‘लक्ष्य’भेद !
भारतीय बॅडमिंटनची एक झळाळती बाजू म्हणजे 21 वर्षांचा लक्ष्य सेन…गेल्या वर्षी त्यानं जबरदस्त कामगिरी करून दाखविली होती. पण त्यानंतर त्याला ग्रहण लागलं ते आरोग्याच्या समस्या नि दुखापतींचं. त्यातून सावरलेला लक्ष्य पुन्हा एकदा झेपावण्याची चिन्हं दिसत असून यंदाच्या ‘कॅनडा ओपन’मध्ये ‘लक्ष्य’भेद करून त्यानं त्याची पुरेपूर चुणूक दाखवलीय…
‘ऑल इंग्लंड चॅम्पियन’ आणि जागतिक क्रमवारीत 10 व्या स्थानावर असलेल्या ली शी फेंगला ‘त्याचा’ धडाकेबाज ‘बॉडी स्मॅश’ परतविता आला नाही अन् कॅलगरीतील मार्किन-मॅकफेल सेंटरमध्ये ‘त्या’ भारतीय ‘शटलर’नं जमिनीवर लोळणच घेतली…‘त्याचा’ आनंद गगनात मावेनासा होणं साहजिकच होतं…मागील 11 महिन्यांत ‘त्याला’ घडलेलं ते पहिल्या विजेतेपदाचं दर्शन. शिवाय तो ठरला बी. साई प्रणितनंतर (2016 साली) ‘कॅनडा ओपन’चा पुरुष एकेरीतील किताब जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू…लक्ष्य सेन !
लक्ष्यनं व्यावसायिक कारकिर्दीत विजेतेपदांची कमाई करताना आपल्यापेक्षा जास्त वजनदार प्रतिस्पर्ध्यांना चकीत करण्याची ही काही पहिलीच खेप नव्हे. पण त्याच्यासाठी हा किताब खास ठरलाय तो वेगळ्या कारणामुळं. हे यंदाच्या वर्षातील त्याचं जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या ‘वर्ल्ड टूर’चं पहिलं विजेतेपद…‘प्रकाश पडुकोण बॅडमिंटन अकादमी’चा विद्यार्थी राहिलेल्या लक्ष्य सेनचे गुण प्रकाशझोतात आले ते 2016 साली. त्यावर्षी ‘इंडिया इंटरनॅशनल सिरीज’ स्पर्धेतील पुऊष एकेरीचं विजेतेपद पटकावण्यापूर्वी त्यानं कनिष्ठ आशियाई स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. प्रभावी कामगिरीच्या जोरावर सेन पुढील वर्षी जागतिक कनिष्ठ क्रमवारीत शिखरावर पोहोचला…एका वर्षानंतर या भारतीय ‘शटलर’नं पुन्हा एकदा कनिष्ठ आशियाई स्पर्धा जिंकून दाखविली अन् त्यात भर घातली ती 2018 च्या उन्हाळी युवा ऑलिंपिकमधील रौप्यपदकाची तसंच कनिष्ठ जागतिक स्पर्धेतील कांस्यपदकाची…
लक्ष्य सेननं जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या ‘वर्ल्ड टूर’चं पहिलं जेतेपद पटकावलं ते 2019 मध्ये. त्यावेळी ‘डच ओपन’ जिंकताना त्यानं जपानी बॅडमिंटनपटू युसुके ओनोडेराचा पराभव केला. त्याच वर्षी त्यानं ‘सारलोरलक्स ओपन’ आणि ‘स्कॉटिश ओपन’चे किताब देखील खात्यात जमा केले. 2020 मध्ये आशियाई सांघिक स्पर्धेत ज्या भारतीय संघानं कांस्यपदक मिळविलं त्याचा लक्ष्य एक भाग होता…‘कोव्हिड-19’ महामारीनं बॅडमिंटनसह सर्व खेळांच्या स्पर्धा ठप्प पडल्यानंतर परत मैदानात उतरून सूर मिळविणं, तुटलेली ‘लिंक’ पुन्हा जुळविणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु सेननं जणू जिथं विराम घेतला होता तेथूनच सुऊवात केली. 