‘बाझ’ क्रिकेटचा जनक…मॅकलम !
सध्या क्रिकेटमध्ये बोलबाला चाललाय तो इंग्लंडच्या ‘बाझबॉल’ डावपेचांचा…‘अॅशेस’ मालिका पिछाडीवरून येऊन बरोबरीत सोडविल्यानंतर तो जास्तच वाढलाय…न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलम हा या धोरणाचा जनक. स्वत: स्फोटक फलंदाज राहिलेल्या मॅकलमनं तीच आक्रमकता आपल्या प्रशिक्षणात नि इंग्लिश संघात उतरवलीय…
‘बाझबॉल’…इंग्लिश संघाची प्रवृत्तीच बदलून टाकणारी, ‘टी-20’ च्या जमान्यात निरस, कंटाळवाण्या वाटू लागलेल्या कसोटी क्रिकेटला वेगवान नि लोकप्रिय बनविणारी अन् खेळात प्रचंड आक्रमकता आणणारी पद्धती…पण इंग्लंडच्या संघानं नुकत्याच झालेल्या ‘अॅशेस’ मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने गमावल्यानंतर हा डावपेच टीकेचा धनी बनला होता…परंतु तिसऱ्या कसोटीपासून चित्र बदलू लागलं अन् मालिका जेव्हा 2-2 अशी बरोबरीत संपली तेव्हा सर्व टीकाकारांची तोंडं अक्षरश: बंद झाल्याशिवाय राहिली नाहीत…मग ‘बाझबॉल’चा शिल्पकार असलेला इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलमला ‘अॅशेस’मधील त्याच्या खेळाडूंची कामगिरी या धोरणाच्या उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब करून जाते असं म्हटल्याशिवाय राहवलं नाही…
मॅकलमची ‘अॅशेस’ला सामोरं जाण्याची ही पहिलीच खेप अन् पाच सामन्यांची ही कसोटी मालिका आजवरच्या सर्वांत चुरशीच्या मालिकांपैकी एक राहिली…खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक या नात्यानं ब्रेंडन मॅकलमचा हा पहिलाच डाव…2019 च्या ऑगस्ट महिन्यात त्यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली अन् शेवटचा सामना खेळल्यानंतर अवघ्या दहा दिवसांनी त्याची ‘आयपीएल’मधील ‘कोलकाता नाईट रायडर्स’ तसंच ‘कॅरिबियन प्रीमियर लीग’मधील (सीपीएल) ‘केकेआर’ची फ्रँचायझी ‘त्रिनबागो’ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमणूक झाली…‘त्रिनबागो’ 2020 च्या हंगामात संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत विजेते म्हणून उदयास आले… ब्रेंडन मॅकलमनं ‘आयपीएल’मध्ये प्रशिक्षक या नात्यानं पाऊल ठेवलं ते 2020 साली. त्यावर्षी ‘केकेआर’ पाचव्या स्थानावर राहिला, पण 2021 मध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन घडवत अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविलं. मात्र चषक उचलण्याच्या या माजी किवी कर्णधाराच्या स्वप्नावर पाणी ओतलं ते ‘चेन्नई सुपर किंग्स’नं…गेल्या वर्षी ‘कोलकाता नाइट रायडर्स’ची कामगिरी निराशाजनक राहून पहिल्या 12 पैकी फक्त पाच सामने जिंकता आल्यानंतर मॅकलमनं हे पद सोडलं आणि मे महिन्यात इंग्लंड कसोटी संघाचा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी हाती घेतली… याची सुरुवात झाली ती इंग्लंडचे माजी खेळाडू रॉब की यांच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून झालेल्या नियुक्तीनं. कसोटी संघाचं त्यापूर्वी कधीच प्रशिक्षकपद सांभाळलेलं नसतानाही मॅकलमवर विश्वास टाकला तो त्यांनीच. शिवाय बेन स्टोक्सकडे नेतृत्व सोपविलं…त्यावेळी मॅकलमकडे ही भूमिका सोपवण्यात येत असल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नव्हतं. अतिआक्रमक शैलीमुळं त्याच्याकडे कसोटी संघाचं प्रशिक्षण सोपविणं ही चांगली कल्पना ठरेल का, असाही सवाल काहींनी उपस्थित केला होता. मात्र मॅकलमनं आपल्या खेळाडूंना हवं तसं खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं अन् त्याभरात इंग्लिश कसोटी क्रिकेटचा कायापालट घडविला…
त्यानंतर ‘बाझबॉल’ला साजेशा धडाकेबाज पद्धतीनं सुरुवात करताना पहिल्याच तीन सामन्यांच्या मालिकेत ब्रेंडन मॅकलमच्या इंग्लंडनं न्यूझीलंडचा ‘व्हाईटवॉश’ केला, तर जुलैमध्ये पाचव्या कसोटीत भारताचा सात गडी राखून पराभव करून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. खेरीज दक्षिण आफ्रिकेलाही धूळ चारली…मॅकलम प्रशिक्षक बनल्यापासून कसोटी मालिकांचा विचार करता इंग्लंडनं वर्षभरापेक्षा जास्त काळ अपराजित राहण्याचा प्रताप गाजविलाय…बेन स्टोक्स-मॅकलम ही जोडी जमण्याच्या आधी वेस्ट इंडिजमध्ये इंग्लंडला मालिका गमवावी लागली होती अन् 17 सामन्यांत नोंदवता आला होता तो फक्त एकदाच विजय…आणि ‘बाझबॉल’ची कास धरल्यापासून चित्र काय सांगतं ?…मागील 18 कसोटींपैकी 13 सामन्यांत विजय, केवळ 4 लढतींत पराभवाचं दर्शन, तर एक सामना अनिर्णीत अन् तोही पावसामुळं. अनिर्णीत सामन्यावर कुठल्याच परिस्थितीत समाधान मानायचं नाही अशा मानसिकतेनं हा संघ खेळतोय… याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षीची पाकिस्तानविऊद्धची रावळपिंडी कसोटी…त्यात इंग्लंडकडून दोन डावांत मिळून 136.5 षटकांत 6.73 धावसरासरीनं 921 धावा जमविण्यात आल्या आणि शेवटी 74 धावांनी विजय नोंदविण्यात आला…तर इंग्लंड नि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीदरम्यान क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 हजारहून अधिक धावा केवळ षटकार नि चौकारांच्या साहाय्यानं फटकावण्यात आल्या. त्यात इंग्लंडचा वाटा राहिला तो 99 चौकार नि 12 षटकारांसह 504 धावांचा… झॅक क्रॉलीला मोठी धावसंख्या उभारण्याच्या बाबतीत संघर्ष करावा लागलेला असूनही त्याला सलामीवीर म्हणून पसंती देण्यात आली ती याच दृष्टिकोनातून, त्याच्या झटपट धावा करण्याच्या क्षमतेमुळं. यंदाच्या ‘अॅशेस’ मालिकेत सर्वाधिक 480 धावा जमविल्या त्या जबरदस्त हल्ला चढविलेल्या क्रॉलीनंच…इंग्लिश संघ यानंतर थेट पाच कसोटी खेळेल तो जानेवारीतील भारत दौऱ्यावेळी. आपल्याकडील खेळपट्ट्या, त्यांची फिरकीसमोर उडणारी तारांबळ अन् 2021 साली त्यांचा भारतानं 3-1 असा केलेला पराभव या पार्श्वभूमीवर अनेकांच्या मते, ब्रेंडन मॅकलमच्या ‘बाझबॉल’ची खरी कसोटी लागेल ती भारतीय भूमीत!
