महानतेचा वारसदार…स्टिव्ह स्मिथ!

भारताचा स्वत: जबरदस्त फलंदाज असलेला विराट कोहली त्याला आजच्या पिढीतील सर्वेत्तम फलंदाज मानतो, तर दिग्गजांपैकी एक असलेला रिकी पाँटिंग त्याला डॉन ब्रँडमननंतरचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गणतो…ते किती सार्थ याविषयी दुमत असेलही, पण स्टिव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाजांच्या परंपरेचा निश्चितच वारसदार आहे यात जराही शंका नाही…
साल 2010…‘तो’ इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आपली पहिली कसोटी खेळला तेव्हा त्याच्याकडे पाहिलं जायचं ते मुख्यत्वे लेगस्पिनर म्हणून…पाकिस्तानच्या त्या तटस्थ स्थळावरील मालिकेतून ‘त्यानं’ पदार्पण केलं तेव्हा ‘तो’ आाठव्या क्रमांकावर फलंदाजीस आला आणि लेगस्पिनची 21 षटकं टाकून तीन बळी घेतले…ऑस्ट्रेलियानं महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करताना ज्या 14 गोलंदाजांना वापरून पाहिलं होतं त्यापैकी ‘तो’ एक…
साल 2023…सध्या चालू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या ‘अॅशेस’ मालिकेतील काल गुरुवारपासून सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीत जेव्हा तो लीड्सवर उतरला तेव्हा त्याच्या नावापुढं नोंद झाली ती 100 व्या कसोटीची अन् आता ‘त्याला’ केवळ ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ म्हणूनच नव्हे, तर त्याच्या पिढीतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखलं जातंय…स्टीव्ह स्मिथ !…
या 34 वर्षीय खेळाडूचं मागील 13 वर्षांतील गोलंदाज ते अडचणीच्या वेळी हमखास मदतीला पावणारा फलंदाज, हे संक्रमण विलक्षण नि जबरदस्त…‘पाकिस्तानविरुद्धच्या त्या कसोटीत मी खेळात शक्य तितका समरस होण्याच्या दृष्टीनं गोलंदाजी केली खरी, पण मला नेहमी करायची होती ती फलंदाजी’, स्मिथ म्हणतो…आणि तेव्हापासून त्यानं इमाने इतबारे केलंय ते नेमकं हेच काम…त्याभरात ‘स्विंग’ असो वा ‘सीम’, फिरकी असो वा उसळणारे चेंडू, सर्व प्रकारच्या गोलंदाजांना तो पुरून उरलाय, तेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत. स्टिव्हनं आपल्या काळातील सर्वोत्तम गोलंदाजांचा मुकाबला केलेला असून इंग्लंडमधील 61.82, भारतातील 50.32 अन् न्यूझीलंडमधील 131 ही त्याची सरासरी याबाबतीत पुरेशी बोलकी. बांगलादेश वगळता प्रत्येक देशात त्याची सरासरी 40 हून अधिक राहिलीय…
स्टिव्ह स्मिथचं खेळण्याचं तंत्र विचित्र नि क्रिकेटच्या कोणत्याही पुस्तकात न दिसणारं…तो क्रीझवर उभा राहिल्यानंतर गोलंदाज चेंडू टाकेपर्यंत सतत हलत राहतो, ‘शफल’ होतो. तो गडबडल्यागत वाटत असला, तरी प्रत्यक्षात तसा नसतो. मात्र ही पद्धत गोलंदाजाची लय बिघडविण्यास उपयोगी पडते. महत्त्वाचं म्हणजे चेंडू खेळण्याच्या अंतिम क्षणी मात्र स्मिथ स्थिर आणि पारंपरिक शैलीत आढळेल…अनेक गोलंदाज त्यामुळं त्याच्या पायांना लक्ष्य बनविण्याचा प्रयत्न करतात. पण तो क्वचितच पायचित झालाय (175 डावांत फक्त 26 वेळा). शिवाय स्टिव्हची सर्वांत मोठी शक्ती म्हणजे ‘ऑन साइड’. तिथून तो बंदुकीच्या गोळीसारखा ‘ऑन-ड्राइव्ह’ आणि ‘फ्लिक’ हाणतो. त्याच्या शैलीमुळं ‘कव्हर ड्राईव्ह’ हा कच्चा दुवा असेल असंही वाटतं, परंतु तो शिताफीनं हा फटका फटकावतो…
2 जून, 1989 रोजी सिडनी इथं जन्मलेल्या स्टिव्हन पीटर डिव्हेरक्स स्मिथची आई इंग्लंडची. 2010 मध्ये त्यानं पाकिस्तानविरुद्धच्या ‘टी-20’
सामन्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवलं. कसोटीच्या बाबतीत 2010-11 मध्ये पाच सामने खेळल्यानंतर त्याला डच्चू देण्यात आला होता. स्मिथला पुन्हा संघात बोलावणं आलं ते 2013 साली अन् भारत दौऱ्यावरील मोहाली कसोटीत त्यानं दणक्यात उसळी घेतली ती 92 धावांच्या खेळीच्या जोरावर. त्यानंतर तो इतका झेपावत गेला की, 2015 मध्ये त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व सोपविण्यात आलं. हा बोजा पेलूनही स्टिव्ह स्मिथची प्रभावी राहिलेली कारकीर्द त्यानं स्वत:च्या हातांनी ऊळावरून घसरविली ती 2018 साली दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन कसोटीत गाजलेल्या ‘बॉल-टॅम्परिंग’मुळं. या प्रकरणातील भूमिकेमुळं मग तोंड द्यावं लागलं ते वर्षभराच्या बंदीला….
