टेनिस सेन्सशन… अल्कारेझ
रॉजर फेडरर निवृत्त झालाय, राफेल नदाल त्याच वाटेवरून चाललाय अन् जोकोविचही आपल्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करतोय…त्यांची पोकळी भरून काढून पुऊष टेनिसमध्ये एक नवीन युग आणण्याची क्षमता दाखवू लागलाय तो स्पेनचा कार्लोस अल्कारेझ…यंदाच्या ‘विम्बल्डन’ किताबानं त्याचे पुन्हा एकदा संकेत दिलेत…
दाच्या ‘विम्बल्डन’च्या अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा अनेकांना पारडं भारी ठरेल असं वाटलं होतं ते विक्रमी 23 वेळा ‘ग्रँडस्लॅम’ विजेता राहिलेल्या 36 वर्षीय नोव्हाक जोकोविचचंच…पण प्रत्यक्षात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ‘त्या’ खेळाडूनं लंडनमधील ‘सेंटर कोर्ट’वर चार तास 42 मिनिटं चाललेल्या झुंजीत पहिला सेट गमावल्यानंतर देखील बाजी पलटविली अन् ‘ऑल इंग्लंड क्लब’मधील सर्बियन राजवट संपवत इतिहास रचला…मग जोकोविचही म्हणाला, ‘मी त्याच्यासारख्या खेळाडूशी आजवर कधी खेळलेलो नाही’…2002 नंतर फेडरर, नदाल, जोकोविच नि अँडी मरे यांच्याव्यतिरिक्त विम्बल्डनमधील पुरुष एकेरीचा प्रतिष्ठेचा किताब आपल्या खात्यात जमा करण्याचा पराक्रम करून दाखविणारा ‘तो’ पहिला खेळाडू (2002 साली अशी कामगिरी केली होती ती लिटन ह्युईटनं)…कार्लोस अल्काराझ गार्फिया…स्पेनचा 20 वर्षीय ‘टेनिस सेन्सेशन’ !…
गेल्या जवळपास दोन दशकांचा विचार केल्यास पुरूषांच्या टेनिसमध्ये पूर्ण दबदबा राहिला अन् टेनिस म्हटल्यावर डोळ्यांसमोर नेहमी आली ती रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच हीच नावं. त्यांनी मिळून 19 वर्षांत एकूण 63 ‘ग्रँडस्लॅम’ किताब जिंकले…अँडी मरे, वॉवरिंका, टॉमास बेरिच, ह्युइट यासारखे चांगले आव्हानवीर या काळात उदयाला आले खरे, पण ते या तिघांच्या गुणवत्तेच्या जवळपासही कधी फिरकू शकले नाहीत…पण आता ते चित्र बदलण्याची, नवीन ‘सुपरस्टार’ बनण्याची क्षमता अल्कारेझ दाखवू लागलाय. विम्बल्डन ही त्याची आणखी एक चुणूक…
स्पेनमधील एल पालमार, मर्सिया इथं 5 मे, 2003 रोजी जन्मलेल्या कार्लोस अल्काराझनं टेनिसचं रॅकेट हातात धरलं ते वयाच्या चौथ्या वर्षापासून. वडील त्याचे पहिले प्रशिक्षक…अल्कारेझचे गुण दिसण्यास फारसा वेळ लागला नाही. 2016 मध्ये त्यानं 12 वर्षांखालील स्पॅनिश राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. 2018 साली वयाच्या 15 व्या वर्षी व्यावसायिक टेनिसपटू बनून ‘एटीपी चॅलेंजर टूर’वर खेळू लागल्यानंतर त्यानं पहिलं ‘चॅलेंजर’ विजेतेपद पटकावलं ते त्याच्या पुढच्याच वर्षी (‘एटीपी चॅलेंजर किताब’ जिंकणारा तो सर्वांत युवा स्पॅनिश टेनिसपटू), तर ‘एटीपी’ क्रमवारीत पहिल्या 100 खेळाडूंमध्ये स्थान मिळविलं ते 2020 साली…