‘मॅकलम इफेक्ट’…
- इंग्लंडनं या काळात नोंदविलेले अनेक विक्रम ब्रेंडन मॅकलमची संघावरील आक्रमक छाप स्पष्ट करतात…गेल्या वर्षी त्यांनी 89 षटकार खेचले. कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात इतके षटकार आजवर कुणालाच नोंदविता आलेले नाहीत…
- 2022 ची सुऊवात खराब राहूनही इंग्लंडनं शेवट केला त्यावेळी त्यांच्या नावावर नोंदली गेली होती कॅलेंडर वर्षातील सर्वोच्च धावसरी (4.13). याभरात त्यांनी 2000 च्या सुऊवातीच्या काळातील ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीला (4.08) दुसऱ्या स्थानावर फेकलं…
- याखेरीज वर्षभरात 22 शतकं झळकावताना संघानं 2004 मधील 20 शतकांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला…
- गेल्या वर्षीच्या पाकिस्तानविऊद्धच्या रावळपिंडी येथील लढतीच्या पहिल्या दिवशी कसोटी इतिहासात प्रथमच एका संघातील चार खेळाडूंनी एकाच दिवसात शतकं फटकावली…अन् पहिल्या डावात सौद शकीलच्या एका षटकात सहा चौकार हाणून इंग्लंडसाठी विक्रम प्रस्थापित करणाऱ्या हॅरी ब्रूकनं दुसऱ्या डावात जाहिद मेहमूदच्या षटकात 27 धावा फटकावून त्यात भर घातली…
- त्या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडनं चार गडी गमावून 506 धावा जमविल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवशी केलेल्या या सर्वाधिक धावा आणि त्याभरात नोंदविलेली 6.75 ही धावसरासरी देखील आतापर्यंतची सर्वोत्तम…
- प्रथम गोलंदाजी करून शेवटच्या डावात फलंदाजीचं कठीण आव्हान पेलण्याकडे इंग्लंडचा आता कल राहतो. गेल्या वर्षी त्यांनी एजबॅस्टन इथं भारताला पराभूत करताना अवघे 3 गडी गमावून 378 धावा फटकावल्या. चौथ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या बाबतीत इंग्लंडचा विचार करता हा उच्चांक…
- 2022 मध्ये इंग्लंडनं 290 हून अधिक धावांची लक्ष्यं तीन वेळा पार करून दाखविली. सलग चार कसोटींत 250 किंवा त्याहून अधिक धावांचा यशस्वीरीत्या पाठलाग करणारा इंग्लंड हा पहिला संघ…
स्फोटक मॅकलम…
- 27 सप्टेंबर, 1981 रोजी जन्मलेला अन् ‘बाझ’ या टोपण नावानं ओळखला जाणारा ब्रेंडन मॅकलम हा स्वत: कसा विलक्षण स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज राहिला होता ते वेगळं सांगण्याची गरज नाही…त्यानं कसोटीतील सर्वांत वेगवान शतक (54 चेंडूंत) झळकावलं ते आपल्या 2015-16 मोसमातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात, तर पाकिस्तानविरुद्ध 2014 साली 186 चेंडूंत काढलेल्या द्विशतकाला याबाबतीत लाभलंय पाचवं स्थान…
- सातव्या क्रमांकावरून सुरुवात करून सलामीवीरापर्यंत प्रवास केलेल्या मॅकलमनं 2014 मध्ये वेलिंग्टन इथं भारताविऊद्धचा सामना वाचविताना 775 मिनिटांत 302 धावा फटकावल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजानं केलेलं हे पहिलं त्रिशतक…
- 2012 च्या शेवटी सर्व प्रकारांतील न्यूझीलंड संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मॅकलमनं यष्टिरक्षणाला रामराम ठोकला. तेव्हाही नेतृत्व करताना त्याच्या या ‘बाझबॉल’ धोरणाचाच आविष्कार घडला होता. किवी संघानं 2015 मध्ये प्रथमच विश्वचषकाची गाठलेली अंतिम फेरी (त्यात त्यानं 18 चेंडूंत विश्वचषकातील सर्वांत वेगवान अर्धशतकाची नोंद केली) अन् मायदेशातील सलग 13 कसोटी सामन्यांमध्ये पराभव न स्वीकारण्याचा केलेला पराक्रम ही त्याची साक्ष…2015-16 मोसमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या ब्रेंडनकडं सलग 100 कसोटी खेळणारा पहिला किवी खेळाडू ठरण्याचा मानही जातो…
- भारतीय क्रिकेट रसिकांच्या लक्षात मात्र मॅकलम हे नाव कायम राहील ते शुभारंभी ‘आयपीएल’च्या पहिल्याच सामन्यात त्यानं ‘कोलकाता नाइट रायडर्स’तर्फे खेळताना ‘आरसीबी’विरुद्ध नाबाद 158 धावांची आतषबाजी केल्यानं…शिवाय ‘टी-20’ आंतरराष्ट्रीय लढतीत शतक झळकविणारा तो ख्रिस गेलनंतरचा दुसरा फलंदाज…