तरीही खचून न जाता आणि इंग्लंडचे रसिक हुर्यो उडवत असताना स्टिव्ह स्मिथनं 2019 च्या अॅशेस मालिकेतून जोरदार पुनरागमन करताना एजबॅस्टन इथं दोन्ही डावांत शतकं झळकावली अन् ऑस्ट्रेलियानं तो सामना सहज खिशात घातला…या पार्श्वभूमीवर ताज्या मालिकेतील लॉर्ड्सवरील सामन्यातील जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त ‘स्टंपिंग’नंतर रसिकांकडून खावे लागलेले टोमणे त्याला फारसे लागलेले नाहीत, इंग्लंडमध्ये ‘अॅशेस’ जिंकणं हे निश्चितच माझ्या उद्दिष्टांच्या यादीत विसावलंय. जर मी माझ्या 100 व्या सामन्यात हे साध्य करू शकलो तर ते निश्चितच खास ठरेल’, स्मिथ सांगतो!
महान फलंदाजांच्या पंक्तीकडे वाटचाल…
- स्टिव्ह स्मिथची कसोटीतील सरासरी (59.56) त्याची जबरदस्त क्षमता पुरेपूर दाखवून देते…50 पेक्षा जास्त कसोटी खेळलेल्या खेळाडूंमधली ही तिसरी सर्वोत्तम सरासरी…
- कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या सरासरीच्या बाबतीत शिखरावर विसावलेत ते कांगारुंचेच महान डॉन ब्रॅडमन (99.94). त्यांच्यानंतर 75 वर्षांमध्ये फक्त तीन खेळाडू 20 पेक्षा जास्त कसोटी खेळून 60 पेक्षा जास्त सरासरी राखण्यात यशस्वी ठरलेत…सध्याच्या इतर फलंदाजांपेक्षा जास्त सरासरी असलेला स्मिथ याच गतीनं खेळत राहिल्यास बॅट खाली ठेवेपर्यंत दक्षिण आफ्रिकेचे ग्रॅमी पोलॉक, वेस्ट इंडिजचे जॉर्ज हॅडली व इंग्लंडचे हर्बर्ट सटक्लिफ या त्रिकुटाच्या पंक्तीत सहज जाऊन बसू शकेल…
भारताविरुद्ध सदैव चांगली कामगिरी…
- मागील तीन कसोटींपैकी दोन सामन्यांत स्टिव्ह स्मिथनं शतकं झळकावलेली असून जागतिक कसोटी स्पर्धेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला नडला तो तोच. त्यानं ओव्हलवर पहिल्या डावात 121 धावा काढताना आपल्या 31 व्या शतकाची नोंद केली…
- भारत नि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटींत शतकं झळकावण्याच्या बाबतीत स्मिथच्या (9 शतकं) पुढं आहे तो फक्त सचिन तेंडुलकर (11 शतकं), तर त्यानं मागं टाकलंय महान सुनील गावस्कर, विराट कोहली व पाँटिंगला (प्रत्येकी 8 शतकं)…
- स्मिथनं आता भारताविऊद्धच्या 19 कसोटींमध्ये 2008 धावा केल्याहेत. त्याहून जास्त धावा केलेला त्याचा एकमेव प्रतिस्पर्धी म्हणजे इंग्लंड (34 सामन्यांत 3210)…भारताविऊद्ध त्याची सरासरी 66.87 वर पोहोचलीय. मात्र या आघाडीवर त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे ती विंडीजविऊद्ध (150.40)…
- स्मिथ घरच्या मैदानावर 48 कसोटी सामने खेळलेला असून त्यात त्यानं 16 शतकांसह फटकावल्याहेत 64.51 च्या सरासरीनं 4387 धावा, तर विदेशांतील 46 लढतींत 15 शतकांसह 57.29 च्या सरासरीनं 4297 धावा…
