मालवण :
दोडामार्ग तालुक्यातील जंगलमय भागात जंगल सफरीवर गेलेल्या मालवण तालुक्यातील युथ ब्रिटसच्या सदस्यांना पट्टेरी वाघिणीचे दर्शन झाले. या सदस्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये वाघिणीची छबीही टिपली. वाघिणीच्या दर्शनामुळे दोडामार्ग तालुक्यातील जैवविविधतेतील पट्टेरी वाघांचे अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. युथ ब्रिटसच्या सदस्यांनी वाघिणीला ‘सुंदरा’ नाव देत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.
मालवण येथील दर्शन वेंगुर्लेकर, स्वप्नील गोसावी, संजय परुळेकर, अक्षय रेवंडकर हे युवक जंगल सफरीसाठी दोडामार्ग परिसरात गेले होते. आपल्या जंगल सफरीबद्दल बोलताना श्री. वेंगुर्लेकर म्हणाले, शुक्रवारी, 4 एप्रिल रोजी सकाळी मालवणहून निघालो. आम्ही पंधरा दिवसांतून एक फेरी आंबोली, दोडामार्ग या परिसरात असतेच. जिल्ह्यात येणारे विविध पक्षी आणि क्वचित दिसणारे वनचर यांचे उत्तमोत्तम फोटो घेण्याची क्रेझ त्याचबरोबर डोळे भरून जैवविविधता पाहाण्याची आतुरता आम्हाला त्याठिकाणी घेऊन जाते. गेली सात ते आठ वर्षे आमचा हा नित्यक्रम ठरलेला आहे. रानमांजर, गवे, सांबर, मुंगूस, भेकर.. एकावेळी तर एकदम तीन/तीन बिबटे दिसले. पण वाघ काय अजून दिसला नव्हता.
- ‘महाधनेश’ पाहून आनंद झाला
या सफरीत स्वप्नीलला ‘महाधनेश’ दिसला. थोडा उंचच बसला होता. त्याचे फोटो घेऊन आम्ही पुढे निघालो. वाटेत ‘मलबार ग्रे’ दिसला. फिरता फिरता सायंकाळ झाली. सगळीकडे अंधार पसरला होता. रस्त्यावर शुकशुकाट होता. वाहनाच्या उजेडात काळा रस्ता तेवढा दिसत होता. अचानक दोडामार्ग जंगलात संजयला कुणाचे तरी डोळे चमकताना दिसले. एक गायीच्या आकाराएवढा प्राणी जंगलातून येत रस्त्यावर चालताना दिसला. काळोख असल्याने नीट दिसत नव्हते. अक्षय म्हणाला, ‘गाय काय रे ती?’ स्वप्निल ओरडला, ‘अरे वाघ! पट्टेरी वाघ’. सगळे सावध झाले. गाडी येत आहे हे बघून वाघ उडी मारून रस्त्याच्या कडेला गेला व तिथेच थांबला. रस्त्याची कडा रस्त्यापेक्षा थोडी उंच होती. सगळ्यांच्या छातीची धडधड वाढली होती. कारण अवघ्या 10 ते 15 फुटावर वाघ होता. सगळ्यांची नजर वाघावर होती. अंग घामाने डबडबले होते. दर्शन एका बाजूला वळून त्याचा व्हीडिओ शूट करीत होता. वाघ मात्र आपल्याच नादात होता. जीव मुठीत घेऊन चौघे बंद गाडीत होतो, असेही दर्शन म्हणाला.
श्री. वेंगुर्लेकर म्हणाले, पानगळ झालेल्या वेलीतून वाघ जरा पुढे आला आणि शांतपणे बसला. मात्र ती वाघिण असल्याचे स्पष्ट झाले. पांढरे, काळे, पिवळे पट्टे असलेली गुबगुबीत वाघिण शांतपणे आमच्या वाहनाकडे पाहत होती. अक्षय म्हणाला, सुंदर, अतिशय सुंदर. अरे आजपासून ही ‘सुंदरा.’ सिंधुदुर्ग जिह्याची ‘सुंदरा.’ थोड्याच वेळात एकवार आमच्या वाहनाकडे पाहून वाघिण खाली उतरली आणि जंगलात दिसेनाशी झाली.
- अनेक वर्षांची इच्छा झाली पूर्ण
गेल्या अनेक वर्षांपासून वाघ दिसावा म्हणून आतुरलेले चौघेही आनंदाने फुलून गेले. आपल्या जिह्यात वाघ आहेत. ते पाहायला भविष्यात पर्यटकांची संख्या वाढू शकते. स्थानिक लोकांना आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळेल. रोजगार उपलब्ध होईल. परिणामी निसर्गाचे संवर्धन करण्याची मानसिकता वाढेल. त्यासाठी त्यांचे अन्न सुरक्षित राहील, याची काळजी आपण घ्यायला हवी. सांबर, हरीण, डुक्कर, ससे यांची होणारी शिकार थांबवायला हवी. पाणवठे सुरक्षित करायला हवेत. जंगलातील गवत जाळायचे थांबविले पाहिजे, असे मत या युवकांनी नोंदविले.