नैसर्गिक गुणवत्ता नि समर्पित वृत्ती यांच्या जोरावर कार्लोस अल्कारेझनं ‘एटीपी’च्या प्रमुख ‘ड्रॉ’चे दरवाजे त्याच्यासाठी उघडण्यास प्रवृत्त केलं ते 2020 च्याच ‘रिओ ओपन’मध्ये…2021 च्या हंगामापासून त्याचा दबदबा वाढण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात होऊन त्यात त्यानं चार ‘एटीपी टूर’ विजेतेपदांची कमाई केली. यामध्ये ‘मियामी ओपन’च्या रूपानं पहिल्या ‘मास्टर्स 1000’ किताबाचाही समावेश राहिला…
अवघ्या 17 वर्षांचा कार्लोस त्या वर्षी ‘ऑस्ट्रेलियन ओपन’मध्ये स्टेफानोस सित्सिपाससारख्या खेळाडूला भारी पडला. त्यावेळी सित्सिपास खरं तर त्याच्यापेक्षा बराच पुढं, जगात सहाव्या क्रमांकावर विराजमान झालेला…त्यानंतर जुलै महिन्यात त्यानं ‘क्रोएशिया ओपन’मधून आपल्या पहिल्या ‘एटीपी’ विजेतेपदाची कमाई केली, तर ऑक्टोबरमध्ये जागतिक क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोच्च 38 व्या स्थानावर झेप घेतली. शिवाय ‘अमेरिकन ओपन’च्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत तो पोहोचला. 2004 नंतर अशी मजल मारणारा तो सर्वांत तऊण पुऊष खेळाडू…
ही घोडदौड 2022 मध्येही चालू राहिली, नव्हे तिनं अधिक गती घेतली. गेल्या वर्षी अल्काराझनं ‘रिओ ओपन’, ‘बार्सिलोना ओपन’, ‘माद्रिद ओपन’ जिंकल्या…यापैकी ‘माद्रिद ओपन’चं विजेतेपद हे जास्तच खास. कारण त्यानं त्याच्यात भरलेली प्रचंड प्रतिभा आणि कोर्टवरील त्याचा निर्भयपणा यांचं पुरेपूर दर्शन घडविताना नदाल आणि जोकोविच यांना सलग सामन्यांत आडवं केलं. या पराक्रमामुळं तो वरील दोन्ही दिग्गजांना एकाच स्पर्धेत पराभूत करणारा इतिहासातील पहिला किशोरवयीन खेळाडू बनला…
पण अल्कारेझनं गतवर्षी सर्वांत मोठी भरारी घेतली ती ‘अमेरिकन ओपन’मध्ये झेंडा फडकवून. ‘हार्ड कोर्ट’वरील या स्पर्धेत 1990 मध्ये किताब मिळविलेल्या पीट सॅप्रासनंतरचा तो सर्वांत तऊण विजेता. शक्तिशाली सर्व्हिस, जबरदस्त ‘फोरहँड’ आणि अफलातून फटक्यांनी त्याला अंतिम फेरीत कॅस्पर ऊडवर विजय मिळवून दिला…याच्या जोडीला त्यानं ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ आणि ‘फ्रेंच ओपन’च्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली…या स्पॅनिश टेनिसपटूच्या दुसऱ्या ‘ग्रँडस्लॅम’ किताबाची नोंद झाली ती यंदा ‘विम्बल्डन’मध्ये…याभरात आठवं (सलग पाचवं) ‘विम्बल्डन’ विजेतेपद मिळवून रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करू पाहणाऱ्या जोकोविचचे मनसुबे त्यानं उधळवून लावले…
त्यापूर्वी कार्लोसनं पोटाच्या दुखापतीमुळं 104 दिवस मैदानाबाहेर राहावं लागल्यानंतर शानदार पुनरागमन केलं ते फेब्रुवारीमध्ये ‘अर्जेंटिना ओपन’चं विजेतेपद पटकावून. या स्पर्धेच्या इतिहासातील देखील तो सर्वांत तऊण विजेता ठरलाय…अल्कारेझच्या खेळाच्या शैलीनं त्याला टेनिसमधील उच्चभ्रू खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवून दिलंय. त्यामुळं अनेकांना त्याची तुलना नदाल, फेडरर नि जोकोविचशी करण्याचा मोह अनावर होऊ लागलाय. जोकोविच तर म्हणतोय ‘तिघांचेही गुण त्याच्यात भरलेत. ‘शिवाय कुठल्याही प्रकारच्या ‘कोर्ट’शी जमवून घेणं हे माझ्याप्रमाणंच त्याचं सुद्धा वैशिष्ट्या’!