2021 साली त्यानं जागतिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत धडक मारून दाखविली. पण तिथं किदांबी श्रीकांतसमोर नमते घ्यावं लागल्यानं कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं…
गेल्या वर्षीची सुरुवात लक्ष्य सेनसाठी विलक्षण धडाकेबाज ठरली. ‘इंडिया ओपन’च्या अंतिम फेरीत त्यानं तत्कालीन विश्वविजेत्या लोह कीन यूचा पराभव करून आपलं पहिलं ‘सुपर 500’ विजेतेपद खात्यावर जमा केलं. हा फॉर्म नंतर कायम राखत त्यानं ‘जर्मन ओपन’ आणि प्रतिष्ठित ‘ऑल इंग्लंड ओपन’च्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मात्र पुऊष एकेरीची ही दोन्ही विजेतेपदं मिळविण्यात त्याला अपयश आलं…2022 मध्ये इंडोनेशियाला अंतिम फेरीत पराभूत करून ‘थॉमस चषक’ उचलण्याची जी ऐतिहासिक कामगिरी भारतीय संघानं केली त्यात सेनचाही वाटा होता…
त्यानंतर ‘राष्ट्रकुल खेळां’मध्ये लक्ष्य सेननं एक पाऊल पुढं जात सुवर्णपदक पटकावलं ते पुऊष एकेरीच्या अंतिम फेरीत मलेशियाच्या योंगचा पाडाव करून. खेरीज मिश्र गटात भारतीय संघाला रौप्यपदक मिळवून देण्यास हातभार लावला…यंदा फेब्रुवारीत झालेल्या आशियाई मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय चमूतही त्याचा सहभाग होता…तरीही ‘कॅनडा ओपन’मध्ये लक्ष्यसमोरील वाट खडतर वाटत होती. कारण मध्यंतरी आरोग्याच्या कुरबुरीमुळं रुळावरून घसरलेली गाडी…
पण सेननं आपल्या विजयी घोडदौडीत आधी जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला थायलंडचा कुनलावुत विटिदसर्न आणि नंतर उपांत्य फेरीत 11 व्या स्थानावर असलेला जपानचा केंटा निशिमोटा यासारख्या मातब्बर खेळाडूंना आडवं केलं अन् मग 15 महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होऊन केला तो ली शी फेंगचा सफाया. अंतिम फेरीतील हा विजय खूप प्रभावी असला, तरी त्यानं आपल्या या चिनी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात थायलंड ओपनच्या दुसऱ्या फेरीतही सेननं त्याला नमविलं होतं. फेंगविऊद्धचं त्याचं पारडं आता 5-2 असं जड झालंय…
लक्ष्यच्या शब्दांत सांगायचं झाल्यास, ‘कॅनडा ओपन’चं जेतेपद हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वांत मोठ्या पुनरागमनांपैकी एक…मात्र त्याचबरोबर ‘ऑल इंग्लंड’ विजेत्यावरील विजय ऑलिम्पिक पात्रता प्राप्त करण्याच्या या वर्षात आपल्याला अधिक आत्मविश्वास देऊन गेलाय, हेही सांगायला तो विसरलेला नाहीये!
