यंदाचा ‘मिस्टर कन्सिस्टंट’…उस्मान ख्वाजा !
नुकत्याच संपलेल्या ‘अॅशेस’ मालिकेत सतत इंग्लंडची डोकेदुखी राहिलेला अन् यंदा कसोटींत 1 हजार धावा पूर्ण करणारा एकमेव फलंदाज असलेला ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये राहिलाय…महत्त्वाचं म्हणजे वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर त्यानं ही झेप घेतलीय अन् या कालावधीत त्याची सरासरी 60 पेक्षा जास्त राहिलीय…
वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर कित्येक क्रिकेटपटूंना निवृत्तीचे वेध लागतात किंवा संघातील आसन दोलायमान झाल्यानं नाईलाजानं गाशा गुंडाळावा लागतो…अशा वेळी बॅटला ढालीसारखं मजबूत बनवून फलंदाजीतील आधारस्तंभ बनायचं अन् तेही सलामीला येऊन हे काही सोपं आव्हान नव्हे…त्याहून कठीण बाब म्हणजे सतत संघाबाहेरचा दरवाजा दाखवणं चालू असताना निराशेच्या गर्तेत न जाता, प्रयत्नांची कास न सोडता ऑस्ट्रेलियासारख्या चमूतील आपलं स्थान या टप्प्यावर पक्कं करणं…12 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत उस्मान ख्वाजाला तब्बल सात वेळा वगळण्यात आलं, तरी देखील त्यानं जिद्द सोडली नाही. ‘मी आजवरच्या सर्वांत जास्त वेळा डच्चू देण्यात आलेल्या खेळाडूंपैकी एक’, ख्वाजा म्हणतो…
यंदा अनेक वर्षांनी इंग्लंडच्या भूमीवर ‘अॅशेस’ मालिका जिंकण्याचं कांगारुंचं स्वप्न साकार होतंय की काय असं पहिल्या दोन कसोटींनंतर वाटत होतं. परंतु पुढं इंग्लंडनं बाजी पलटविली. इतकंच नव्हे, तर एकवेळ तेच चषकावर पुन्हा नाव कोरतात असं वाटू लागलं. पण त्यांच्या मनसुब्यांत एकदा कोलदांडा पावसानं घातला, तर दुसरा मोठा अडथळा आला तो उस्मान ख्वाजाच्या रुपानं…ख्वाजा ऑस्ट्रेलियाच्या मागील म्हणजे 2019 च्या ‘अॅशेस’ दौऱ्याचाही भाग राहिला होता. त्यावेळी संघात एक वरिष्ठ खेळाडू म्हणून आपण प्रस्थापित झालो आहोत, आपला समावेश देशातील पहिल्या सहा फलंदाजांमध्ये होतो असं त्याला वाटत होतं. त्याची कसोटी सरासरीही 40 च्या पुढं होती. पण निवड समिती त्याच्याशी सहमत झाली नाही, त्यांनी त्याला पुन्हा वगळलं…
त्यावेळी उस्मान ख्वाजा होता 32 वर्षांचा आणि आपली कसोटी कारकीर्द आता संपल्यात जमा याची त्याला खात्री झाली होती…‘ते सर्वांत कठीण वर्ष होतं’, तो म्हणतो…त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी 2022 च्या जानेवारीत सिडनी इथं झालेल्या ‘अॅशेस’च्या चौथ्या कसोटीसाठी ख्वाजाला परत बोलावणं आलं. कारण ट्रॅव्हिस हेडची ‘कोव्हिड’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ निघाली. त्यानं हाती आलेली ही संधी सोडली नाही. उस्माननं दोन्ही डावांत शतकं झळकावण्याची कामगिरी करताना एका डावात 137, तर दुसऱ्या डावात 101 धावा काढल्या…एकेकाळी फिरकी नीट खेळता येत नसल्यानं वगळण्यात आलेल्या या खेळाडूनं तेव्हापासून मागं वळून पाहिलेलं नाहीये. त्यानंतर पाकिस्तानविऊद्ध कराचीमध्ये 160, लाहोरमध्ये 104, दक्षिण आफ्रिकेविऊद्ध सिडनीत 195 अन् भारताविऊद्धच्या अहमदाबादमधील लढतीत 180 धावा अशा एकाहून एक जबरदस्त खेळी…
