जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे महापौरांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
शहराच्या विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग तसेच तुंबलेल्या गटारींमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, फ्ल्यू, टायफाईड यासारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. तेव्हा तातडीने फॉगिंग मशिनने सर्व वॉर्डमध्ये फवारणी करण्यात यावी, अशी मागणी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्यावतीने महापौर शोभा सोमणाचे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्या पावसाळा सुरू असून शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील गटारी स्वच्छ केल्या नाहीत. त्यामुळे डासांची पैदास वाढत चालली आहे. परिणामी साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग पडून आहेत. त्यामुळेदेखील डासांची संख्या वाढत आहे. सध्या डेंग्यूसारख्या आजारांनी अनेक जण त्रस्त झाले आहेत. त्यामुळे तातडीने महापालिकेने फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावर्षी काही ठिकाणी फॉगिंग करण्यात आले तरी शहराच्या बहुसंख्य भागामध्ये अद्याप औषधांची फवारणीच करण्यात आली नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती अधिक झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी काही नगरसेवकांनी आम्ही फवारणी केल्याचे सांगितले. मात्र या सदस्यांकडून फवारणी झाली नाही, आता तरी औषध नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यावर महापौरांनी निश्चितच याबाबत पाऊल उचलू, असे सांगितले. महापौर व उपमहापौर रेश्मा पाटील यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी जायंट्सचे अध्यक्ष सुनील मुतगेकर, लक्ष्मण शिंदे, मदन बामणे, अजित कोकणे, दिगंबर किल्लेकर, भरत गावडे, अनंत जांगळे आदी उपस्थित होते.