इंग्लंडविरुद्ध धडाका…
- सध्याच्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत स्मिथनं झळकावलं 32 वं शतक. त्यासरशी त्यानं स्टिव्ह वॉच्या पराक्रमाशी बरोबरी केली. आता ऑस्ट्रेलियाचा विचार करता त्याच्या पुढं आहे तो केवळ 41 शतकं फटकावलेला रिकी पॉटिंग…
- स्मिथचं हे इंग्लंडविऊद्धचं 12 वं शतक. याबाबतीत त्यानं दिग्गज जॅक हॉब्स यांच्याशी बरोबरी केलेली असून ‘अॅशेस’मध्ये सर्वाधिक 19 शतकं नोंदविलीत ती डॉन ब्रॅडमन यांनी…
- स्मिथचं इंग्लंडच्या भूमीमधील हे आठवं शतक. याबाबतीत देखील त्याच्या पुढं आहेत ते फक्त ब्रॅडमन (11 शतकं)…
- मात्र सर्वांत जलद 32 कसोटी शतकं ठोकण्याचा मान जमा होतो तो स्टिव्ह स्मिथच्याच खात्यावर. यापूर्वी हा पराक्रम होता रिकी पाँटिंगच्या नावावर (176 डाव)…
- स्मिथ सर्वांत जलदरीत्या 9 हजार कसोटी धावांचा टप्पा गाठण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. त्यानं 174 डावांत हा प्रताप गाजविला, तर पहिल्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेच्या कुमार संगकाराला त्यासाठी 172 डाव लागले होते. मात्र कसोटी सामन्यांचा विचार करता (99) अग्रस्थान प्राप्त होतं ते ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधारालाच…
स्टिव्ह स्मिथची फलंदाजीतील कारकीर्द…
- प्रकार सामने डाव नाबाद धावा सर्वोच्च सरासरी शतकं द्विशतकं अर्धशतकं
- कसोटी 100 175 22 9113 239 59.56 32 4 37
- वनडे 142 126 15 4939 164 44.5 12 – 29
- टी20 63 51 11 1008 90 25.2 – – 4
- आयपीएल 103 93 21 2485 101 34.51 1 – 11
– राजू प्रभू
नीरजचे मिशन 90
कुठल्याही परिस्थितीतून खेळाडू तयार होऊ शकतात. जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी असेल आणि कुटुंबीयांची योग्य वयात साथ मिळाली, तर एखादा खेळाडू कसा घडू शकतो, भालाफेकपटू नीरज चोप्रा हे मूर्तीमंत उदाहरण आहे. राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत सुवर्ण, 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, 2023 मध्ये दोहा व लुसाने डायमंड लीगमध्ये सुवर्ण, जागतिक भालाफेक क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान. मागील काही वर्षातील त्याची ही कामगिरी व हा थक्क करणारा प्रवास नीरजविषयी सारे काही सांगून जातो. पैलू पाडल्याशिवाय हिरा तयार होत नाही तसेच कोणताही खेळाडू हा संघर्षाशिवाय तयार होत नाही, हा इतिहास आहे. अनादी काळापासून हे चालत आले असून भारतीय अॅथलेटिक्स क्षेत्रालाही अंजू बॉबी जॉर्ज नंतर हा दुसरा हिरा गवसला आहे. वय वर्षे अवघे 25. लष्कारमध्ये सुभेदार या पदावर सध्या कार्यरत असलेल्या हरियाणाच्या नीरज चोप्राचा प्रवासही रोमांचक असा आहे.