…अन् आता या सर्वांवर कडी करणारी इंग्लंडमधील ‘अॅशेस’ मालिका…त्यात उतरण्यापूर्वी उस्मान ख्वाजावर अनेकांच्या नजरा टिकल्या होत्या. याचं कारण त्याची इंग्लंडमधील फारशी उठावदार नसलेली कामगिरी. पण त्यानं सर्व टीकाकारांना चुकीचं सिद्ध करताना भरभरून धावा केल्या. एजबॅस्टन येथील पहिल्या कसोटीत 141 आणि 65 धावांच्या खेळी करून ख्वाजानं प्रारंभ केला तोच शानदार पद्धतीनं. त्यानंतर पूर्ण मालिकाभर तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा मुख्य आधार राहून त्यानं सलामीला खिंड लढविली आणि जवळजवळ प्रत्येक डावात त्यांना चांगली सुऊवात करून दिली…
उस्मान ख्वाजासाठी ऑस्ट्रेलियाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधीत्व करण्याच्या दृष्टीनं दरवाजे उघडले ते 2011 साली सिडनी इथं झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीवेळी. कारण ठरलं रिकी पाँटिंगला झालेली दुखापत. पाँटिंगच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन त्यानं 37 नि 21 धावाच केल्या असल्या, तरी कांगारुंना एक आशेचा किरण दाखविला…परंतु 2011 ते 2013 या कालावधीत आणखी कसोटी खेळण्याच्या संधी मिळूनही चांगल्या सुऊवातीच्या पलीकडे तो जाऊ शकला नाही. त्याच्या कारकिर्दीला वेगळं वळण देऊन गेला तो 2012 साली न्यू साउथ वेल्समधून क्वीन्सलँड संघात दाखल होण्याचा निर्णय…2014 च्या उत्तरार्धात गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळं सहा महिने मैदानाबाहेर राहावं लागल्यानंतर त्यानं 2015 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा कर्णधार या नात्यानं पुनरागमन केलं. त्यावेळी तो रॉड मार्शच्या निवड समितीला प्रभावित करून गेल्यावाचून राहिला नाही. त्यातच क्वीन्सलँडचं नेतृत्वही चालून आलं…
2015-16 मध्ये ख्वाजानं ‘सिडनी थंडर’ला ‘बिग बॅश लीग’मध्ये विजेतेपद मिळवून देण्याकामी मोलाचं योगदान देताना स्वत:ला ‘टी-20’स अनुरुप दर्जेदार खेळाडू म्हणून सिद्ध केलं. याच मोसमात त्यानं कसोटी संघातही जम बसवून मायदेशातील सामन्यांमध्ये सातत्याने चांगला खेळ केला खरा, परंतु विदेशात अन् खास करून आशियात संघर्ष करण्याची वेळ आली. त्यामुळं श्रीलंका, भारत व बांगलादेशच्या दौऱ्यांवेळी त्याला संघातील स्थान गमावून बसावं लागलं…
उस्मान ख्वाजानं या उपखंडातील अपयशाचा आपल्यावर लागलेला डाग शेवटी 2018 मध्ये पुसला तो दुबईमध्ये पाकिस्तानविऊद्ध सामना वाचवणारं शतक झळकावून. ‘बॉल-टॅम्परिंग’ प्रकरणामुळं स्टीव्ह स्मिथ नि डेव्हिड वॉर्नरवर बंदी आल्यानंतर तोच ऑस्ट्रेलियाचा सर्वांत ज्येष्ठ फलंदाज बनला अन् 2019 साली भारत व संयुक्त अरब अमिरातीच्या दोन उत्कृष्ट दौऱ्यांतून एकदिवसीय संघातील स्थान पक्कं करण्याबरोबर विश्वचषकात खेळण्याची संधीही त्यानं पदरात पाडून घेतली… परंतु काही महिन्यांनंतर फॉर्मात आलेल्या मार्नस लाबुशेनमुळं ‘अॅशेस’च्या वेळी उस्मान ख्वाजाच्या वाट्याला गच्छंती येऊन तो कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही संघातून बाहेर पडला. पुढच्या दोन वर्षांत त्याला आणखी संधी मिळणं कठीण असंच वाटत होतं. परंतु क्वीन्सलँडतर्फे सातत्यानं केलेली चांगली कामगिरी त्याला 2021-22 च्या मोसमात प्रकाशझोतात आणून गेली अन् ‘अॅशेस’मधूनच झालेलं दणदणीत पुनरागमन त्याच्या नव्या उ•ाणास कारणीभूत ठरलं!