- प्रकार सामने डाव नाबाद धावा उच्चांक सरासरी शतकं द्विशतकं अर्धशतकं
- कसोटी 101 176 9 6453 302 38.64 12 4 31
- वनडे 260 228 28 6083 166 30.41 5 – 32
- टी20 71 70 10 2140 123 35.67 2 – 13
- आयपीएल 109 109 5 2880 158 27.69 2 – 13
ध्येयनिष्ठ ज्योती याराजी
140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात अॅथलेटिक्स क्षेत्राला गौरवशाली अशी परंपरा आहे. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, पी. टी. उषा यांनी अॅथलेटिक्स क्षेत्राला सोनेरी स्थान मिळवून दिले, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. या दोघांचा वारसा पुढे चालवताना अंजू बॉबी जॉर्ज, हिमा दास, दुती चंद, नीरज चोप्रा, तजिंदरपाल तूर, अविनाश साबळे, ज्योती येराजी यांच्यासह अनेक युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर शानदार कामगिरी करत भारताचा ठसा उमटवला आहे. यातील एकच नाव म्हणजे धावपटू ज्योती याराजी. विशाखापट्टणमची रहिवासी असणाऱ्या या 23 वर्षीय मुलीने 100 मी अडथळ्यांच्या शर्यतीत जबरदस्त कामगिरी करताना स्वत:चा तीन वेळा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. जिद्द आणि निर्धार असेल तर व्यक्ती असंख्य अडथळे पार करून ध्येय साध्य करू शकते, हे ज्योती याराजीने सिद्ध करुन दाखवलं आहे. मागील आठवड्यात चीनमधील चेंगडु येथे झालेल्या जागतिक युनिव्हर्सिटी क्रीडा गेम्समध्ये तिने 100 मीटर अडथळा शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम रचला. 23 वर्षीय ज्योतीने अंतिम फेरीत 12.78 सेकंदाची वेळ नोंदवून तिसरे स्थान पटकावले. या कामगिरीसह, तिने ऑक्टोबर 2022 मध्ये नोंदवलेला 12.82 सेकंदांचा आपला पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम सुधारला. पण, 0.01 सेकंदाने तिचे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे (12.77 सेकंद) तिकीट हुकले. 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतीत भारताची ती सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे. विशेष म्हणजे, ज्योती ही भारतातील एकमेव महिला खेळाडू आहे जिने एका वर्षात सहावेळा 13 सेकंदांपेक्षा कमी वेळात 100 मीटर अडथळ्यांची शर्यत पार केली आहे.
बिकट परिस्थिती तरीही जिद्दीच्या जोरावर यशस्वी
मूळची आंध्र प्रदेशातील असलेल्या ज्योतीचा खेळाडू होण्याचा प्रवास फारच आव्हानात्मक होता. तिची आई हॉस्पिटल क्लिनर म्हणून काम करायची तर वडील सुरक्षा रक्षक आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये, विशाखापट्टणम पासून हैदराबाद येथील स्पोर्ट्स हॉस्टेलपर्यंतच्या बस प्रवासासाठी ज्युनिअर कोच एन. रमेश यांनी तिला पैसे देऊन मदत केली होती. वरिष्ठ धावपटू आणि रेल्वे कर्मचारी कर्नाटपू सोजन्या यांनीही तिला आर्थिक मदत केली. 2010 मध्ये 4×400 मीटर आशियाई इनडोअर चॅम्पियनशिप सुवर्ण विजेत्या संघाचा भाग असलेल्या सोजन्या सिकंदराबाद-लिंगमपल्ली या लोकल मार्गावर तिकीट कलेक्टर म्हणून काम करत होत्या. लिंगमपल्लीजवळ असलेल्या स्टेडियमवर ज्योती सरावासाठी जात असे. सोजन्या तिच्या तिकिटाचे पैसे काउंटरवरील एका सहकाऱ्याकडे देऊन ठेवायच्या. नंतर ज्योती हे पैसे घेऊन जात असे. संघर्षाच्या दिवसांवर मात करून ज्योती आता टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अॅथलीट झाली आहे. ज्योतीचे ज्युनिअर कोच रमेश यांच्यासाठी देखील हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांनी 2016 मध्ये तिला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या वसतिगृहात दाखल केलं होतं. सुरुवातीच्या काळात ज्योतीची कामगिरी फारशी चांगली झाली नाही तरीदेखील रमेश यांनी तिला पाठिंबा दिला. ज्योतीमध्ये लढाऊ वृत्ती होती. या शिवाय, प्रतिकूल परिस्थितीतही शांत राहण्याची अनोखी क्षमता तिच्याकडे होती. त्यामुळेच मी तिला पाठिंबा दिला, असे रमेश सांगतात.