युवादशेत जबरदस्त पराक्रम…
- 20 वर्षांचा अल्कारेझ बोरिस बेकर आणि बिऑन बोर्ग यांच्यानंतर ‘विम्बल्डन’च्या पुऊष एकेरीचा किताब पटकावणारा तिसरा सर्वांत तऊण खेळाडू बनलाय. बेकरनं 1985 साली वयाच्या 17 व्या वर्षी ‘विम्बल्डन’चं विजेतेपद जिंकलं होतं…
- गेल्या वर्षी ‘अमेरिकन ओपन’ जिंकल्यानंतर ‘एटीपी रँकिंग’च्या इतिहासातील अव्वल स्थान पटकावणारा सर्वांत तऊण खेळाडू ठरण्याचा मान त्याच्याकडे गेला. त्यावेळी त्याचं वय होतं 19 वर्षं 4 महिने. यापूर्वी 2001 साली हा विक्रम जमा झाला होता तो लिटन ह्युइटच्या (20 वर्षं 8 महिने) खात्यावर…
- कार्लोस अल्कारेझनं किशोरवयातच नऊ विजेतेपदं खिशात घातलीत…या आघाडीवर बोर्ग, नदाल, मॅट्स विलँडर, बोरिस बेकर आणि आंद्रे अगासी यासारख्या दिग्गजांनंतर त्याला स्थान प्राप्त होतं…
- 2008 साली डेलरे बीचवर केई निशिकोरीनं मिळविलेल्या विजेतेपदानंतर तो ‘एटीपी टूर’वरील ‘एटीपी’ किताबाचा सर्वांत तरुण मानकरी ठरलाय…
- ‘विम्बल्डन’मध्ये अल्काराझ व जोकोविच आमनेसामने आले तेव्हा मागील 50 वर्षांत एखाद्या ‘ग्रँडस्लॅम’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच वयामध्ये 16 वर्षं इतकं मोठं अंतर असलेल्या दोन स्पर्धकांमध्ये झुंज पाहायला मिळाली. त्याचप्रमाणं ‘सेंटर कोर्ट’वर 10 वर्षांनंतर जोकोविचला स्वीकारावा लागलेला हा पहिला पराभव…
- गेल्या वर्षी कार्लोसनं ‘माद्रिद ओपन’च्या उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालचा पराभव केला त्यावेळी या दिग्गज खेळाडूला मातीच्या कोर्टवर पराभूत करणारा तो पहिला किशोरवयीन खेळाडू ठरला होता…त्यानंतर त्यानं जोकोविचला नमविलं तेव्हा तो 2004 नंतरचा जगातील अव्वल खेळाडूविऊद्धचा सामना जिंकणारा सर्वांत तऊण खेळाडू ठरला…
एकविशी ओलांडण्यापूर्वीच…
- या जेतेपदानिशी कार्लोस अल्कारेझनं राफेल नदालच्या 21 वर्षांचा होण्यापूर्वी दोन ‘ग्रॅडस्लॅम’ किताब जिंकण्याच्या कामगिरीशी बरोबरी केलीय. एकविशी गाठण्यापूर्वी जोकोविचनं केवळ 2008 सालची ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती, तर रॉजर फेडररला तोवर खातंही उघडता आलं नव्हतं…
- अल्कारेझला त्याच्या 21 व्या वाढदिवसापूर्वी आणखी दोन संधी मिळतील. पुढील महिन्यात सुरू होणारी ‘अमेरिकन ओपन’ आणि त्यानंतर जानेवारीतील ‘ऑस्ट्रेलियन ओपन’. दोन्ही स्पर्धा जिंकल्यास त्याला मॅट्स विलँडरच्या 21 वर्षांचा होण्यापूर्वी चार ‘ग्रँडस्लॅम’ जिंकण्याच्या ‘ओपन’ युगातील विक्रमाशी बरोबरी करता येईल, तर एक किताब बोर्गच्या पंक्तीत बसवून जाईल…