सलामीला प्रभावी कामगिरी…
- ऑस्ट्रेलियन सलामीवीरांमध्ये सर्वाधिक सरासरी आहे ती डावखुऱ्या उस्मान ख्वाजाच्याच नावावर. तो ऑस्ट्रेलियासाठी 44 कसोटी सामन्यांमध्ये सलामीला आलेला असून 45 डावांमध्ये त्यानं 60.58 अशा प्रभावी सरासरीनं 2 हजार 363 धावा जमवल्याहेत. यात सात शतकं नि 12 अर्धशतकांचा समावेश, तर 195 ही सर्वाधिक धावसंख्या…
- कसोटी किक्रेटमध्ये किमान 20 डावांत फलंदाजी केलेल्या सलामीवीरांमध्ये ख्वाजाला ही सरासरी दुसरं स्थान देऊन गेलीय. अव्वल स्थानावर विराजमान झालेत इंग्लंडचे हर्बर्ट सटक्लिफ. त्यांनी 83 डावांमध्ये 61.10 च्या सरासरीनं 16 शतकं व 23 अर्धशतकांसह 4 हजार 522 धावा केल्या…
पाकिस्तान ते ऑस्ट्रेलिया… ‘पायलट’ ते क्रिकेट मैदान…
- मुळातच हुशार, विज्ञानाची आवड असलेला उस्मान ख्वाजा हा वैमानिक असल्याची अनेकांना कल्पनाही नसेल. न्यू साउथ वेल्स विद्यापीठातून त्यानं ‘एव्हिएशन’मध्ये पदवी घेतलेली असून व्यावसायिक विमान उ•ाणांचा त्याच्याकडे परवाना आहे. सर्वांत मजेशीर गोष्ट म्हणजे उस्मानला वैमानिक म्हणून जेव्हा परवाना मिळाला तेव्हा त्याच्याकडे गाडी चालवण्याचं ‘लाइसेन्स’ही नव्हतं…
- उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाच्या संघातून खेळलेला पहिला मुस्लिम खेळाडू…18 डिसेंबर, 1986 रोजी इस्लामाबाद-पाकिस्तान इथं जन्मलेला ख्वाजा पाच वर्षांचा असताना त्याचं कुटुंब ऑस्ट्रेलियात दाखल झालं…
- ख्वाजानं सांगितल्यानुसार, त्याला लहान वयातच वर्णद्वेषाचा वारंवार सामना करावा लागला…‘शाळेत मला इतर मुलं काय काय म्हणायची, जे मी त्यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं. त्यांनी मला ‘करी मंचर’ असं नावही ठेवलं होतं’…
यंदाच्या ‘अॅशेस’मध्ये जबरदस्त छाप…
- इंग्लिश वातावरणात यापूर्वी सातत्यपूर्ण कामगिरी न करता आलेल्या उस्मान ख्वाजानं यंदाच्या ‘अॅशेस’मध्ये 10 डावात 49.60 च्या सरासरीनं 496 धावा जमविल्या. मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलाय…यादरम्यान त्यानं एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकावली. त्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली ती 141 अशी. हे त्याचं इंग्लंडमधील पहिलं शतक…
- यामुळं या शतकातील ‘अॅशेस’चा विचार करता एका मालिकेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या सलामीवीरांमध्ये त्याला मॅथ्यू हेडनसह (2002-03) संयुक्तपणे दुसरं स्थान बहाल झालंय…अग्रस्थानी आहे तो डेव्हिड वॉर्नर (2013-14 मध्ये 523 धावा)…
- ‘अॅशेस’ मालिकेत 500 धावा जमविणारा महान डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा सर्वांत वयस्कर ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरण्याचा मान मात्र 36 वर्षीय ख्वाजाला अवघ्या चार धावांनी हुकला. ब्रॅडमननी 1948 च्या ‘अॅशेस’मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी 508 धावा कुटल्या होत्या…तसंच स्टीव्ह स्मिथनंतर ‘अॅशेस’मध्ये 500 धावांची नोंद करणारा या शतकातील दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरण्याची संधीही त्याला चुकली…
- प्रकार सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी शतकं अर्धशतकं
- कसोटी 66 117 11 5004 195 47.21 15 24
- वनडे 40 39 2 1554 104 42 2 12
- टी20 9 9 0 241 58 26.78 – 1
खेळ जुनाच ओळख नवी सेलिंग (यॉटिंग)
‘सेलिंग’ वा ‘यॉटिंग’ म्हणजे ‘नौकानयन’ हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये वाऱ्याचा वापर करून शिडाची नौका हाकली जाते. हा खेळ सर्वप्रथम नेदरलँड्समध्ये सुरू झाला. राजे चार्ल्स द्वितीय यांनी 1600 च्या मध्यास तो इंग्लंडला आणला. तेथून हा खेळ जगाच्या इतर भागांत पसरला…जगातील सर्वोत्तम नौकानयनपटूंचा सहभाग राहणाऱ्या मोठ्या शर्यती 1851 पासून आयोजित केल्या जात आहेत….