अडथळे पार करत तीन वेळा राष्ट्रीय विक्रम
सुरुवातीला हैदराबाद येथील साई सेंटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या ज्योतीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. दोन वर्षे साई सेंटरमध्ये सराव केल्यानंतर काही काळ तिने गुंटूरमध्ये घालवला. पण, गुंटूरमधील सेंटरही बंद झाल्यानंतर 2019 मध्ये ती भुवनेश्वर येथील रिलायन्स सेंटरमध्ये दाखल झाली. येथूनच तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने नवी दिशा मिळाली. 2020 मध्ये कर्नाटकातील एका स्पर्धेत तिने 13.03 सेंकदाची वेळ नोंदवली होती. पण तिच्या या विक्रमाची नोंद होऊ शकली नाही. यानंतर तिने खेलो इंडिया युनिर्व्हसिटी गेम्स व दक्षिण आशियाई यूथ गेम्समध्ये तिने सहभाग नोंदवला. या स्पर्धेतही तिने चमकदार कामगिरी साकारली. पण, कोविड कालावधीत पाठीच्या दुखापतीने तिला काही काळ मैदानापासून दूर रहावे लागले. पुनरागमन करताना तिला फार त्रास झाला. पण यातूनही तिने जबरदस्त पुनरागमन करत स्वत:ला सावरले. यादरम्यान तिने मे 2022 मध्ये झालेल्या सायप्रस अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मी. अडथळ्यांची शर्यत 13.23 सेकंदाची वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम केला. याआधी, 2002 मध्ये अनुराधा बिस्वालने 13.38 सेकंद वेळ नोंदवत विक्रम केला होता. ज्योतीने अनुराधाचा हा विक्रम मोडीत काढत नव्या विक्रमाची नोंद केली. यानंतर इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने 13.11 सेकंद वेळ नोंदवत आपलाच विक्रम मोडत नवा विक्रम रचला. पण हा विक्रमही फार काळ टिकला नाही. अवघ्या चारच दिवसात ज्योतीने नेदरलँडमधील स्पर्धेत 13.04 सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली. यादरम्यान, तिने स्वताचा तीन वेळा विक्रम मोडला. यानंतरच्या काळात तिने गुजरातमधील नॅशनल गेम्समध्ये 100 मीटरमध्ये 11.51 सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली. याशिवाय, 100 मी. अडथळा शर्यतीत 12.79 सेकंद अशी वेळ नोंदवली. पण दुर्देवाने हवेच्या वेग जास्त असल्यामुळे तिच्या विक्रमाची नोंद होऊ शकली नाही. पण, या गोष्टीने निराशा न होता तिने पुढील काळात बेंगळूरमधील राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम अशी 12.82 सेकंद वेळ नोंदवली. ही तिची सर्वोत्तम वेळ आहे. यानंतर तिने मागे वळून न पाहता यंदाच्या वर्षी 60 मी हर्डल्स रेसमध्ये रौप्य तर आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मी. अडथळा शर्यतीत सुवर्ण जिंकले.
वर्ल्ड अॅथलेटिक्स, ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा मानस
अवघ्या 23 वर्षाची असलेल्या ज्योतीने 100 मी हर्डल्स रेसमध्ये शानदार अशी कामगिरी साकारली आहे. आता, आगामी काळात वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियशिनप, ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचा मानस असल्याचे ती सांगते. केवळ राष्ट्रीय स्पर्धामध्ये नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरीसाठी आपला प्रयत्न असणार आहे. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील सुवर्णमय कामगिरीमुळे आपला आत्मविश्वास बळावल्याचे ती सांगते.