बहारदार कारकीर्द…
- यंदा 16 ऑगस्ट रोजी वयाची 22 वर्षं पूर्ण करणाऱ्या लक्ष्य सेनच्या नावावर आहेत ते 211 विजय अन् 85 पराभव…
- जागतिक क्रमवारीत 8 नोव्हेंबर, 2022 रोजी तो कारकिर्दीतील सर्वोत्तम सहाव्या स्थानावर पोहोचला होता. परंतु आरोग्याच्या समस्यांमुळे त्याची कारकीर्द गडगडली आणि परिणामी तो 25 व्या स्थानापर्यंत घसरला…मात्र ‘कॅनडा ओपन’च्या माध्यमातून मिळविलेल्या दुसऱ्या ‘सुपर 500’ किताबानिशी तो ताज्या यादीत 19 वरून 12 व्या क्रमांकावर झेपावलाय…
- जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) ‘वर्ल्ड टूर’चा विचार केल्यास लक्ष्यच्या खात्यावर आहेत चार विजेतेपदं, तर दोनदा तो उपविजेता ठरलाय…
शस्त्रक्रियेच्या परिणामांतून सावरून झेप…
- 2022 मध्ये जोरदार झेप घेतल्यानंतर यंदाच्या हंगामात लक्ष्य सेनची वाटचाल घसरली ती गेल्या ऑगस्टमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेनंतर नाकावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेच्या परिणामांमुळं. वाकड्या झालेल्या ‘सेप्टम’वरील उपचाराचा भाग म्हणून त्यानं ही शस्रक्रिया केली….
- पण त्यातून सावरण्याची लक्ष्यची प्रक्रिया तीन महिन्यांऐवजी आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ लांबली आणि त्याचा प्रभाव त्याच्या कामगिरीवर दिसून आला. हे कमी म्हणून की काय, खांदा आणि गुडघ्याच्या दुखापतीचा त्रासही झाला…
- या पार्श्वभूमीवर 2022 च्या शेवटच्या चार स्पर्धांत त्याचं आव्हान पहिल्या फेरीतच संपलं अन् यंदाच्या 11 वैयक्तिक स्पर्धांमध्ये तब्बल आठ वेळा पहिल्या दोन फेऱ्यांमध्येच बाहेर पडावं लागलं. अंतिम फेरीत पोहोचून जेतेपद मिळविण्याची कामगिरी त्याला जमली ती एकदाच ‘कॅनडा ओपन’मध्ये…
- ‘मी चांगलं प्रशिक्षण घेत होतो, पण शस्त्रक्रियेनंतर आजारी पडू लागलो आणि रोगप्रतिकारशक्तीही चांगली राहिली नाही. मला आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावल्या. त्यात अॅलर्जी, पोटदुखी, ताप, घशाचा संसर्ग यांचा सामना करावा लागला. मी 100 टक्के क्षमतेनं खेळू शकलो नाही. ‘ऑल इंग्लंड’साठी चांगली तयारी केली होती, पण तिथंही चांगली कामगिरी करणं जमलं नाही’, लक्ष्य सांगतो…
नवीन प्रशिक्षकाचे ‘इफेक्ट’
- त्यातच संवादातील समस्यांमुळं लक्ष्य सेननं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक यू योंग-सुंग यांच्यापासून फारकत घेणं पसंत केलं. या पार्श्वभूमीवर त्याचा आत्मविश्वास नि फॉर्म या दोन्हींना ओहोटी लागली…त्यामुळं ‘प्रकाश पडुकोण बॅडमिंटन अकादमी’ला भारताचे माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अनुप श्रीधर यांना जानेवारीमध्ये लक्ष्यचे प्रशिक्षक म्हणून आणणं भाग पडलं. या नवीन भागीदारीचे परिणाम ताबडतोब दिसले नसले, तरी त्यानं सुधारणांची चिन्हं दाखवायला सुऊवात केलीय…