- मोठ्या ‘यॉट’पासून ते ‘डिंगी’पर्यंत नौकांचे अनेक प्रकार नौकानयनासाठी वापरले जातात…या शर्यतींचे विविध प्रकार असतात-‘फ्लीट रेसिंग’, ‘टीम रेसिंग’ आणि ‘मॅच रेसिंग’…
- ‘फ्लीट रेसिंग’मध्ये समावेश राहतो तो किमान चार बोटींचा. या गटातील काही स्पर्धांमध्ये शेकडो स्पर्धक उतरल्याचं चित्र पाहायला मिळतं….‘मॅच रेसिंग’मध्ये एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या दोन नौकांचा समावेश असतो आणि सर्वांत वेगवान नौका विजयी होते…‘टीम रेसिंग’मध्ये प्रत्येकी तीन नौका असलेल्या दोन संघांचा समावेश राहतो. हा प्रकार ‘मॅच रेसिंग’सारखाच असतो…
- गुणांची पद्धत त्या त्या स्पर्धेवर अवलंबून असते. शर्यतींसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असलेल्या स्वरूपांमध्ये ‘शॉर्ट कोर्स’, ‘कोस्टल’ किंवा ‘इनशोअर’, ‘ऑफशोअर’ आणि ‘ओशियानिक’ यांचा समावेश होतो…आजकाल जगभरात अशा शर्यती आयोजित केल्या जातात. ऑलिम्पिक, ‘मग रेस’ आणि ‘काऊस् वीक’ यामध्ये नौकानयनाच्या प्रमुख शर्यती होतात…
- ऑलिम्पिकचा ‘सेलिंग’ हा सुरुवातीपासून एक भाग राहिलेला आहे. 1896 मधील पहिल्या ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश होता. तथापि ग्रीसमधून नौका उपलब्ध न झाल्याने आणि परदेशी प्रवेशाला मुभा नसल्यामुळे शर्यती रद्द कराव्या लागल्या. तर 1904 च्या खेळांत त्याला स्थान देण्यात आले नव्हते. हे अपवाद वगळता इतर प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये या क्रीडाप्रकाराचे दर्शन घडलेले असून 1996 पर्यंत त्याला ‘यॉटिंग’ या नावाने ओळखले जात असे…
- 2020 साली झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुऊषांच्या गटात ‘आरएस : एक्स’-विंडसर्फ, ‘लेसर’-एक स्पर्धक असलेली डिंगी, ‘फिन’-हेविवेट एका स्पर्धकाची डिंगी, ‘470’-दोन स्पर्धक सामावलेली डिंगी अन् ‘49ईआर’-स्किफ या शर्यतींचा समावेश राहिला…
- तर महिलांच्या गटात ‘आरएस : एक्स’-विंडसर्फ, ‘लेसर रेडियल’-एक स्पर्धक असलेली डिंगी, ‘470’-दोन स्पर्धक असलेली डिंगी अन् ‘49ईआर’-स्किफ’ या शर्यतींचा अन् मिश्र गटात ‘नाक्रा 17’-मल्टिहल या शर्यतीचा समावेश राहिला…
- ऑलिम्पिक खेळांत बराच काळ नौकानयन शर्यतींमध्ये महिलांनी पुऊषांशी स्पर्धा केली आणि 1988 च्या ऑलिम्पिकपर्यंत सर्व शर्यती मिश्र राहिल्या. 1988 साली पहिल्यांदा खास महिलांची शर्यत पार पडली….
