशोत्सव काळात शहर स्वच्छतेचे काम चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.
शहरातील दुभाजकांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची सूचनाही करण्यात आली. महाविद्यालये परिसरातील दुभाजकांच्या देखरेखीची जबाबदारी काही शिक्षण संस्था घेतील का? यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रमुख शिक्षण संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन याबाबत चर्चा केली पाहिजे, असे महापौर मंगेश पवार म्हणाले. दरवर्षी हिवाळी अधिवेशनापूर्वी शहरातील दुभाजकांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. ज्या संस्था दुभाजकांच्या देखभालीची जबाबदारी घेतील त्यांचे जाहिरात फलक त्याठिकाणी लावू, असे साहाय्यक पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी यांनी बैठकीत स्पष्ट केले. टाकाऊ वस्तूंपासून शहरात ठिकठिकाणी आकर्षक हत्ती व इतर प्रकारची चित्रे साकारली जात आहेत. त्याप्रमाणेच तिसरे रेल्वेफटक ब्रिजजवळ वाघाचे चित्र टाकावू वस्तूपासून साकारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.