- ‘आम्ही त्याच्या बाबतीत घाई केली नाही आणि साध्य करता येण्याजोगी उद्दिष्टं निश्चित केली. या कालावधीत त्याला कोणतंही विजेतेपद मिळविता आलं नसलं, तरी त्यानं अनेक अव्वल खेळाडूंविरुद्ध विजयांची नोंद केली. तो ‘थायलंड ओपन’ देखील जिंकू शकला असता. तिथं तो उपांत्य फेरीत पोहोचला होता. पण आम्ही धीर धरला, आमच्या कार्यक्रमाला चिकटून राहिलो आणि एक-दोन पराभवामुळं तो बदलला नाही’, अनुप श्रीधर सांगतात…
पुन्हा गवसला जुना आधार…
- ‘प्रकाश पडुकोण बॅडमिंटन अकादमी’नं आणखी एक निर्णय घेतला तो म्हणजे डिकलाइन लैतांव यांना परत आणण्याचा. क्रीडा नि व्यायामशास्त्राचे तज्ञ असलेले लैतांव हे बेंगळूरस्थित गोमंतकीय…
- वयाच्या 10 व्या वर्षापासून लक्ष्यचे ते ‘स्ट्रेंथ नि कंडिशनिंग’ प्रशिक्षक’ राहिलेत. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पटकावणारी सायना नेहवाल जगात अव्वल बनली त्यावेळी लैतांव हेच तिचे ‘ट्रेनर’ होते. यापूर्वी त्यांनी अश्विनी पोनप्पाला देखील साहाय्य केलंय…
- पण कोरियन प्रशिक्षक यू यांनी डिकलाईन यांचा दृष्टिकोन लक्ष्यसाठी अनुकूल नाही असं वाटल्यानं त्यांना डच्चू दिला होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना परत मदतीसाठी आणलं गेलं…
- ‘लक्ष्य सेनला जागतिक बॅडमिंटनमधील सर्वांत मजबूत पाय असलेला खेळाडू बनवणं हे माझं ध्येय. शारीरिकदृष्ट्या तंदुऊस्त असताना तो कोणालाही पराभूत करू शकतो, पण अजून काही कामं करणं बाकी आहे’, लैतांव निर्धारानं सांगतात…
खेळ जुनाच ओळख नवी ! जलतरण – ‘बटरफ्लाय’
‘बटरफ्लाय स्ट्रोक’ ही पोहण्याच्या मुख्य शैलींपैकी एक…छातीवर पोहणे, दोन्ही हात एकाच वेळी हलवणे आणि ‘डॉल्फिन किक’ची जोड देणे याचा त्यात समावेश असतो. ही शैली सर्वांत कठीण मानली जाते अन् त्यासाठी भरपूर कार्यक्षमता, चांगले तंत्र, ताकद तसेच मजबूत स्नायूंची गरज असते…जलतरणातील ती सर्वांत नवीन शैली. ‘ब्रेस्टस्ट्रोक’मधून या शैलीचा उगम झालेला असून 1933 मध्ये सर्वप्रथम त्याचा अवलंब करण्यात आला…
- ‘इंटरनॅशनल स्विमिंग हॉल ऑफ फेम’कडून ऑस्ट्रेलियाच्या सिडनी कॅव्हिलला ‘बटरफ्लाय स्ट्रोक’चे जनक मानले जाते. त्याने 19 व्या शतकाच्या सुऊवातीस ही शैली सादर केली…अमेरिकेच्या हेन्री मायर्सने 1933 मध्ये ‘ब्रेस्टस्ट्रोक’साठी ‘बटरफ्लाय आर्म्स’ पद्धतीचा सर्वप्रथम वापर केल्याचे मानले जाते. त्यानंतर अमेरिकी जलतरण प्रशिक्षक डेव्हिड आर्मब्रस्टर यांना ‘बटरफ्लाय डॉल्फिन किक’ विकसित करण्याचे श्रेय दिले जाते…
- या पोहण्याच्या शैलीत जलतरणपटू त्याच्या छातीवर झेपावतो, त्याचे दोन्ही हात पुढच्या बाजूला आणि पाय मागच्या बाजूला पसरवितो. नंतर हात पाण्यात खालच्या बाजूने खांद्यापेक्षा किंचित खाली खेचले जातात. हात मग कंबरेपर्यंत येतात आणि पाणी कापण्यासाठी वर सरकत असताना डोके आणि धडही वर सरकत असते. श्वास घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असते. मग पुन्हा पाण्याखाली जाणे. यावेळी पाय एकत्र आणावे लागतात आणि डोके वर जात असताना ‘डॉल्फिन किक’ करावी लागते. शरीर यात एखाद्या लाटेसारखी हालचाल करते…