- चार वेळा मिळून जागतिक क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकावर एकूण 29 आठवडे राहिलाय. यात त्याच्या सध्याच्या चार आठवड्यांहून जास्त कालावधीचाही समावेश होतो. जोकोविच, फेडरर किंवा नदाल यापैकी कुणालाही 21 वर्षांचे होण्यापूर्वी असं यश साध्य करता आलं नव्हते…
- वयाच्या एकविशीपूर्वीच पुऊषांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारे लिटन ह्युइट आणि मारात साफिन हेच अन्य दोन तरुण खेळाडू…
खेळाची वैशिष्ट्यां…
- कार्लोस अल्कारेझचा खेळ हा उच्च दर्जाचा अन् अष्टपैलूत्व तसंच सामर्थ्य दर्शविणारा…त्याची सर्व्हिस ताशी 130 मैलांपेक्षा जास्त वेगानं प्रतिस्पर्ध्यावर आदळते आणि ताशी 100 मैलांपेक्षा अधिक वेगानं तो ‘फोरहँड’ हाणू शकतो. त्याच्या भात्यात असे अनेक नामोहरम करणारे फटके भरलेत…
- आत्मविश्वासानं भारलेल्या, तरीही शांत अल्काराझची अॅथलीटसारखी चपळता, कोर्ट ‘कव्हर’ करण्याची ताकद आणि प्रतिस्पर्ध्याला फसविणारे ‘ड्रॉप शॉट्स’ हे त्याच्या खेळाला आणखी वरच्या स्तरावर नेतात…
खेळ जुनाच ओळख नवी : जलतरण मेडली
स्पर्धात्मक जलतरणातील बहुतेक शर्यती या एकाच प्रकारच्या ‘स्ट्रोक’च्या, पण वेगवेगळ्या अंतराच्या असतात. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमधील ‘मेडली इव्हेंट’ विशेष लक्ष वेधून घेतो…‘मेडली’ म्हणजे चारही मुख्य जलतरण ‘स्ट्रोक’चा समावेश असलेली एक शर्यत…
- ‘बटरफ्लाय’ प्रकार 1952 मध्ये ‘वैयक्तिक स्ट्रोक’ म्हणून स्थापित होण्यापूर्वी वैयक्तिक ‘मेडली’ शर्यतींमध्ये फक्त तीन ‘स्ट्रोक’चा समावेश असे आणि सामान्यत: तीन किंवा सहा ‘लेंथ’ (जलतरण तलावाची लांबी) इतकं अंतर पोहून कापलं जात असे. 150 यार्डच्या वैयक्तिक ‘मेडली’ शर्यती त्यावेळी व्हायच्या, ज्याला त्यावेळी ‘थ्री-स्ट्रोक मेडली’ म्हणूनही ओळखले जात असे…
- 50 च्या दशकात ‘बटरफ्लाय’ फेरी वैयक्तिक ‘मेडली’ शर्यतीमध्ये जोडले गेली. त्यातून ‘बटरफ्लाय’, ‘बॅकस्ट्रोक’, ‘ब्रेस्टस्ट्रोक’ आणि ’फ्रीस्टाइल’ अशी रचना झाली…
- ऑलिम्पिक खेळांमधील वैयक्तिक ‘मेडली’ शर्यत ही अशी एकमेव जलतरण शर्यत आहे जेथे महिला आणि पुऊष जलतणपटूंसाठी अंतर समान राहते. टोकियोमधील 1964 च्या ऑलिम्पिकपासून प्रत्येक ऑलिम्पिक खेळांमध्ये 400 मीटर वैयक्तिक ‘मेडली’ आयोजित केली गेली आहे, तर पुऊष आणि महिलांच्या 200 मीटर वैयक्तिक ‘मेडली’ शर्यती 1968 आणि 1972 मध्ये आयोजित करण्यात आल्या. त्यानंतर 1984 पासून प्रत्येक ऑलिंपिकमध्ये त्यांचे दर्शन घडू लागले…