– विनायक भोसले
खेळ जुनाच ओळख नवी : रोईंग

प्राचीन इजिप्त, ग्रीस व रोममध्ये प्रथम दळणवळणाचे साधन म्हणून ‘रोईंग’चा वापर करण्यात आला. एक खेळ म्हणून त्याची सुऊवात बहुतेक करून 17 व्या शतकात आणि 18 व्या शतकाच्या सुऊवातीस इंग्लंडमध्ये झाली. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड-केंब्रिज विद्यापीठांनी आयोजित केलेली नौकांची शर्यत 1828 मध्ये झाली होती…19 व्या शतकात ‘रोईंग’ युरोपमध्ये लोकप्रिय झाले आणि पुढे ते अमेरिकेत व इतरत्र दाखल झाले…
- ‘रोईंग’ म्हणजे नौकानयनाचा आणखी एक प्रकार. नौकेला लावलेल्या ‘ओअर्स’चा (वल्ह्याचा एक प्रकार) वापर करून नौका चालविणे त्यात समाविष्ट असते. हे इतर प्रकारांपेक्षा वेगळे. कारण यामध्ये नौका पुढे जात असली, तरी खेळाडू त्या दिशेने पाठ करून बसतात आणि तशाच परिस्थितीत अंतिम रेषा ओलांडतात…
- ‘रोअर्स’ एकमेकांविऊद्ध 2 हजार मीटर अंतराच्या शर्यतीत एकट्याने वैयक्तिक स्तरावर किंवा दोन, चार वा आठ जणांच्या संघांच्या माध्यमातून उतरतात…‘डबल स्कल्स’मध्ये ‘रोअर’ प्रत्येक हातात एक याप्रमाणे दोन ‘ओअर’ धरतो, तर ‘स्वीप रोइंग’मध्ये दोन्ही हातांनी एकच ‘ओअर’ धरले जाते…
- आठ जणांच्या संघात एक ‘कॉक्सस्वेन’ असतो जो सुकाणू सांभाळतो आणि संघाला सूचना देतो. परंतु इतर सर्व नौकांमध्ये एक ‘रोअर’ ‘फूट पॅडल’सह असलेला लहान ‘रडर’ नियंत्रित करून सुकाणू सांभाळतो…
- ‘कॉक्सस्वेन’ हा ‘रोईंग’ करत नाही आणि तो इतर रोईंगपटूंच्या उलट म्हणजे समोरच्या दिशेने तोंड करून बसलेला असतो. तो एक प्रकारे नौकेतील प्रशिक्षक असतो आणि त्याची आवश्यकता लागते. कारण ‘रोअर्स’ पाठ करून बसलेले असतात…
- दर 10 ते 12.5 मीटर अंतरावर लेन स्पष्टपणे चिन्हांकित केल्या जातात आणि मार्गाची खोली किमान तीन मीटर असणे आवश्यक असते…चुकीची सुऊवात करणाऱ्या संघाला वा ‘रोअर’ला प्रथम इशारा दिला जातो आणि एकाच शर्यतीत दोन चुकीच्या सुऊवाती झाल्यास त्या ‘रोअर’ला किंवा संघाला अपात्र ठरवले जाते…
- नौकेची अंतिम वेळ ही त्याचा दर्शनी भाग (बो) केव्हा अंतिम रेषा ओलांडतो त्यावरून ठरवली जाते. शेवट चुरसपूर्ण राहिल्यास ‘फोटो फिनिश’चा आधार घेतला जातो…
- अथेन्समधील 1896 चे खेळ वगळता प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये ‘रोईंग’चे आयोजन करण्यात आलेले आहे. महिलांनी मॉन्ट्रियलमधील 1976 च्या ऑलिम्पिकपासून या शर्यतीत पदार्पण केले, तर अटलांटा येथे 1996 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकपासून ‘लाईटवेट’ शर्यती सुरू झाल्या…
– राजू प्रभू