नीरजचा अॅथलेटिक्सचा प्रवास सुरु झाला तो लठ्ठपणातून. मध्यमवर्गीय एकत्र कुटुंबात लाडाकोडात वाढलेल्या नीरजचे वजन बघता बघता इतके वाढले की त्याच्या वडिलांना मोठी चिंता लागली होती. शिवाय गावभर उनाडक्या करत हा मुलगा फिरत होता. गावातून दिवसभर म्हशींमागे पळणे, म्हशींच्या पाठीवर बसून राहणे असे त्याचे उद्योग सुरू असायचे. हरयाणातल्या खंद्रा नावाच्या गावात चोप्रा फॅमिली राहत होती. नीरजच्या वडिलांनी नीरजच्या काकांकडे आपली चिंता व्यक्त केली. या गावापासून जवळचं शहर म्हणजे पानिपत. पानिपतमध्ये असणाऱ्या शिवाजी स्टेडिअममध्ये अॅथलेटिक्सचं ट्रेनिंग दिले जाते. नीरजच्या घरापासून ही अकादमी 15 किलोमीटरवर होती. नीरजच्या काकांनी नीरजला तिथे जाण्यासाठी गोड बोलून तयार केले आणि रनिंगसाठी त्याला या अकादमीत भरती केले. नीरज रोज ट्रॅकवरून धावेल आणि त्याचं वजन कमी होईल, अशी त्यांच्या फॅमिलीला आशा होती. मात्र नीरजला धावण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. जीवावर आल्यासारखा तो पळायचा आणि कसाबसा तिथला वेळ काढत असे. काही दिवसांतच त्याच अकादमीत काही मुले भालाफेक करताना त्याला दिसली. त्याला त्यात इंटरेस्ट वाटला आणि त्यानंही भाला फेकायला सुरुवात केली. त्याचे पुढं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. 2016 साली झालेल्या ज्युनिअर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने गोल्ड मेडल पटकावले. यानंतर झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि आता डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक ही त्याची कामगिरी सर्वांनाच माहिती आहे.
नव्वदीची स्पर्धा
मागील काही वर्षात नीरजने राष्ट्रकुल, आशियाई गेम्स, वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, टोकियो ऑलिम्पिक नंतर डायमंड लीगमध्ये शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले हे खरे. पण नीरज एवढ्यावर समाधानी नाही. 90 मीटरपेक्षा जास्त भाला फेकणे हे आपले लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले आहे. अर्थात, 90 मीटर भाला फेकणे ही काही सोपी गोष्ट नाही व नीरजसाठी अवघड तर अजिबात नाही. 2016 मध्ये एकाच स्पर्धेपासून जागतिक करिअर स्टार्ट केलेल्या नीरज व ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यांच्यातील कामगिरीही अशीच आहे. नीरजच्या वयाचा असलेल्या ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 80 मीटरपासून सुरुवात करत 93 मीटर भाला फेकला आहे. ते ही पाच वेळा. 93.07 मीटर ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. नीरजची 89.94 मीटर ही कामगिरी सर्वोत्तम आहे. अर्थात, 2019 पासून पीटर्सने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. या वर्षात त्याने 90 मीटरपेक्षा अधिक लांब भाला पाच वेळा फेकला आहे, तर नीरजला आत्तापर्यंत एकदाही 90 मीटर हे अंतर गाठता आलेले नाही. त्यामुळे इथून पुढं पीटर्स आणि नीरज यांच्यातील स्पर्धा 90 मीटरचीच असणार आहे. वर्षभरापूर्वी जो ऑलिंपिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरु शकला नव्हता, तो आता जर सातत्याने नव्वदीचं अंतर पार करत असेल तर नीरजला किती प्रगती करावी लागणार आहे, हे उघड आहे.
नीरजही कसलेला योद्धा
जागतिक स्तरावर 90 मीटर भाला फेकत काही खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यामध्ये ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स, जर्मनीचा ज्युलियन वेबर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. तसेच झेक प्रजासत्ताकचा वेडलिच, वेबर, पीटर्स हे भालाफेकमधील प्रमुख खेळाडू असून आगामी काळात यांच्यात संघर्ष पहायला मिळणार आहे. थोड्याफार फरकाने यश मिळवत या खेळाडूंनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. पण नीरजही कसलेल्या योद्ध्याप्रमाणे आहे. हार मानणे हा शब्दच त्याच्याकडे नाही. मागील काही काळात मांडीची दुखापत, पायाच्या दुखापतीमुळे त्याला मैदानापासून लांब रहावे लागले आहे. पण, या अतिशय कठीण परिस्थितीतूनही त्याने मार्ग काढत यश संपादन केले आहे. नीरजनेही 90 मीटरचे टार्गेट ठेवले आहे. जागतिक स्तरावर त्याची अलीकडील काळातील कामगिरी पाहता हे टार्गेट तो लवकरच पूर्ण करेल यात शंकाच नाही. मुळातच संघर्षमय परिस्थितीतून इथवरचा प्रवास करणारा नीरज भारताचा हिरो आहे. हा हिरो आता आता, पुढील महिन्यात हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टमध्ये होणाऱ्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी सज्ज झाला आहे.