- हात कंबरेपर्यंत जाताना पहिली ‘डॉल्फिन किक’ घेतली जाते. त्यानंतर थोड्याच वेळाने छाती आणि खांदे पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर येतात. हात कंबरेपर्यंत पोहोचताच पाण्याबाहेर येऊन पाण्यावर कडेने पुढे जातात. एकदा हात शरीरासमोर, खांद्याच्या पातळीवर आल्यानंतर ते परत पाण्यात प्रवेश करतात आणि पाण्याखाली पूर्णपणे पसरतात. पाण्याखाली हात पसरत असताना दुसरी ‘डॉल्फिन किक’ घेतली जाते. अशा प्रकारे ‘स्ट्रोक सायकल’ सुरू होते…
- ‘डॉल्फिन किक’ ही ‘ब्रेस्टस्ट्रोक’च्या नियमांच्या विरोधात असली, तरी 1952 मध्ये जलतरणाची जागतिक प्रशासकीय संस्था ‘फिना’ने ‘बटरफ्लाय’ला ‘वैयक्तिक स्ट्रोक’ म्हणून स्थापित करेपर्यंत ‘ब्रेस्टस्ट्रोक’ शर्यतींमध्ये ‘बटरफ्लाय आर्म’ तंत्राचा वापर सुरूच होता….
- 1956 साली ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम ‘बटरफ्लाय’ शर्यत घेण्यात आली. त्यावेळी मेलबर्नमध्ये पुऊषांची 200 मीटर्स, तर महिलांची 100 मीटर्स शर्यत झाली. तेव्हापासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये या शर्यतीं आयोजित केल्या गेल्या. तर 1968 साली मेक्सिको सिटीमध्ये झालेल्या ऑलिम्पिकपासून पुऊषांची 100 मीटर्स आणि महिलांची 200 मीटर्स या बटरफ्लाय शर्यतींची भर पडली…ऑलिम्पिकमध्ये फक्त याच दोन अंतराच्या ‘बटरफ्लाय’ शर्यती होत असल्या, तरी जागतिक आणि खंडीय स्तरावर 50 मीटर्सची शर्यतही आयोजित केली जाते…
कठीण कठीण कठीण किती?
क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. अगदी शेवटच्या क्षणी सामना जिंकला जातो किंवा हरला जातो. एखादा खेळाडू सहा चेंडूत सहा षटकार ठोकतो तर काही वेळा गोलंदाजीत नवा विक्रम होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक महान फलंदाज आणि गोलंदाज झाले आहेत, ज्यांनी आपल्या अफलातून खेळाची मजा द्विगुणित केली. यामध्ये सर डॉन ब्रॅडमन, क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडुलकर, महान फिरकी गोलंदाज, मुथय्या मुरलीधरन, विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा, आफ्रिकेचा माजी स्टार फलंदाज एबी डीव्हिलीयर्स यांच्यासह काही खेळाडूंनी आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही विश्वविक्रम केले आहेत, जे मोडणे अशक्यप्राय असे आहे. याशिवाय, काही महान फलंदाज आणि गोलंदाजांनी इतके मोठे विश्वविक्रम केले आहेत, जे आजपर्यंत फक्त स्वप्नच राहिले आहे. अशाच काही विश्वविक्रमांचा घेतलेला आढावा….
सर डॉन ब्रॅडमन यांची कसोटी सामन्यात सरासरी 99.94.
