मडगाव : क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या कार्यालयात सल्लागार पदावर असलेल्या गोवा क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक संदीप मार्टिन वरळीकर यांना मुक्त करण्यात आले आहे. त्यांची रवानगी आता गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या त्यांच्या पूर्व प्रशिक्षकपदावर करण्यात आली आहे. संदीप वरळीकर यांची कार्यपद्धत चांगली नसल्याचे मागील विधानसभेत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी हाऊसच्या निर्दशनास आणून दिले होते. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे खुद्द क्रीडामंत्री गोविंद गावडे हेसुद्धा अनेकदा गोत्यात आले होते. त्याची उचलबांगडी होणार हे निश्चितच होते. शेवटी सागने एका आदेशाद्वारे त्यांची रवानगी परत एकदा बास्केटबॉल कोर्टवर केली आहे. आता सकाळी पूर्वीच्याप्रमाणे संदीप परत एकदा बास्केटबॉल कोचिंग फिल्डवर जाणार आहेत, तर सध्या कोचिंग संपल्यानंतर दुपारी त्यांच्याकडे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या विभागाचा ताबा असेल.
सागने 16 ऑगस्ट रोजी काढलेल्या एका आदेशाद्वारे वरळीकर यांची आता पुन्हा बास्केटबॉल प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. वरळीकर यांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या विभागाचाही ताबा होता. सागच्या कार्यकारी संचालकांचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्रीडामंत्री गावडे यांच्या सल्लागार पदावरून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. शेवटी त्यांना दिलेले अधिकार सागने एका आदेशाद्वारे काढले. गोवा क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा खात्यातील कर्मचारीवर्गही त्यांच्या मनमानी कार्यपद्धतीला कंटाळले होते. महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारीही वरळीकर यांच्यावर होत्या.