- ‘सेलिंग’ हा अजूनही ‘ऑलिम्पिक’मधील फक्त दोन अशा खेळांपैकी एक आहे जेथे पुऊष आणि महिला खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करतात (नौकानयनातील केवळ ‘49 ईआर’ वर्ग पुरुष व महिलांसाठी खुला आहे). दुसरा खेळ म्हणजे घोडेस्वारी (इक्वेस्ट्रियन)…
- कालौघात नौकानयन खूप मनोरंजक बनले आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे नौका अधिक प्रगत झाल्या असल्या, तरी जुन्या नौका अजूनही टिकून आहेत…
– राजू प्रभू
शंभर वर्षांतील पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न खरे होते तेव्हा…!
कोल्हापूरचा स्टार स्ट्रायकर अनिकेत जाधवची जादू : भारतीय फुटबॉल संघातून आशियाई स्पर्धेत खेळणार
भारतात पश्चिम बंगाल, केरळ, गोवा, मुंबई यांना फुटबॉलमधील पॉवरहाऊस उपमा दिली जाते. गेल्या दहा -वीस वर्षांत भारतात टॅलेंट हंटच्या माध्यमातून शालेय फुटबॉलला चालना मिळाली आणि त्यातून विविध राज्यात फुटबॉलची क्रेझ वाढू लागली. ग्रामीण, निमशहरी भागातून फुटबॉलपटू पुढे येऊ लागले. भारतीय फुटबॉलच्या विकासाची गती वाढू लागली. भारतीय फुटबॉलच्या परंपरेत स्वत:ची म्हणून आपली वेगळी अशी परंपरा, छाप आणि वेड जपणारे शहर म्हणून कोल्हापूरची ओळख. कोल्हापुरी फुटबॉलपटू आणि कोल्हापुरी फुटबॉलप्रेमी हे कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्याप्रमाणे तिखट, चरचरीत. कोल्हापुरी तडका, कोल्हापुरी बाज कोल्हापुरी माणसात आहे, तोच कोल्हापुरी फुटबॉलमध्ये ठासून भरला आहे. संस्थानकाळात फुटबॉलची परंपरा कोल्हापूरने जपली आहे. प्रजाहितदक्षा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज आणि कनिष्ठ सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांनी शंभर वर्षांपूर्वी फुटबॉलला पाठबळ दिले. स्वत:चे संघ तयार करून खेळाडूंना फुटबॉलच्या मैदानावर आणले. या दोन्ही राजपुत्रांच्या प्रोत्साहनाने कोल्हापुरी फुटबॉलचा श्रीगणेशा झाला. गेल्या शंभर वर्षांत कोल्हापुरात शेकडो स्पर्धा झाल्या, हजारो खेळाडू तयार झाले, त्यांनी राज्य, देशपातळीपर्यंत मजल मारली. पण आजवर शंभर वर्षांत एकाही कोल्हापुरी फुटबॉलपटूला भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळविता आले नव्हते. शंभर वर्षे कोल्हापुरी फुटबॉलप्रेमी जे स्वप्न पाहत होता, ते स्वप्न अनिकेत जाधव या बावीस वर्षीय स्टार स्ट्रायकरने पूर्ण केले.
कोल्हापुरातील शाहूपुरी चौथ्या गल्लीतील अनिकेत जाधव हा एका रिक्षाचालकाचा मुलगा, कोल्हापुरी फुटबॉलचे गुण निसर्गताच लाभलेल्या अनिकेतने हौशी फुटबॉलला बगल देत व्यावसायिक अर्थात प्रोफेशनल फुटबॉलला जवळ करत आपल्या गुणवत्ता, प्रतिभेच्या जोरावर मजल दर मजल करत भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळवले. सामान्य घरातील मुलगा आज ओडिशासारख्या व्यावसायिक संघाबरोबर खेळण्यासाठी 2 कोटी 35 लाख रूपयांचा करार करतो. प्रोफेशनल लीग गाजविताना भारतीय संघाचे दार आपल्या खेळाच्या जोरावर उघडतो. यामागे केवळ आणि केवळ अविरत परिश्रम, कष्ट आणि फुटबॉलवरचे प्रेम कारणीभूत आहे.