- वैयक्तिक ‘मेडली’साठी ‘स्ट्रोक’चा क्रम ‘बटरफ्लाय’, ‘बॅकस्ट्रोक’, ‘ब्रेस्टस्ट्रोक’ आणि ‘फ्रीस्टाइल’ असा राहतो. पहिल्या दृष्टिक्षेपात हा क्रम हवा तसा केला गेला आहे असे दिसेल. परंतु ते तसे नाही. हा क्रम मुख्यत: जलतरण तलावाच्या काठावर ‘स्ट्रोक’दरम्यान संक्रमण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रिया आणि तंत्र सुलभ करण्यासाठी ठरविण्यात आला आहे…
- ‘मेडली रिले’मध्ये चार जलतरणपटूंचा एक संघ उतरतो आणि प्रत्येकाला किमान एक ‘स्ट्रोक’ पोहण्याचे काम दिले जाते. विशेष म्हणजे ‘मेडली रिले’साठी ‘स्ट्रोक’चा क्रम वैयक्तिक ‘मेडली’सारखा नसतो. सांघिक प्रकारासाठी हा क्रम ‘बॅकस्ट्रोक’, ‘ब्रेस्टस्ट्रोक’, ‘बटरफ्लाय’ आणि ‘फ्रीस्टाइल’ असा असतो…
- सांघिक प्रकारासाठी ‘क्रम’ भिन्न असण्याचे मुख्य कारण ‘बॅकस्ट्रोक’ आहे. ‘बॅकस्ट्रोक’मध्ये जलतरणपटू तलावाच्या काठावरून डुबकी मारू शकत नाही आणि त्याला पाण्यातून सुऊवात करावी लागते. हे इतर संघ सदस्यांसाठी समस्या बनते. ‘बॅकस्ट्रोक’चे अग्रस्थान हलविले आणि क्रम बदलला, तर येणाऱ्या जलतरणपटूची वाट त्यामुळे रोखली जाऊ शकते किंवा पुढील जलतरणपटूशी टक्करही होऊ शकते…
प्रतीक्षा साठेची वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी
महाराष्ट्राची मँचेस्टर नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी शहरात विविध भागातून नागरिक येऊन स्थायिक झाले आहेत. इचलकरंजी लगतच असलेला कबनूर (ता. हातकणंगले) दत्तनगर परिसर म्हणजे काबाडकष्ट करण्यासाठी आलेल्या विविध भागांतील नागरिकांचे आश्रयस्थान. याच ठिकाणी वाढलेली प्रतीक्षा बाळू साठे हिने वेटलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकण्याचे ध्येय ठेवले आहे. प्रचंड जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असलेल्या प्रतीक्षाने आतापर्यंत खेलो इंडियात तीनवेळा पदके मिळवली आहेत तर शालेय स्पर्धेत अनेकवेळा चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील पदके तिने मिळवली आहेत. आर्थिक परिस्थिती नसतानाही संघर्ष करीत प्रतीक्षाने देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवून देण्याची तिची जिद्द नक्कीच अनेक खेळाडूंना प्रेरणादायी अशी आहे. प्रतीक्षाचे वडील टेलरिंग व्यवसाय करत होते. आई घरकाम तर भाऊ यंत्रमाग कामगार आहे. देहयष्टी चांगली असलेली प्रतीक्षा कोणत्यातरी खेळात नक्कीच चमकू शकते, असा विश्वास तिचे मामा व इचलकरंजीतील बालाजी विद्यालयातील क्रीडा शिक्षक रवी चौगुले यांना होता. शरीरसौष्ठव स्पर्धेत यश मिळविलेले श्री. चौगुले यांनी प्रतीक्षाला वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे प्रतीक्षाने या खेळात उतरण्याचा निर्णय घेतला.