– विनायक भोसले, कोल्हापूर
खेळ जुनाच, ओळख नवी ! जलतरण – ‘बॅकस्ट्रोक’
‘बॅकस्ट्रोक’ ही जलतरणातील चार प्रमुख शैलींपैकी एक. ती अशी एकमेव स्पर्धा आहे जिची सुऊवात इतरांपेक्षा वेगळी असते. ‘बॅकस्ट्रोक’चे वर्णन थोडक्यात करायचे झाल्यास ‘फ्रीस्टाईल’साठी वापरल्या जाणाऱ्या ‘फ्रंट क्रॉल’ पद्धतीच्या नेमका उलटा प्रकार त्यात पाहायला मिळतो…
- ‘बॅकस्ट्रोक’ म्हणजे पाठीवर पोहणे. ‘फ्रीस्टाईल’मध्ये ज्या प्रकारे हात आळीपाळीने पुढे पाणी कापत जातात त्याचप्रमाणे यामध्ये मागच्या दिशेने हात गोलाकार फिरवून पाणी कापले जाते. या तंत्रासाठी आधी ‘ब्रेस्टस्ट्रोक’सारखी ‘फ्रॉग किक’ वापरली जायची. आता पाय वेगाने वर-खाली केले जातात म्हणजे ‘फ्लटर किक’चा वापर केला जातो…
- ‘फ्रीस्टाइल’प्रमाणेच यात सुऊवातीपासून किंवा प्रत्येक वळणापासून फक्त 15 मीटर अंतर पाण्याखाली घालवता येते. 1991 साली या प्रकाराचे नियम बदलले गेले. त्यामुळे वळताना जलतरणपटूंना हाताने भिंतीला स्पर्श करावा लागत नाही. जागतिक नियामक संस्था ‘फिना’ने जलतरणपटूंना त्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागाने भिंतीला स्पर्श करण्याची परवानगी दिली आहे. याचा परिणाम म्हणजे त्यांना अधिक वेगाने वळण घेता येते…जलतरणपटूंनी भिंतीजवळ पोहोचल्यानंतर पाण्याखाली त्वरित फिरणे, पायाने भिंतीला स्पर्श करणे आणि ‘किक’ मारणे हे नंतर लगेच रूढ झाले..
- ‘बॅकस्ट्रोक’चा एक फायदा म्हणजे सहज श्वास घेता येतो, पण गैरसोय म्हणजे पुढे पाहता येत नाही. या शैलीचा वेग ‘बटरफ्लाय’सारखाच, पण ‘ब्रेस्टस्ट्रोक’पेक्षा जास्त असतो…सहसा ‘बॅकस्ट्रोक’ स्पर्धा तीन अंतरांत होतात-50 मीटर्स, 100 मीटर्स आणि 200 मीटर्स. ‘बॅकस्ट्रोक’ हा ‘मेडले’ स्पर्धांचाही एक भाग असतो…
- बॅकस्ट्रोक’ शर्यतीच्या सुरुवातीस स्पर्धकांनी विऊद्ध दिशेने तोंड करून पाण्यात उभे राहणे आवश्यक असते, तर शर्यतीच्या शेवटी ती पूर्ण झाली आहे हे दर्शविण्यासाठी भिंतीला स्पर्श करावा लागतो…
- ‘बॅकस्ट्रोक’च्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना 1930 च्या उत्तरार्धात घडली जेव्हा ऑस्ट्रेलियन जलतरणपटूंनी पाण्याखालील टप्प्यासाठी त्यांचे हात वाकवण्यास सुऊवात केली. हे नवीन तंत्र सरळ हात वापरण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगवान होते आणि स्पर्धात्मक ‘बॅकस्ट्रोक’साठी मानक शैली म्हणून ते पटकन स्वीकारले गेले…
- 1988 च्या सोल ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा डेव्हिड बर्खोफ हा ‘बर्खोफ ब्लास्ट-ऑफ’ म्हणून ओळखल्या गेलेल्या सुरुवातीचा वापर करून खेळांसाठी पात्र ठरला आणि पदकही मिळवून गेला. त्यात तो शक्य तितका वेळ पाण्याखाली ठेवणारी ‘डॉल्फिन किक’ वापरायचा आणि नंतर पाण्याच्या पृष्ठभागावर जलदगतीने पोहायचा…त्यानंतर लगेच ‘फिना’ने एखादा जलतरणपटू प्रत्येक ‘लेंथ’च्या सुऊवातीच्या वेळी 10 मीटर्स अंतरापर्यंत पाण्याखाली राहू शकतो असे जाहीर केले. नंतर 1991 साली हे अंतर वाढवून 15 मीटर्स करण्यात आले…