अनिकेतचा फुटबॉल प्रवास सुरू झाला तो 2012 ते 2015 च्या काळात पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीतील मैदानावरून. जयदीप अंगीरवार नामक फुटबॉल कोचने अनिकेतमधील गुण हेरले. उंचापुरा अनिकेत भविष्यात सुपर स्ट्रायकर होऊ शकतो, हे अंगीरवार सरांनी हेरले. त्या दृष्टीने प्रशिक्षण, सराव आणि कोचिंग देण्यास अंगीरवार सरांनी सुरूवात केली. प्रबोधिनीच्या संघातून आपल्या खेळाची चुणूक दाखविण्यास प्रारंभ केला. प्रबोधिनीतील हॉस्टेलवरील भिंतीवर एक दिवस मी वर्ल्डकप खेळणार! असे शब्द लिहिणाऱ्या अनिकेतने 2017 साली भारतात झालेल्या फिफाच्या 17 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये खेळून ते शब्द खरे ठरविले. भारताच्या 17 वयोगटाच्या संघातून अनिकेतने 2015 ते 2017 या काळात तब्बल 30 आंतराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर 2018-2019 च्या हंगामात त्याने इंडियन अॅरोज संघातून व्यावसायिक फुटबॉलच्या जगात एंट्री केली. त्यानंतर त्याने जमशेदपूर एएफसी, हैदराबाद एएफसी, ईस्ट बंगाल एएफसी, ओडिशा एएफसी या देशातील अव्वल व्यावसायिक संघातून खेळत आपली कामगिरी उंचावत नेली. देशातर्गंत व्यावसायिक फुटबॉल स्पर्धेत खेळताना त्याला अनुभव प्राप्त झालाच पण सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचीही संधी लाभली. गतवर्षी 2022 मध्ये बहरीन व बेलारूसविरूद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात अनिकेतने भारतीय संघातून चमक दाखविली होती. या दोन्ही सामन्यात अनिकेत गोल करू शकला नाही. मात्र त्याच्या पासवर सहकाऱ्यांनी गोल केले. 2021-2022 मध्ये आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या 23 वर्षांखालील गटाच्या पात्रता फेरीत भारतीय संघातून खेळण्याचा बहुमान अनिकेतला लाभला होता. या स्पर्धेत ओमान, संयुक्त अरब अमिराम (युएई), किर्गीस्तानसारख्या बलवान संघांविरूद्धच्या सामन्यात खेळण्याचा त्याला अनुभव मिळाला.
अनिकेतचा कोल्हापूर ते भारतीय फुटबॉल व्हाया पुणे बालेवाडी क्रीडा प्रबोधिनी हा गेल्या सात आठ वर्षांतील प्रवास संघर्षमय, कष्टप्रद असला तरी प्रेरणादायी, आनंद देणारा आहे. कोल्हापुरी फुटबॉलप्रेमींसाठी हा आनंद सर्वात जास्त आहे. कारण गेल्या शंभर वर्षात कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये खेळाडूंच्या, फुटबॉलप्रेमींच्या ज्या पिढी झाल्या, त्या प्रत्येक पिढ्यांनी एकच स्वप्न पाहिले होते, ते म्हणजे कोल्हापूरच्या फुटबॉलपटूने भारतीय संघात स्थान मिळवावे, भारतीय संघाची सेवा करावी, गोल करावेत, कोल्हापूरचे नाव देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवावे. फुटबॉलचं वेड असलेल्या अनेक पिढ्यांनी पाहिलेले स्वप्न अखेर अनिकेतने पूर्ण केले. वेडं होऊन पाहिलेले कोल्हापूरकरांचं स्वप्न एका शतकानंतर सत्यात उतरले. अनिकेत आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करेल. या स्पर्धेत चीन, जपान, कोरियासह इतर बलाढ्या संघांचाही समावेश असणार आहे. या बलवान संघाविरोधात अनिकेत फॉरवर्डच्या जागेवर म्हणजे आघाडी फळीत आपली जादू दाखविणार आहे. आमचा अनिकेत इंडिया संघातून खेळणार या कल्पनेने कोल्हापूरकर जाम खूष आहे. अनिकेतच्या या उत्तुंग भरारीमागे छत्रपती राजाराम महाराज, प्रिन्स शिवाजी महाराज आणि विद्यमान श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या पाठबळ आणि फुटबॉल आणि फुटबॉलपटूंवर जीवपाड प्रेम करणाऱ्या रांगड्या फुटबॉलप्रेमींचे प्रोत्साहनही कारणीभूत आहे.
– संजीव खाडे