कबनूरच्या दत्तनगरमधील शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पाचवीसाठी येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. पाचवी ते सातवी या काळात क्रीडा शिक्षक विश्वनाथ माळी, विजय माळी यांनी तिला मार्गदर्शन केले. या कालावधीत तिला फारसे यश आलेच नाही. चिकाटी न सोडता तिने शालेय स्पर्धेत सहभाग घेतला. 2016-17 मध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत तिने यश मिळविले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. दिल्ली येथे झालेल्या 2017-18 खेलो इंडिया स्पर्धेत तिने सहभाग घेऊन ब्राँझ पदक पटकाविले. दुसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. बेंगलोर येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये तिने ब्रांझ पदक पटकावले. तिने आपला यशाचा आलेख चढता ठेवला. शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप पाटील (कुरूंदवाड) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमहापौर केसरी विजेते अमृत भोसले यांच्या सहकार्याने प्रतीक्षाने आजपर्यंत अनेक राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. विविध ठिकाणी सुवर्णपदक पटकावित यशाची झळाळी कायम ठेवली आहे. गोंदिया येथे झालेल्या ज्युनिअर व सबज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत राज्यातील बेस्ट वेटलिफ्टर म्हणून तिने बहुमान मिळविला आहे. राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत ती आतापर्यंत आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, तामिळनाडू, महाराष्ट्र अशा ठिकाणी झालेल्या स्पर्धेत सहभागी होऊन चमकदार कामगिरी केली आहे. प्रतीक्षा सध्या ज्या गटातून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे, त्या गटात ती आज देशात अव्वलस्थानावर पोहोचण्यात थोडीशी कमी आहे. तिची बरोबरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रतीक्षाची धडपड सुरू आहे. प्रशिक्षक विजय व विश्वनाथ माळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील विश्वविजय व्यायामशाळा येथे सध्या तिचा सराव सुरू आहे. प्रतीक्षा येथील देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेत बीए भाग तीन या वर्षात शिकत आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत असताना प्रतीक्षा हिने आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. प्रत्येक प्रसंगावर मात करीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकण्याचे ध्येय तिने ठेवले आहे.
वडिलांचे छत्र हरपले
कबनूर या गावात टेलरिंग व्यवसाय करीत तिच्या वडिलांनी प्रतीक्षा हिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकण्याचे मोठे स्वप्न पाहिले होते. परंतु चारच महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. यामुळे प्रतीक्षावर आणखी एक संकट कोसळले. वेटलिफ्टरसाठी खुराक महत्त्वाचा असतो. त्यासाठी मोठा खर्चही असतो. प्रसंगी भिशीतून व्याजाने पैसे काढून प्रतीक्षाला तिचे आई-वडील व भाऊ खुराक देत असत. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रतीक्षा हिला आता आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.
देशाला नक्की पदक देईन
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन देशाला पदक मिळवून देणे, हे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी सध्या रोज सहा-सात तास सराव करीत आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे मी निश्चितच देशाला पदक मिळवून देईन, असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.
– संजय खूळ