क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज ऑस्ट्रेलियाचे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी केवळ 52 कसोटी सामने खेळले आहेत. क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या ब्रॅडमन यांनी आपल्या कारकिर्दीत कसोटीत 6996 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यांची फलंदाजीची सरासरी 99.94 इतकी आहे, जी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च आहे. हा विक्रम मोडणे सध्याच्या कोणत्याही फलंदाजाच्या हाती नाही. इतकेच नाही तर कसोटीत सर्वाधिक 12 द्विशतकेही ब्रॅडमन यांच्या नावावर आहेत. तसेच एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्ध त्यांनी 5028 धावा केल्या आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची 100 आंतरराष्ट्रीय शतके
क्रिकेट क्षेत्रात ज्याला क्रिकेटचा देव असे संबोधले जाते तो म्हणजे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने असे काही विक्रम केले आहेत ते भविष्यात मोडले जाण्याची शक्यता कमी आहे. यातील एक म्हणजे सचिनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 शतकांचा विक्रम. हा विक्रम मोडणे सध्या तरी अशक्य आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 74 शतके ठोकली आहेत. सचिनचा विक्रम विराट कोहली मोडेल असे जरी बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र विराटचे वाढते वय, फिटनेस, त्याची कामगिरी यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
मुथय्या मुरलीधरनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 1347 बळी

श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 1347 विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत हा विश्वविक्रम मोडणे कोणत्याही गोलंदाजाला जमलेले नाही. मुथय्या मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीत 133 कसोटी, 350 वनडे आणि 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये एकूण 1347 बळी घेतले आहेत. यानंतर दुसरा नंबर लागतो तो ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न (1001 बळी) यांचा. इंग्लंडचा जेम्स अँडरसन या यादीत तिसऱ्या स्थानी असून त्याने 975 बळी मिळवले आहे. सध्याच्या काळात अँडरसन सोडला तरी मुरलीधरनच्या या विक्रमाच्या जवळपास कोणीही नाही. अँडरसनचे वाढते वय पाहता तोही या विक्रमाच्या जवळपास तरी जाऊ शकेल का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
वनडे सामन्यात रोहित शर्माची 264 धावांची खेळी

जगातील सर्वोत्तम हिटर म्हणून प्रसिद्ध असलेला व टीम इंडियाचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये 264 धावांच्या सर्वोच्च खेळीचा विक्रम आहे. जी कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यानंतर मार्टिन गुप्टील (237) व वीरेंद्र सेहवाग (219) यांचा नंबर लागतो. पण, हे दोघेही निवृत्त झाले असल्याने रोहितचा हा विक्रम मोडणेही अशक्य आहे. एवढेच नाही तर रोहित शर्माने वनडेमध्ये 3 वेळा द्विशतक झळकावले आहे. तसेच रोहितने एकाच विश्वचषकात सर्वाधिक (5) शतके झळकावली आहेत. एकाच विश्वचषकात एका फलंदाजाचा सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याने नोंदवला आहे.
कसोटी क्रिकेटमधील ब्रायन लाराची 400 धावांची खेळी
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा हा क्रिकेटच्या इतिहासातील स्फोटक फलंदाजांमध्ये गणला जातो. ब्रायन लाराने 2004 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद 400 धावा केल्या होत्या. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकाही फलंदाजाला लाराचा हा विश्वविक्रम मोडता आलेला नाही. आणि भविष्यातही या विक्रमापर्यंत कोणता खेळाडू पोहोचेल असे वाटत नाही. तसेच लाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाबाद 501 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत.
एबी डिव्हिलियर्सचे 31 चेंडूत वनडे शतक
एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 31 चेंडूत शतक झळकावले होते. त्या सामन्यात डिव्हिलियर्सने अवघ्या 44 चेंडूत 149 धावा कुटल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत 16 षटकार आणि 9 चौकार लगावले. डिव्हिलियर्सचा 31 चेंडूत वनडे शतकाचा विक्रम मोडणे अद्याप कोणत्याही फलंदाजाला जमलेले नाही आणि भविष्यात कोणाला तो मोडणे शक्य होईल असे वाटत नाही.
– विनायक भोसले









